बंद पाकळ्या डोळ्यांच्या या
मिटून निपचित पडली होती
भासत होती निजलेली पण
आसवांत ती भिजली होती-
कधीतरी मग असे घडावे
खुडून घ्यावे सर्व दुरावे
आयुष्याच्या वेलीवरती
पुन्हा एकदा मैत्र फुलावे
कधीतरी मग असे घडावे
अबोल्यासही शब्द फुटावे
निखळ निरागस भावनेतले
क्षण आनंदी गात सुटावे
कधीतरी मग असे घडावे
दुःख मनीचे वाफ बनावे
स्वप्निल डोळ्यांमधले अश्रू
हर्षसरींचे ओघळ व्हावे
© कामिनी खाने-
चक्र ऋतूंचे अविरत फिरते
चित्र धरेचे बदलत असते
कोण करे ही कळे न जादू
येता वसंत धरणी सजते
थंड बोचरा वाहे वारा
शुष्क कोरडा परिसर सारा
सुकली पाने होती गोळा
छान दिसे परि सर्व नजारा
या वेळी मग चाफा फुलतो
पर्णसंभार सारा गळतो
नसे मनी परी खेद कोणता
गंधाची तो पखरण करतो
शब्द जुने पण नवीन गाणे
सृष्टीचे ते रूप देखणे
पुन्हा पुन्हा ती गाते पृथ्वी
नव्या ऋतूचे नवे तराणे
०९/०२/२०२१-
गरजत बरसत पाउस पडता
सुसाट वारा धुळही उडता
डोळ्यांपुढती ये अंधारी
छप्पर अपुले उडून जाता
कोसळणाऱ्या पाऊस सरी
ओलिचिंब ही गात्रे सारी
नसे निवारा कुठेच येथे
परि जगण्याची इच्छा भारी
जुनी पुराणी धगुडे सगळी
भिजून अवघी ओली झाली
सोबत नुरले इथे पुसाया
कुणी आसवे डोळ्यांमधली
तुझे नि माझे घर दोघांचे
प्रतीक अपुल्या बघ प्रेमाचे
हतबल होउन कैसे चाले
भविष्य आहे घडवायाचे
उघड्यावरती पडता आपण
मदत कुणाची मागूया पण
येईल कुणी ना मदतीला
होऊ भक्कम अपुले आपण
१२/०३/२०२३ @ ०९:३६-
किलबिल करिती पक्षी सारे
सांगतात ते पहाट झाली।
निघे घेऊनि घागर संगे
गोरी गवळण हसते गाली।।
अंधुक पडला प्रकाश असता
पहाटेस ती यमुनाकाठी
निर्भय होउन स्नाना जाते
कुणी न संगे दिसे एकटी।।
पायाखाली वाट रोजची
तुडवत चाले धरून ठेका
मनात असता सखा श्रीहरी
भीती कसली कुठली शंका।।
दूर वरूनी ऐकू येती
सुर मुरलीचे मंजुळ कानी
कानोसा ती हळूच घेते
लपला कोठे कान्हा रानी।।
इकडे तिकडे चहूबाजुला
शोध घेऊनि गवळण थकली
अंती सारे तिला उमगले
गवळण बनली कृष्णसावली।।
०९/११/२०२२ @ १७:१०-