जरी लपवले प्रसंग सारे माझ्या अपमानाचे
मधून केव्हातरी मनावर तरंग उठती त्यांचे
@गुज-
श्रावणात आठवणींच्या मन चिंब चिंब भिजलेले
खेळात स्मृतींच्या का मन नेहमी असे रमलेले
पाऊस सरी पडणाऱ्या सांगतात गोष्टी साऱ्या
झोपाळ्यावरती झुलते मन प्रेमाने नटलेले
मन झालर इंद्रधनूची रंगीत ओढुनी सजले
मन माझे मागे मागे गावास स्मृतींच्या गेले
त्या जुन्याच वाटा तिथल्या बघ मला खुणावत होत्या
मी त्यांच्या सोबत संगत घेऊन मनाला गेले
त्या आठवणींच्या गावी संसार सुखाचा होता
आषाढ बरसता रात्री मन दिवसा श्रावण झाले
---१८/०८/२०२५-
कधी ऊन तर कधी बरसते पाणी
निसर्ग सारा गातो श्रावणगाणी
धरा नेसते शालू हिरवा हिरवा
थंडगार वाजवतो वारा पावा
फुले भासती जणु रत्नांच्या खाणी
निसर्ग सारा गातो श्रावणगाणी
झोपाळ्यावर झोके घेती पोरी
आकाशाशी जडते नाते भारी
कानी पडते मंजुळ त्यांची वाणी
निसर्ग सारा गातो श्रावणगाणी
इंद्रधनूची कमान दिसते सुंदर
त्या रंगांनी खुलून दिसते अंबर
लोलक बनते पर्जन्याचे पाणी
निसर्ग सारा गातो श्रावणगाणी
---१०/०८/२०२५-