जुनी वेदना मनी जागली कशी सरावी रात्र चांदनी
अशाच गेल्या अनेक घटका तरी न जावी रात्र चांदनी
आठवणींच्या हिंदोळ्यावर पुन्हा मनाचे पाश गुंतले
सोडवण्याचे वचन देऊनी पुन्हा भुलावी रात्र चांदणी
मावळतीच्या सूर्या सोबत रोज रंगते सांज बावरी
ता-यांमधुनी मावळताना अता दिसावी रात्र चांदणी
-
होऊन किती गेले असती तवसम कोणी ना विनायका
शपथ घेतली मनोमनी तू पळवुन लावू गोऱ्या लोका
अर्पिलेस तू जीवन देशा संसाराची करून होळी
केलेस किती यत्न परंतु उरे रिकामी तुझीच झोळी
कष्ट सारे तू किती सोसले शिक्षा भोगी काळेपाणी
मार्ग दाखवी सर्व जगाला तरी तुला ना पुजले कोणी
सर्व विसरले त्याग तुझा हा इथे तरीपण तू उरलासी
पटण्या ओळख निजधर्माची झिजवले नित्य तू कायेसी
लोक लावती तुला उपाधी नसे तुला परि इच्छा त्याची
देशधर्म हा असो चिरायू विनायका तव म्हणणे हेची
अखंड भारत स्वप्नी दिसतो ध्यास तुला हा एकच होता
देह पडो मग देशासाठी अन्य मुक्तिचा मार्ग कोणता
चिरंजीव तू अससी वेड्या मरण आहे पावला जरी
असती तेवत मनामनातुन तुझेच विचार हे जनांतरी
हिंदुत्वाची ज्योत मनी रे साऱ्यांच्याही तू पेटविली
अमर जाहला विनायका तू बहुमानाची गरज संपली
---२६/०२/२०२१-
ऊन तापले माथ्यावरती सृष्टी दिसते केविलवाणी
पशू पाखरे झाडे वेली सगळे करती पाणी पाणी
ग्रीष्मझळांनी सारे जगणे अवघड झाले धरणीवरती
मुले माणसे सारी येथे घामाच्या धारांनी भिजती
शुष्क मनाला कशी स्फुरावी उन्हाळ्यात मग सुरेल गाणी
पशू पाखरे झाडे वेली सगळे करती पाणी पाणी
आंबे जांभुळ करवंदांचा रानामधला मेवा खावा
काजू तोरण चिंचा कोकम यांचाही आस्वाद मिळावा
ऐकू येते आंब्यावरुनी कोकीळेची मंजुळ वाणी
पशू पाखरे झाडे वेली सगळे करती पाणी पाणी
वैशाखाचा महिना सरता पर्जन्याची ओढ लागते
कभिन्न काळ्या मेघांमधुनी वीज चमकुनी वर्षा येते
ओघळणारे थेंब भासती शेतकऱ्याला भविष्यवाणी
पशू पाखरे झाडे वेली अवती भवती पाणी पाणी
--- ०५/०५/२०२४-
मैदानावर खेळायाला जमल्या सगळ्या सख्या मैत्रिणी
चेंडुफळीचा डाव रंगला झेल घेतसे धावा कोणी
हार जीत हा विषयच नव्हता आनंदाचा नुसता पूर
धावपळीच्या जगण्यामधुनी सगळ्या होत्या थोडया दूर
खेळाडू अन प्रेक्षक सारे गढून गेले खेळामध्ये
लहान मोठा भेद न उरला अंतर जरी ते हुद्द्यामध्ये
जोश किती तो होता भरला त्या मैदानी वातावरणी
नव्हती कोणा भूक आठवत आणि नकोसे होते पाणी
मनमुराद लुटला साऱ्यांनी तो स्पर्धेचा उन्माद असा
अटीतटीच्या लढती मधुनी श्वास कोंडलासे मनी जसा
स्पर्धेमध्ये कोण अपयशी खेद कुणाला ह्याचा नव्हता
ज्या विजयी अंतिम झाल्या त्या सख्याच साऱ्या अपुल्या होत्या
२७/०४/२०२३ @ २०:५०-
जगण्यामधला आत्मा मरतो जीवन निव्वळ सुरूच असते
उरसफोड मग जगण्यासाठी एकटीच ती करीत बसते
सोबत कोणा मागू आता प्रश्न निरंतर पडे तिला तो
सगेसोयरे नावापुरते, गरजेला कोणीही नसते
जबाबदाऱ्या सगळ्या पुरत्या करते बाई जरी एकटी
कारुण्याची किनार लावत ओठ मुडपुनी हळूच हसते
किती संकटे आली येथे ठामपणाने तरी उभी ती
आयुष्याचे शेत कोरडे कष्टाने ती हसून कसते
दिवसाअंती रोज मांडते हिशोब साऱ्या सुख दुःखाचा
दोष न देता नशिबाला ती पुढला रस्ता चालत असते
--- ०८/०३/२०२४-
छटा लालसर अजून गगनी मावळतीला सूर्य बुडाला
भरे गारवा हवेत तिथल्या गाव दूर तो दिसू लागला
गुरे परतली गोठ्यांमध्ये आणि पाखरे त्यांच्या घरटी
नभांगणी चमकल्या तारका द्वितियेचा वर चंद्र उगवला
नसे उतरली रात्र तरीही वेळेचा अंदाज लागला
प्रकाश पडदा दूर सारूनि पुढे पुढे अंधार सरकला
घनदाट पसरली सभोवताली झाडाझुडुपांची जाळी
एक मुसाफिर अवघड रस्ता विना सोबती चालु लागला
मुक्कामाचे ठिकाण कुठले नव्हते ठाउक त्याला काही
वेगवेगळ्या गावांमधुनी एकटाच तो भटकत राही
अशाच इथल्या गावामध्ये त्यास भेटला साधू कोणी
म्हणे मुसाफिर, "सांगा बाबा भविष्यातले माझ्या काही"
साधु म्हणाला हसून त्याला, "ही वणवण आता सोडुन दे!
पोहोचण्यास तू मुक्कामाला देवाचे मुखी नाव घे!
पुरे जाहली फरफट सगळी काळ संपला तुझा इकडला.
विलीन होण्या अनंतात हे शरीर नश्वर तू टाकुन दे!"
१५/११/२०२२ @ २१:४५-