ती वाट सोपी नाही
अंधारी नसली तरी
उजेड कुठे दिसत नाही
चकवाही पाठ सोडत नाही ...
सरळ वाटली तरी
वळणे चुकत नाहीत
दूरवर पहायला गेलं तर
जवळचं काही दिसत नाही ...
वाट सोपी नसली तरी
अवघडही वाटत नाही
नेमकी कशी तेच कळत नाही
ती वाट अगदी सोपी नाहीच ...-
हरे कृष्णा हरे कृष्णा
वसुदेवाच्या सूता
धन्य देवकीची कूस
धन्य झाली धरती माता ...
शान मथुरेची आगळी
वाढे आनंदे गोकुळी
नंद यशोदेचा कान्हा
हरे कृष्णा हरे कृष्णा ...
वृंदावनाची स्वामिनी
हरीची राधा राणी
विनवीती घनश्यामा
हरे कृष्णा हरे कृष्णा ...-
करकरली अवजड द्वारे
शृंखला गळून पडल्या
कोसळती पाऊसधारा
अभिषेक बाल मुखाला ...
का पान्हा दाटला यमुनेचा
पूर होऊनी वाहू लागला
टोपलीत हरी इवलासा
कसा बालमुकुंद झोपला ...
बिलगली यमुना चरणाला
जीवन धन्य करण्याला
चालले मथुरेचे बाळ
गोकुळ उद्धरण्याला ...-
हा पाऊस वेडा वेडा असतो
कधी कधी खूप खूप बरसतो
तर कधी हिरमुसून बसतो ...
कधी वेडा वाकडा पडतो
नुसते झोडपून काढतो
कधी सुतासारखा सरळ येतो ...
कधी गंभीर तर कधी थिल्लर
कधी झिम्माड कधी सरसर
पाऊस हा असाच तर असतो ...
कधी रटाळ पीरपीर रडका
कधी हवाहवासा मनासारखा
कवितेतील स्वप्नांसारखा ...-
हळू हळू चालली नाव
किनारा सोडून दूर दूर
ना माहीत कोणता देश
ना माहीत कोणता गाव ...
अंतर कापताना कसे
वल्हे भिडले पाण्याला
काय सांगती एकमेकां
परतून ना येणे भेटण्याला ...
असेल का किनारा दुसरा
माहित नाही कुणाला
चालली नाव पाण्यावर
ना आधार तिला कसला ...-
जखमा किती झेलल्या
काटेही किती बोचले
बाजूस सारून दुःख सारे
फूल अलवार कसे उमलले-
अवघी पंढरी दुमदुमली
घोष चाले विठू माऊली
टाळ वाजे विणा वाजे
थाप मृदुंगावर पडली ...
उधळत अबीर गुलाल
वारी पुढे पुढे चालली
विठुरायाच्या पाउली
अवघी पंढरी दुमदुमली ...
हसली चंद्रभागा गाली
मूर्ति विठुरायाची सावळी
भान भक्तांचे हरपले
अवघी पंढरी दुमदुमली ...-
केला खटाटोप देवा
तुजसाठी मी वारीचा
पूर्ण करून घेतला तू
हट्ट या तुझ्या लेकराचा ...
आता काही हट्ट नाही
काही मागणेही नाही
दर्शन झाले तुझे देवा
तुज वाचून काही नाही ...
सोडून बारस निघते आज
डोळ्यात भरले पाणी बघ
पुढल्या साली बोलव मला
वाट बघेन, मी येईन धावत ...
जावे लागेल माघारी
परतून पुन्हा संसारी
आशिर्वादाने तुझ्या
पूरी झाली माझी वारी ...-
दर्शन झाले पांडुरंगा
उतरला मनाचा भार
आता मागणे काही नाही
चरणी तुझ्या नमस्कार ...
आले भरून डोळे
मूर्ती तुझी पाहताना
कंठ दाटून आला
स्तुती तुझी करताना ...
गेले निवून क्लेश सारे
वारी संगे चालताना
झाले चंद्रभागेचे स्नान
झाली नगर प्रदक्षिणा ...
आज एकादशीचा दिवस
भेट जिवा शिवाची जशी
काया, वाचा आणि मन
आत्मा तुझ्या चरणांशी ...-
चहू बाजूनी आज
दाटला भक्तांचा मेळा
साद घालती एकमेकां
पहाण्या विठू सावळा
सारे सारे लहान थोर
झाले आनंद विभोर
झाले जन्माचे सार्थक
देवा कसे फेडू उपकार
धन्य धन्य ती वारी
धन्य झाला वारकरी
धन्य धन्य ते लोक
जे नित्य राहती पंढरी-