चला उठा चैतन्य प्रभाती
जीवनी नवीन पर्व आले
प्रयत्नांती यश हमखास
सुख संदेश रे देते झाले
-
विनाकारण सतत जर करावी लागत असेल तडजोड
स्वाभिमानासाठी दूरत्व देऊन अशांची मोडावी खोड
स्वतःला दुखावण्याचा अधिकार देऊ नका उपऱ्यांना
विश्वासा न पात्र त्यांच्यामुळे का करा मनाचा हिरमोड
धाडसाने सर्व जाचक खोटी बंधनांची साखळी तोड
प्रयत्नांची पराकाष्ठा उत्तुंग यशाने उत्तर द्यावे सडेतोड
स्वतंत्र स्वच्छंदी घे निर्भयपणे पाखरासम गगनभरारी
ध्येय निश्चय स्वतःसाठी यातनांचा तो गाव मागे सोड
-
नवा विचार चांगला स्विकार जीवन साकार. गेले ते गेले सोडा प्रवाही काळ सांगे प्रवास सुरू ठेवी त्याला यशाचा मार्ग मिळे. गतवर्षाला निरोप देता विचार करा फक्त चांगले काय घडले यावर्षी, लगेच विचारांची गाडी वळवा नववर्षाच्या दिशेला. काय स्वप्न पहायची असा विचार सोडा, देवदूत आला म्हणाला काय हवे यावर्षी तर सांगता आले पाहिजे म्हणून नाही तर आपण जे काय करण्याचे ध्येय ठेवू तिथवर जायला आपले विचार सक्रीय होतील. आशा जागृत होता नकळत मन गाभाऱ्यात चैतन्य आनंद जाणवेल मन पाखरू हर्षित होईल. नव वर्ष स्वागत उत्साहाने करा चांगले शोधा चांगले सापडेल. नववर्ष अद्भूत महालात बारा खोल्या सुंदर आत ३०-३१ खजिन्याच्या पेट्या. पेटीत इंद्रधनुषी अनमोल ३६५ सर्वोत्तम उपहार त्यांची नावे कार्यात यश, नावलौकिक, वैभव, प्रवास, अपेक्षित सर्व स्वप्न पूर्ती, उत्तम आरोग्य, चांगली साथ, मदत, सन्मान, योग्य निर्णय, गुणगौरव, सुख शोधू तसे, आनंद, सुकर्म, सद्गुण, धन इ. इ. अगणित नभीचे तारे जसे. ३६५ दिन प्रवासात मिळणार अर्थात सर्व नाही ओंजळीत मावेल एवढे नक्कीच, जे योग्य ते प्रयत्नांती. टिकटिक ऐकलीत का घड्याळाची वेध लागले कालचक्राला डीसेंबरचा हात सोडून जानेवारीचा हात धरण्याची आपणही गतस्मृतींना विराम देत नववर्षासाठी नियोजन करून प्रगती पथावर हसत प्रवास करू. हाती घ्या लेखणी करा छान आखणी.भेटूया नव वर्षी मिळेल यश जागृत ठेवा आस आणि विश्वास.
-
दूर उंबरठ्यावर उभी गाडी नववर्षात नेणार
चला तयार आहात न सगळे जानेवारी येणार
झटपट आवरा विचारांचे जुने पुराणे पसारे
उत्साहात सज्ज व्हा भाग्याचे चमकतील तारे
मंगलमय पर्व येईल सांगे क्षण क्षण जाता जाता
आस अंतरी जागृत सर्व झाकोळ सरेल रे आता
द्या साथ एकमेकांना उगा कोणी न रहावा मागे
सारे आपले पाहिजे जपले सुंदर मोहमयी धागे
दिली सोबत धन्यवाद जराही मळभ न काही
कालचक्र गतिमान सुसंदेश देत साक्षीला राही
जे मनी लाभो सर्वा शुभचिंतने पूर्ण होवो इच्छा
करू साजरा जल्लोष नववर्षी द्यायच्या शुभेच्छा
-
टिकटिक सरे कालचक्र पहा
देत ओंजळीत आठवण छान
दिनदर्शिकेचे फडफडे पाखरू
डिसेंबरचे उलटते अखेर पान
धावे बदलत्या अंकासवे काळ
जमेस घटना काही कटु गोड
नव्या वर्षी संकल्पनांना जोर
अथक सदैव प्रयत्नांची जोड
नवीन वर्षाची मंगल प्रभात
सुख स्वप्नांची मोहमयी आस
हे करेन ते करेन असे नी तसे
जिद्दीनेच इच्छा पूर्ती हमखास
उत्साहाने सुरू शुभ संकल्प
यशस्वी भव आशिष दे रवी
शुभेच्छांची चैतन्यमयी सकाळ
जीवनी उत्कर्षाची संधी नवी
चला सुहास्य वदनी प्रसन्नतेने
नवीन वर्षात जल्लोष करू
हसत खेळत भेटूया सहज
क्षण क्षण रे लागला फेर धरू
नववर्ष स्वागता सर्वांना शुभेच्छा
छान छान स्वप्नांची इंद्रधनू कमान
यश, वैभव, समृद्धी, सुखकारक
सुंदर बारा महिन्यांचे सुवर्ण पान
@ वर्षा नेरेकर, पुणे-
प्राचीवर केशर उधळण
मंत्रमुग्ध झुंजुमुंजू पहाट
तेजोमय किरणांचे झुंबर
नागमोडी वेलीचा थाट
सुंदर हसता निलपरी
पुष्पवाटिकेत येतो बहर
अन् तराणे छेडण्याची
नटखट वाऱ्यास लहर
पाचू गर्द ताटव्यात
राजस शोभते गोकर्ण
सृष्टी संपदा स्वर्गीय
मोहक निळाशार वर्ण
न सोसे सुर्याचा दाह
नाजूक बावरी काया
लावण्य लतिके भावे
सुखद शितल छाया
सुगंधित सुमन गर्दीत
शिव चरणाची आस
हर्षित चाहूल लागता
कोणी भक्त आसपास
श्यामल कृष्ण प्रसन्न
लाभला त्याचाच संग
वन देवीस प्रिय अनुजा
अपराजिता ती होई दंग
डोले सौख्यात वल्लरी
जलबिंदू नाचे पानात
निळे सौंदर्य लक्षवेधी
लपून छपून राही रानात
@ वर्षा नेरेकर-
घाव देऊन काहींच्या लेखी भावना पाचोळा
काहींच्या भाळी मम मरण पाहिले मी डोळा
जाणून अजाण नाहीच त्या गावचे भासवत
उजळतो मुखवटा जसा भाव साधा भोळा
-
भुत भविष्याची जगताना खाई
वर्तमानासाठी जिंकणे लढाई
सतावे विचार जगतो का खरे
मणभर ताण मनावर चरे
आला जीव गेला होऊ नये असे
सत्कर्म हातात मुखावर हसे
क्षण निसटतो टिकटिक ताल
जगून घ्या थोडे सारे मायाजाल
हर्षित मना रे धर ठेका छान
विजेता होऊन गा यशाचे गान-
जीवन गाणे येणे जाणे अनंता
मोक्षासाठी जन्म प्राक्तन सारे
पुनरपि साखळी होवो खंडीत
यत्किंचित जीवा भोग पसारे
ओळखशील ना समर्पित भाव
भक्तीची ओंजळ झिजली काया
जीवनी भाग्याची वसंत बहार
धन्य जगणे तुझी कृपा छाया
रचत मायाजाल घेतोस परीक्षा
नेत्रात क्षीण प्राण नको शिक्षा
नेई नेई रे सोबत अंती श्रीरंगा
तव नाम दिक्षा दर्शन प्रतिक्षा
प्रपंच कशाचा करू भाव गहिरा
यातायाती तुटावे क्षणी मायापाश
मुक्ती याचनी फडफडे रे पाखरू
भाळी कैवल्याचा चैतन्य प्रकाश
मन गाभाऱ्यात नंदादीप तेजस्वी
कृष्णा मनोहर रूप चित्ती सुदैव
शरयू तीरावर घे सत्कर्माचे अर्ध्य
तव चरणी अर्पण आत्मफूल दैव-