नेसुनिया कद हात कटीवर विटेवरी तू उभा
सोबत नाही रखुमाबाई कसला सवता सुभा
रुसून बसली कोपऱ्यात ती गेली रागावुनी
कर आळवणी जरा प्रियेची देते का बघ मुभा
भक्तांसाठी धावून जासि, वेळ न द्याया तिला
कुढे एकटी मनी, मानिले अर्धांगी तू जिला
ब्रह्मांडाची वाहसि चिंता नित्य कशाला उगा
बोल जरा तू तिच्यासंगती मोद होतसे तिला
उगाच नाही रुसली रे ती पहा जरा ना गडे
किती उत्तरे प्रश्नांची त्या असतील तुझ्याकडे
नको दुरावा दोघांमध्ये होवो एकी अशी
कधी भांडले हे दोघेजण प्रश्न जनांसी पडे
एकाठायी दुसरा वसतो ठाउक असते जरी
दोन शरीरे दिसती सर्वा भौतिक जगती तरी
चाके दोन्ही ओढतात रथ संसाराचा जसा
तसेच तुम्ही दोघे आम्हा आईबापापरी
---- ३१/०३/२०२१-
कुंद पावसाळी हवा
वारा पडलेला तिथे
उभी अजूनी मी आहे
मला सोडलेस जिथे
ढग आहेत थांबले
आभाळात एकवार
आसुसले मन माझे
घाल साद अलवार
वाटेकडे तुझ्या डोळे
तुला भेटण्याची आस
तुझा आधार मजला
जसा चातका पाऊस
नुसतेच झाकोळले
आज नभ पुन्हा असे
नाही पत्ता पावसाचा
तुझे येणे नसे जसे
वाट सारे पाहतात
आला भरून पाऊस
बरसता सरी सख्या
नको दूर तू जाऊस
उमा जोशी १३/०१/२०२१-
भारताला मुक्त केले देउनी प्राणांसही
तोडुनी बेडयांस त्यांनी मुक्त केले श्वासही
आज पुन्हा या स्मरूया वीरवेडे सोबती
तोडले संसार ज्यांनी सांडिले रक्तासही
एक नाही दोन नाही कैक वेडे धावले
भारताच्या मुक्ततेचे स्वप्न वेडे पाहिले
देत गेले आहुतीला यज्ञ पेटे सारखा
तापलेल्या राजमार्गी सोबतीने चालले
मायभूची त्यांनि गीते खात लाठ्या गायली
एकमेका सोबतीने दिंडि त्यांची चालली
त्यांस फाशी होत गेली कैद ही झाली तशी
पौर्णिमेच्या मागुनी ये आवसेची सावली
ना तरी सोडून गेला मुक्ततेचा तो लढा
स्वार्थ नाही; थोर वाटे देश वीराला बडा
भोगल्या त्याने किती त्या जीवघेण्या यातना
इंग्रजांना तोंड देण्या नित्य राही जो खडा
डोलला तो तीनरंगा ,कार्य त्यांचे संपले
स्वर्गद्वारी देव त्यांना भेटण्याला थांबले
पूर्ण झाली साधनाही मुक्त झाली मायभू
गोडवे गाऊ तयांचे देशवासी लागले
--- १२/०१/२०२२-
रात्र उतरता सख्या अंगणी मनी आठवण वसे
चंद्राच्या त्या बिंबामध्ये तुझा चेहरा दिसे
कूस बदलुनी आळविते मी निद्रेच्या देविला
निज येईना काय जाहले मला कळेना असे
थट्टा करसी येऊन स्वप्नि लाज मला वाटते
हळूच हसता गाली सखया प्रीत उरी दाटते
देता अलगद प्रेमालिंगन उमले गाली खळी
आवरून मी स्वतःच सारी लाज दूर सारते
अवखळ गप्पा नजर इशारे दिले घेतले किती
कानी कुजबुज झाली करूनि प्रणयाला ना क्षती
सरते रजनी अन विरहाची समीप आली घडी
कशी सांग मी निरोप देऊ कुंठित झाली मती
सरली रजनी पहाट झाली डोळे मी उघडले
पडले रात्री एक गोडसे स्वप्न मला उमगले
दारावरती थाप ऐकुनी धावत आले पुढे
दारी पाहुन तुला राजसा मिठीत सामावले
---- ३०/०३/२०२१-
सांज होत गोकुळात कृष्ण वेणु वाजवी
धुंद सूर ते असे मनात प्रीत जागवी
वेड लागले मला कळे न काय जाहले
कृष्णरूप साठवून सावळ्यात गुंतले
चांदण्या नभातल्या कशा अबोल चालल्या
शब्द संपले तिथे नि भावनाच बोलल्या
सूर छेडता हरी मनास वेड लागते
वाट वाकडी तरी तुझ्याकडेच धावते
बंध ना उरे मनास ना वसे मनी भिती
प्रेमझूल पांघरून ऊब घेतली किती
गोकुळात आज बोल सर्व बोलती असे
कृष्ण राधिका जणू अजून वेगळी नसे
---२७/०७/२०२१-
वाजविसी पावा कातरवेळी का तू?
कोणता तुझा रे त्याच्या मागे हेतू?
ही सुरावट अशी मोहुन टाकी जीवा
भेटशिल नेहमी वचन मला हे दे तू
यमुनेचे पाणी पुन्हा बोलवे आज
मग ऐकू येते मज लाटांची गाज
पाउले चालती पुन्हा वाट यमुनेची
भेटण्यास येते तुला न करता साज
तव भेटीची मज ओढ लागते खास
मज चहूबाजुनी तुझेच होती भास
धर हृदयाशी मज शरण तुला मी आले
लाभू दे मज तव कृपा विनासायास
--- ०४/०६/२०२१-
ही शीळ घालते संध्याकाळी कोण
भरतात पुन्हा अश्रूंनी डोळे दोन
मग काहुर उठते मनी असे की जाण
पेटतो निखारा अन देहाचा होम
तू असून जवळी भासतोस का दूर
का मनात उठते रोज रोज काहूर
मी कशी सावरू स्वतःस आता बाई
लागते जिवाला काय अशी हुरहूर
नसलास जरी तू सोबत वेड्या ऐसा
आठवांत रमण्या काय लागतो पैसा
आनंद मिळे त्या आठवणींच्या गावी
भेटसी मला तू तिथे पाहिजे तैसा
ढळतो दिन अन ती रात्र खायला उठते
दुःखात सुखाचे गीत रोज मी गाते
परतून इथे ना अता यायचे तुजला
मी पुन्हा एकदा वाट स्मृतींची धरते...
© उमा जोशी २९/०५/२०२१-
होऊन किती गेले असती तवसम कोणी ना विनायका
शपथ घेतली मनोमनी तू पळवुन लावू गोऱ्या लोका
अर्पिलेस तू जीवन देशा संसाराची करून होळी
केलेस किती यत्न परंतु उरे रिकामी तुझीच झोळी
कष्ट सारे तू किती सोसले शिक्षा भोगी काळेपाणी
मार्ग दाखवी सर्व जगाला तरी तुला ना पुजले कोणी
सर्व विसरले त्याग तुझा हा इथे तरीपण तू उरलासी
पटण्या ओळख निजधर्माची झिजवले नित्य तू कायेसी
लोक लावती तुला उपाधी नसे तुला परि इच्छा त्याची
देशधर्म हा असो चिरायू विनायका तव म्हणणे हेची
अखंड भारत स्वप्नी दिसतो ध्यास तुला हा एकच होता
देह पडो मग देशासाठी अन्य मुक्तिचा मार्ग कोणता
चिरंजीव तू अससी वेड्या मरण आहे पावला जरी
असती तेवत मनामनातुन तुझेच विचार हे जनांतरी
हिंदुत्वाची ज्योत मनी रे साऱ्यांच्याही तू पेटविली
अमर जाहला विनायका तू बहुमानाची गरज संपली
---२६/०२/२०२१-
ही वळणदार बघ वाट खुणवते मनास माझ्या आता
हा रस्ता नेई कोण्या गावी पाहू जाता जाता
ना मिळे कुणाला इथे सावली वणवण माथी येते
अन वाटे हाती येता काही वेळ निघूनी जाते
का असेच व्हावे नित्य नेहमी माझ्यासंगे देवा
का वाटत राही दुसऱ्या कोणा मम सौख्याचा हेवा
लागते कशी ही दृष्ट कुणाची नीट सर्व असताना
का पडतो खाली घास सुखाचा मुखाजवळ येताना
होऊन लीन मी तव चरणाशी दान मागते आहे
दे धैर्य मनाला सोसण्यास जे भाळी लिहिले आहे
सारून मागुती भूतकाळ तो पुढे पुढे जाताना
मी सतत रहावे सुखी जीवनी गीत नवे गाताना
--- ०८/०९/२०२१-
मावळतो दिनकर जेव्हा
संध्येची छाया सजते
दिसता तो चंद्र नभीचा
धरणी ती गाली हसते
सांजेला येती सोबत
वाऱ्याच्या शीतल लहरी
गवताची डुलती पाती
रात्रीच्या पहिल्या प्रहरी
यमनाच्या सुरेल ताना
गुणगुणतो परिसर सारा
भेटीला चंद्र धरेच्या
आतुरला निसर्ग सारा
पाहते धरा चंद्राला
साठवते प्रतिमा त्याची
इतकीच भेट ती होते
क्षितिजावर त्या दोघांची
--- १८/०५/२०२१-