खेचून पाय ओढीसी मागे, स्वार्थासाठी...
स्वकीयास आपल्याच, असा कसा रे माणसा तू.. ।
नाही जगी नृप कोणी, नसे कोणी सदैव रंक...
श्रीमंत गरीब मग अंतर असे का लावीलेस आज तू.. ।
आपुल्याच रणी मांडलास खेळ, रक्तरंजित देहाचा...
उभा सामोरी आपलाच आहे, वार तरी का केलास तू..।
कुंपण काट्यांचे दारी लावीलेस, रोख ती आपल्यांसाठीच...
गरज असता प्रसंगी त्यांची, मग का दार ठोठावतोस तू..।
इथेच जगणे सोबती आपले, अखेर जीवन काठापर्यंत...
भाव परकेपणाचा तरीही का मनी आणतोस तू... ।
नको पत्करू वैर असा, माणसा तू माणसाशी...
विलग जगणे अशक्य सदा, हेच नेमके विसरतोस का तू..।
भान मनी ठेव जरा, जाण आपल्यास तू...
वाग माणसाशी माणसासम शेवटी आहे माणूसच तू..।-
साद घाली तुझी बासरी
शांत निजलेल्या त्या राधेला
होती खूण ती भेटण्याची
यमुनातिरी सांज वेळेला...
सुमधुर स्वर तुझ्या बासरीचे
ऐकून उठली दचकून राधा
निघाली लगबगीने यमुनातिरी
जडली तुझ्या प्रीतीची तिला बाधा
येताच यमुनातिरी ती
शोधे तुला होऊन कावरीबावरी
दिसत नव्हता कुठेच तू
ऐकू येत होती फक्त तुझी बासरी
हे मनमोहना....
देत होती हाक अंतरी
ये समोर असा माझ्या
झाले व्याकुळ मी कितीतरी...-
आई, सोसल्या असंख्य तू कळा
झाला जन्म माझा तुझ्या पोटी
कसे करू उपकार तुझे व्यक्त
तुझ्यावर मी लिहू किती...
पानही पडतील लिहिण्या कमी
आहे इतकी मोठी तुझी महती
काय लिहावे तुझ्यावर मी आज
लेखणीही नाही थांबत माझ्या हाती...
तुझ्यावर लिहिताना निःशब्द व्हावे
आहे तुझी इतकी महान कीर्ती
खरच आहे ते शब्दही झुकतील
आई तुझ्या त्या चरणांवरती...
अनंत जन्माचे सार्थक झाले
जन्मलो या जन्मी मी तुझ्या पोटी
परत परत असेल जर हा जन्म
तर लाभावी मला तुझीच ओटी...-
करावी मी तिच्यावर कविता
अस तिलाही वाटत
कदाचित् अचूक ओळखले तिने
माझ्या मनात जे दाटत...
ऐक प्रिये, मी तुला
बोलण्यापेक्षा तुलाच
ऐकायला मला आवडत
सारख ऐकतच रहाव वाटत...
माहीत नाही कारण
पण तुझ्यातच गुंतून जाव वाटत
लेखणीलाही माझ्या आजकाल
फक्त तुझ्यावरच लिहायला आवडत...
शब्द ही माझे
तुझेच गुण गात आहेत
असुनही माझ्या जवळ
भोवती तुझ्याच ते फिरत आहेत...-
येतील संकट वाटेत अनेक
मदतीची कोणाच्या वाट पाहू नका
चालता चालता अचानक तुमच्या
थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका
थांबल्या वाटा जरी त्या
शोध स्वतःचा कधी थांबवू नका
कधी येईलही राग स्वतःचा स्वतःला
पण क्षणात सारे कधी संपवू नका
चालता चालता येईलही थकवा कधी
समजून अपयश त्याला खचून जाऊ नका
अपयश हा वाटेतला सखा आहे
भेटला कधी तर हिरमुसून जाऊ नका
आधी येणारा तुमच्याकडे तोच आहे
घाबरुन त्याला कधी वाट सोडू नका
यशाकडे नेणारा तोच आहे
योगदान त्याचे कधी विसरून जाऊ नका.-
असतात काही आठवणी
मनाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या
जपून पापण्यांच्या आड
सोबत अश्रूंच्या डोळ्यात साठवलेल्या...
असतात काही क्षण
मनाच्या कोपऱ्यात जपलेले
पिंपळाच्या जाळीदार पानासारखे
पुस्तकात आयुष्यभर जपलेले...
असतात काही व्यक्ति
मनाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या
आपल्या जरी झाल्या नसल्या
तरी आयुष्यभरासाठी आपल्या मानलेल्या...
असतात काही गोष्टी
मनाच्या कोपऱ्यात रुतलेल्या
कितीही दूर करण्याचा प्रयत्न केला
तरी राहतातच आपल्या मनात गुंतलेल्या...-
जगून घे दिवस आजचा
तो कधी परत येणे नाही!
नको मरणाची वाट धरू
पुन्हा हे जगणे नाही!!
तारे नभातले मिटल्यावर डोळे
तमा शिवाय काहीच दिसणे नाही!
कर प्रत्येक क्षण हसरा तुझा
गेलेला क्षण परत येणे नाही!!
आलेल्या संधीचे सोने कर
तो सोनेरी क्षण पुन्हा येणे नाही!
नको जाऊ बुडून स्वार्थात
स्वार्थातून बाहेर कधी पडणे नाही!!
छोट्या छोट्या गोष्टीत हसायला शिक
रडताना कधी हसू ओठी येणे नाही!
नको मरणाची वाट धरू
पुन्हा हे जगणे नाही!!-
बाबा मला हवीये तुझी सोबत,
आयुष्याची या लढाई लढताना
लढता लढता हरलो जर कधी
लढायला मला पुन्हा करताना...
बाबा मला हवीये तुझी सोबत,
जीवनाची या ती काटेरी वाट चालताना
चालता चालता टोचला एखादा काटा पायी
तर मायेच्या स्पर्शाने तो हळूच काढताना...
बाबा मला हवीये तुझी सोबत,
आयुष्याच्या या शेवटच्या क्षणापर्यंत
राहू दे असाच तुझा हात माझ्या हाती
असेल माझ्या श्वासात श्वास जोपर्यंत...
बाबा मला हवीये तुझी सोबत,
आयुष्याची या जग रहाटी शिकताना
नको जाऊ तू कधीच दूर माझ्यापासून
सहवासात मला सोबती कोणीही नसताना...
बाबा मला हवीये तुझी सोबत,
शेवटच्या क्षणी मिठीत तुझ्या मी मरताना
नको वाहून देऊ आसवांना तेव्हा तू
सरणावर त्या मी जळून राख होताना..-
निळ्या नभाची निळाई तिच्यात
कधी दाटल्या मेघांचा रंग काळा तीचा
मावळत्या सूर्याची लाली तिच्यात
कधी रंग हिरवा ती डोंगर दऱ्यांचा...
आहे वसलेली ती लेखणीत
शब्द मनातला माझ्या सखा तो तीचा
भासे दुसर्यास फक्त ती शाई
पण आहे ती माझा प्रवाह अंतरीचा...
असो रंग कसाही तिचा
आहे सहवास सोबती जन्मांतरीचा
कधी खडतर कधी सोप्पा
असेलही कदाचित प्रवास तो आमचा...
भेट आमची जणू
लाभल वरदान त्या निसर्गाच
निःस्वार्थपणाच नि संयमाचं
असच राहो कायम हे नातं आमचं...
-कविराज-
दिसतो फक्त हसरा चेहरा
नाही दिसत त्यामागची सल
नाही मिरवत कधीच मी
माझ्या मनातली हलचल...
जसा आहे तसाच राहतो
नाही करत कुणासमोर उकल
त्यामुळेच कुणाला नाही समजत
माझ्या मनातली हलचल...
असता क्षण माझा दुःखाचा
कोण मला नि का शोधल
मग समजेल तरी कशी
माझ्या मनातली हलचल...
जाणतो मी सर्वांना चांगलाच
उद्या वेळही त्यांना धडा शिकवेल
म्हणुनच प्रत्येक क्षणी जपतो मी
माझ्या मनातली हलचल...-