#उभी #एकटी
बुडे केशरी बिंब संध्या तळाशी,
तमाच्या नभी आहुती ती पडावी!
घडे रोज ऐसी क्रिया ती जळाशी,
जळोनी समीधा उराशी उरावी!
तुझ्या संगतीने जगावे असे मी,
पुसाव्या गताच्या खुणा वेदनेच्या!
तुझा गाव सोडून जाऊ कुठे मी,
लळा लागला रे तुझ्या अंगणाचा!
घुमे पारवा दूर रानांत जेथे,
वसंतास तू सांग ना थांब तेथे!
जिथे वाहते प्राण वेल्हाळ नाते,
तिथे मी ऋतूंच्या सवे गीत गाते!
सुगंधी तुझे श्वास माझ्या सभोती,
मनाला तुझे पाश वेढून घेती!
सुटे हात हातातला तो सख्या रे,
तुझे सावळे भास दाटून येती !
कसा आवरू मी मनांचा पसारा,
उभी एकटी ना कुणाचा सहारा..
कशी सांग सोसू उरी वेदना ही,
कसा कोण देईल यांसी उतारा?
(डॉ.सौ.वैशाली गोस्वामी-कुलकर्णी)
#गोदातीर्थ-
30 MAR 2021 AT 17:51