अष्टलक्ष्मी नमोस्तुते!
श्री.प्रकाश कुलकर्णी
डॉ.सौ.वैशाली गोस्वामी-कुलकर्णी-
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला।
स्वपुत्रांस दे जी कृषी चालवाया।
परमपूज्य जी वंद्य या भारताला।
नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला॥
🙏🚩🙏
दिवाळीतल्या
गोवत्स द्वादशीच्या सानंद शुभेच्छा!
🌹🙏🏻🌹-
मनांमनांतील आसुरा मर्दून,
नवरस फुलवू नवरात्रीतून!
लुटून सोने; करू साजरा,
विजयोत्सव हा; शुभ दसरा!
-
ती आशेने थरथरते!
ती वेल बिलगली होती,
घनदाट उभ्या वृक्षाला...
मोहरली फुलली आणिक,
भोगीतच तृप्त सुखाला..!
घोंघावत वादळ आले,
वेलीची मिठीच सुटली...
अन् झाड असे उन्मळले,
रेशमी बंधने तुटली...!
उध्वस्तच स्वप्न उरांशी,
कवटाळून आता जगते...
येता चाहूल जराशी,
ती आशेने थरथरते......!!!
( #गोदातीर्थ #उद्धव वृत्त)
डॉ.सौ. वैशाली गोस्वामी-कुलकर्णी-
#अभागीच_मी!
आजीवन का दु:ख भोग मज दोष कुणाचा असे?
संसाराचे,भोग सुखाचे प्राक्तनांत का नसे?
उभा जन्म वनवास, वेदना विरहाने पोळले
आनंदे सुख भोगिन म्हणता जनवादे जाळले
मनांत वाटे वनांत जावे ऋषी-मुनींच्या कुटी
डोहाळे पुरविले, पडे की आप्तजनांची तुटी!
अभागीच मी, मी दुर्दैवी दु:ख कुणा दाखवू?
रघुकुलदीपक उदरी माझ्या सांग कसा वाढवू?
कैसा साहू घाव लक्ष्मणा पातिव्रत्य हे जरी
पतिचरणांचे दर्शन आता स्वप्नच केवळ उरी!
प्रारब्धाच्या पुण्य-पटावर कर्माची मज भिक्षा
जन्मा येण्या आधी माझ्या बाळा तुजला शिक्षा!
डॉ.सौ.वैशाली गोस्वामी-कुलकर्णी
#गोदातीर्थ
#वृत्त-समुदितमदना-
#तूच #दिननिशी
कातरवेळी संध्यासमयी,
धरतीवरती भूल सावळी...
क्षितिजावरती दाटुन येई,
तुझी निरागस कृष्ण सावली...!
घनतिमिरातुन निशा झरतसे,
मिटून घेशी जणू लोचने...
विश्वाची मग रात्र सरतसे,
जीव विसावे सुखनिद्रेने...!
ढळे नभी शुक्राचा तारा,
गोड हसू ओठांवर उमटे...
गार वाहतो पश्चिम वारा,
प्रभातकाली तांबडे फुटे...!
तू संध्या अन् उष:कालही,
जळे प्रहर जो माध्यान्हीचा
तुझीच रूपे ऋतूकालही....
नायक तू या रंगपिठाचा...!
(वृत्त-पादाकुलक)
डॉ.सौ.वैशाली गोस्वामी-कुलकर्णी
#गोदातीर्थ
-
#तुझीआठवणयेतेतेंव्हा
तुझी आठवण येते तेंव्हा,
मनडोही या तरंग उठती..
क्षण अगणित ते सुख-दु:खाचे,
मनी-मानसी दाटुन येती...!
आठवणींचा सुखद स्पर्श तो,
गर्भ रेशमी तलम मुलायम...
कधी होतसे दाह विखारी,
कधी वेदना दु:ख विदारक...!
तुझी आठवण येते तेंव्हा,
देह परिमळे चंदनगंधी..
स्मरणकुपीतून अत्तर सांडे,
दरवळ तो अंतरी सुगंधी...!
( # वृत्त #पादाकुलक
#गोदातीर्थ )
डॉ.सौ.वैशाली गोस्वामी-कुलकर्णी-
#शून्यच #होऊन #उरते!
रेंगाळत ही स्मृतीशृंखला..तुझ्याभोवती अविरत फिरते,
गतकाळांतील जुने-पुराणे मधुर..तराणे मी गुणगुणते...!
क्षितिजावरती मावळतीला..चांदणे-चंद्रिका खुणावते,
कैवल्याच्या प्राप्तीसाठी.. अद्वैताची वाट पाहते...!
किती गुंफिल्या मौक्तिकमाला..स्वप्नांचे किती रंग उधळले,
ओघळले ते मोती आणिक..स्वप्नरंग ते विरून गेले...!
सागरतीरी वाळूवरती..मिळुन रेखिली अक्षरलेणी,
खोल तळाशी ने वाहून त्यां..लाटांचे ते कराल पाणी...!
गूढ अनामिक नाद अनाहत..अजून मजला ऐकू येतो,
अजून सखया व्याकुळ करतो.. सहवासाचा स्मरणगंध तो...!
भूल सुखाची अवती भवती.. काळ तरीही ओढून नेतो,
चुकला नाही कधी कुणाला..असीम त्याचा मरणबंध तो...!
आयुष्याची वाट हरवली..दिशाहीन परि शोधत फिरते,
शोध कुणाचा वाट कुणाची..नकळत माझ्या; मी भिरभिरते...!
जीव वाहतो देहभार तो.. विकल मानसी सखया झुरते,
पंचभुतांचा शून्य पसारा..शून्यच होऊन उरांत उरते.....!
#वृत्त #वनहरिणी #गोदातीर्थ
डॉ.सौ.वैशाली गोस्वामी-कुलकर्णी-
#प्राक्तन #माझे #लिहू #पाहते!
कभिन्न काळ्या काळपटावर,
प्राक्तन माझे लिहू पाहते...
विषण्ण जीवन तुझ्या तटावर
घटाघटांतुन जणू वाहते...!
स्वप्न होऊनी आशा फुलते,
आकाशीचा कंदिल रंगित...
प्राणदिव्याची ज्योतहि झुलते,
नादमयी श्वासांचे संगीत...!
काढिन म्हणते सुंदर नक्षी,
विश्वाच्या विस्तिर्ण अंगणी...
जिथे कीर्तनी रंगून गेले,
ज्ञाना,नामा,दास रंगणी...!
भाळावरती टिळा पुरे जो,
बदलून टाकील प्रारब्धाला...
या मातीचा स्पर्श पुरे जो,
अर्थ देतसे तो जगण्याला..!
( #वृत्त- #वनहरिणी, #गोदातीर्थ)-
#उभी #एकटी
बुडे केशरी बिंब संध्या तळाशी,
तमाच्या नभी आहुती ती पडावी!
घडे रोज ऐसी क्रिया ती जळाशी,
जळोनी समीधा उराशी उरावी!
तुझ्या संगतीने जगावे असे मी,
पुसाव्या गताच्या खुणा वेदनेच्या!
तुझा गाव सोडून जाऊ कुठे मी,
लळा लागला रे तुझ्या अंगणाचा!
घुमे पारवा दूर रानांत जेथे,
वसंतास तू सांग ना थांब तेथे!
जिथे वाहते प्राण वेल्हाळ नाते,
तिथे मी ऋतूंच्या सवे गीत गाते!
सुगंधी तुझे श्वास माझ्या सभोती,
मनाला तुझे पाश वेढून घेती!
सुटे हात हातातला तो सख्या रे,
तुझे सावळे भास दाटून येती !
कसा आवरू मी मनांचा पसारा,
उभी एकटी ना कुणाचा सहारा..
कशी सांग सोसू उरी वेदना ही,
कसा कोण देईल यांसी उतारा?
(डॉ.सौ.वैशाली गोस्वामी-कुलकर्णी)
#गोदातीर्थ-