#अभागीच_मी!
आजीवन का दु:ख भोग मज दोष कुणाचा असे?
संसाराचे,भोग सुखाचे प्राक्तनांत का नसे?
उभा जन्म वनवास, वेदना विरहाने पोळले
आनंदे सुख भोगिन म्हणता जनवादे जाळले
मनांत वाटे वनांत जावे ऋषी-मुनींच्या कुटी
डोहाळे पुरविले, पडे की आप्तजनांची तुटी!
अभागीच मी, मी दुर्दैवी दु:ख कुणा दाखवू?
रघुकुलदीपक उदरी माझ्या सांग कसा वाढवू?
कैसा साहू घाव लक्ष्मणा पातिव्रत्य हे जरी
पतिचरणांचे दर्शन आता स्वप्नच केवळ उरी!
प्रारब्धाच्या पुण्य-पटावर कर्माची मज भिक्षा
जन्मा येण्या आधी माझ्या बाळा तुजला शिक्षा!
डॉ.सौ.वैशाली गोस्वामी-कुलकर्णी
#गोदातीर्थ
#वृत्त-समुदितमदना-
10 MAY 2021 AT 23:30