लेक लाडकी या घरची लाडकी त्या घरी होईल का
दोन्ही घराला ही नार कधी पारखी होईल का ?
लेक लाडाची जरी धन म्हणवून जपले दुसऱ्याचे
दिल्या घरची ठेव म्हणून तुटतील का बंध जन्माचे
गृहलक्ष्मीच्या शुभ पायांनी आणतील जेव्हा घरात
जरातरी किंमत अस्तित्वाची ठेवतील का मनात
बहरते दारी तुळस जसा असतो तिचाही सन्मान
दारी सजल्या रांगोळीलाही असतो तिचा एक मान
पुजली जाते राना वनात ती उजणारी काळीमाती
नारीमध्ये कधीतरी पुजली जाते देवीची अंशमृर्ती
झिजते चंदन परी सुगंध झिजण्याचा दरवपळतो
नारीत वसल्या जीवाचा अर्थ जगाला कुठे कळतो
विसरून साऱ्या सद्वृत्तीला मी छळली जाईल का
दोन्ही घराला ही नार कधी पारखी होईल का ?
सौ. सुप्रिया
-
दोघी त्या भाळल्या । राधा कृष्णावरी ।
मीरा कृष्णावरी । अंतरंगी ॥
राधा असो मिरा । श्रेष्ठ ना कनिष्ठ ।
दोघी एकनिष्ठ । कृष्णदासी ॥
महान त्या हस्ती । राधेची ती प्रिती ।
मीरेची ती भक्ती । विविधांगी ॥
दोघींचा तो त्याग । सगुण सात्विक ।
ध्येय असे एक । कृष्णमय ॥
एक झाली प्राण । मीरा ती महान ।
देता झाला मान । नारायण ॥
सावळा ते रूप । करी अंतर्मुख ।
न उरे आणिक । मनोभाव ॥
नित्य घडो सेवा । चाखो नाम जिव्हा ।
पहावा तो कान्हा । हेची सुख ॥
पुजावी ती भक्ति । स्मरावी ती प्रिती ।
व्हावी कृपा प्राप्ती । जन्मो जन्मी ॥
सौ. सुप्रिया
-
ये रे घना ये रे घना ये धाऊनी असा
होऊ दे धरणीवरती सरींचा जलसा
अमृताचे थेंब सांडता मातीत बेधुंद
क्षणात दरवळतो दाहीदिशांना मृद्गंध
खिन्न झाल्या पानांना हिरवा रंग चढु दे
इवल्या या रोप वेलींना बाळसे धरू दे
मिळे दे फळाफुलांना टवटवीत तजेला
मिटव तृष्णा थेंबासाठी आतुर जाहल्या
नाचू दे फुलवून पिसारा मयुरास आनंदाने
आनंद सरी भेट दे वाट पाहिली चातकाने
स्वछंद गाऊ दे निर्झरा खळखळत्या सुरांनी
दरीखोऱ्यांना बागडु दे कोसळणत्या धारांनी
ये रे घना ये घेऊनी काळ्या काळ्या लहरी
हिरवाईने नटवून दे हो सुंदर सृष्टी साजिरी
सौ. सुप्रिया
-
साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला
प्रथम तुज पाहता सखे जीव वेडावला
चंद्रिका कुणी जणु उतरली धरणीवरी
स्वप्नपरीची प्रतिक्षा आता संपली खरी
गालावरची लाज जशी सजली गुलाबी
ओठी परसला रंग रसाळ लाल डाळिंबी
मऊ रेशीम कांती रंग ल्याली मोतीयाचा
शोभून दिसतो गालावरती नखरा बटीचा
सौंदर्याचा साज अति मोहक दिसे तनुला
सांग आवरू कसा मी भाळलेल्या मनला
फक्त तुझा हात दे हातावरी जन्मांतरी
आस एवढीच ती जागली आता अंतरी
सौ. सुप्रिया
-
शांतता जाळते मनाला एकांत वाटे असह्य
फिरले वासे काय घराचे सुटेल वाटते धैर्य
गोकुळ होते नांदत जेथे नांदते तिथे खिन्नता
उजाड वाटे प्रांगण तेव्हा जत्रेची वर्दळ संपता
उनाड मन पाखरू घिरट्या घाली काळाभोवती
हतबल झाल्या देहाला आठवांचे पहारे छळती
बहर होता ऋतुबादाचा हिरवळ कुठे सजते दारी
सणांची रेलचेल तरी ती मनास आता देत उभारी
नको असे ते घरटे तुमचे दुरदेशीचा वृक्षावरती
या चिमण्यांनी परत फिरा आपूल्या मातीवरती-
मी आज फूल होऊनी वाटे धन्य झाले
होऊनी माळ गळा देवा वाटे अनन्य झाले
गंध ल्याले मोगऱ्याचा पातळ शुभ्र पांघरूण
श्वासात भरता सुगंध तो वाटे प्रसन्न झाले
तमा न आता काटयाची गुलाब झाले प्रतिचा
मनाशी मनाचे नाते जुळता वाटे वचन झाले
जन्म जरी क्षणाचा काय योजने प्राक्तन लिहिले
जेव्हा अनंताचा प्रवास घडतो वाटे सांत्वन झाले
भाग्य होऊनी आध्यात्माचे चरणी मिळता ठाव
समर्पित होता कृष्ण अवतारी वाटे निष्पन्न झाले-
मन धागा धागा गुंतत जाई
गुंता कसा भावनांचा करितो बाई
किती जन्म आले किती जन्म गेले
झाली तरी ना या भोगाची भरपाई
कर्मामुळे हा माणसा जन्म झाला
म्हणे भाग्य तरीही लिहिते आक्काबाई
जाळतो दंभ क्रोध अन् वासना फास घाली
आत्मघातकी मानवा आवरेना धिटाई
लोभ माया व्यर्थ सारी मोह मृगजळा परी रे
सुख संपत्तीवर सदाही भाळली नवलाई
आयुष्या किती देशी उपदेश सार्थ
संपेना कशी तरीही अहंकार दांडगाई
सौ. सुप्रिया
-
भेट तुझी माझी
ऐट तुझी माझी
पाहत होता काळ
परतभेट तुझी माझी
जोडी तुझी माझी
गोडी तुझी माझी
सोडवत होतं मन
कोडी तुझी माझी
प्रीत तुझी माझी
रीत तुझी माझी
रचत होतं भाग्य
भाकित तुझी माझी
कथा तुझी माझी
प्रथा तुझी माझी
अडकली विवाहात
गाथा तुझी माझी
सौ. सुप्रिया
-
हमने तुमसे वफ़ा मांगी
ऐ हमदम कई दफ़ा मांगी
हमे एतबार था आपपर
ना बेरुखी की सफ़ा मांगी
हम करते रहे बस प्यार
सोहबत क्या बेवफ़ा मांगी
ठुकराके चल दिए हमको
जैसे उम्रभर जफ़ा मांगी
और क्या ही शिकवा करे
हमसे ज़िंदगीने खफ़ा मांगी
-
आवरू कसा मी सांग प्रिया
ओढ लागली मना माझिया
गुज मनीचे तुला सांगण्या
अधीर मन झाले भेटावया
पाहता तुला भारावलो असा
भास तुझा होतसे रात्रंदिवसा
वाटे होऊनी आता प्रिये बावरा
शोधतो प्रितीचा जणु कवडसा
उपमा अलंकार शब्दमैत्र कोणते
सजे काव्य मनी कसे अजाणते
ऐकता तु अशी पापणी लाजली
रूपास तुझ्या का साजिरे सांग ते
अवचित येता समोर तु अशी
होतसे जादू मजवरी ती कशी
गीत होती जणु शब्द ओठांवरी
गुणगुणावी कविने कविता जशी
सौ. सुप्रिया
-