गझल - खंजीरे (माणसे)
पाठितला प्रत्येक वार अजूनी ताजाच आहे
तो अपराध खंजीराचा तरीही साधाच आहे
मी पाळली खंजीरे,कवटाळली उराशी माझ्या
विश्वास इतुका खंजीरावरही माझाच आहे
तू दिलेल्या जख्मांवरही तेवढेच प्रेम केले
हसत राहिलो मी माझा गुन्हा इतकाच आहे
सखे करू नकोस तू उगाच काळजी सख्याची
सभोवती हजार गोपिका हृदयी राधाच आहे
आहे दिवाळी तयांची अमुची घरे जाळूनी का
समजू नका मी संपलो अजूनही राजाच आहे
डोळ्यांवर भाबड्या विश्वास अता राहिला कुठे
नजरेने घायाळ होण्याचा तो इरादाच आहे
अता कशाला ही सोंगे आपुलेपणाची मांडली
जिव्हाळा कधीच संपला हा फक्त धागाच आहे
✍️सुनिल नायकल
-
घराचे छत न्याहाळताना,तुझी आठवण येते
का ती मला ओवाळताना,तुझी आठवण येते
अन् पुन्हा पुन्हा मी अडगळीच्या खोलीत बंद होतो
मलाच मी पुन्हा चाळताना,तुझी आठवण येते
आजही मला उरातला माझ्या,घरातला माझ्या
मी पसारा सांभाळताना,तुझी आठवण येते
थांबतो कधी अचानक,मी वळतो कधी अचानक
पाय उगीच रेंगाळताना,तुझी आठवण येते
उरतो कुठे मी माझा,चांदण्यात चिंब भिजताना
रात्रीस नभ फेसाळताना तुझी आठवण येते
-
खुशाल जाळा मला, इथे राम कुणी असेल जर का
दुष्टं म्हणा रावणा, इथे राम कुणी असेल जर का...!-
त्यांचे खंजीर काळजात घुसले अन् फुल झाले
बघता बघता ते माझ्या असण्याची चाहूल झाले
@ सुनिल नायकल-
गझल - पूर
कशी वेदना मांडू शब्दही भिजले रे मित्रा
काल रात्री झोपेतच स्वप्न विझले रे मित्रा
पुराचे पाणी डोळयांमधूनी ओसांडून गेले
अन् आमुच्या काळजाचे बांध खचले रे मित्रा
हे घर संसार सोडा,गुरे माणसेही सोडा
साऱ्या जाती धर्मांचे देवही बुडले रे मित्रा
केली होती याचना पावसाने यावे म्हणोनी
घेईल मनावर तो नाही वाटले रे मित्रा
विमाने फिरवूनी का,येतो अंदाज खोलीचा
मनाच्या खोल तळाशी,पाणी भरले रे मित्रा
पाहूनी अता पाण्यास,बंद बाटलीतल्याही
भीतीने आजही मन,हे शहारले रे मित्रा
@सुनिल नायकल
-
तुझी आठवण आली उदास सांजवेळी
नभी पसरली लाली उदास सांजवेळी
डोळ्यातल्या आठवांचा सूर्य मावळताना
मी नसे माझ्या हवाली उदास सांजवेळी
किलबिल पाखरांची थांबली का कळेना
कोण गाते हि कवाली उदास सांजवेळी
मीच तो प्रवासी सुनसान वाटेवरचा
ते समजले मवाली उदास सांजवेळी
जळाला जरी तो आकाश भर जगासाठी
कुणी ना तयास वाली उदास सांजवेळी
अजून मी विझलोच नाही तरीही कशा
त्यांच्या पेटल्या मशाली उदास सांजवेळी
✍️सुनिल नायकल-
गझल-दुःखांना बिलगायचे मला
एकदा इथे माझ्या दुःखांना बिलगायचे मला
एवढे सोपे नाही जगणे शिकवायचे मला
बळ इतुके दिले दुःखांनी हसायला येथे
अन् त्या सुखांचे बेत फसले रडवायचे मला
मी कधी संपलो ते कळलेच नाही मला इथे
शेवटी राहिले जीवना रे घडवायचे मला
मी जुळवत गेलो माणसांना कालही आजही
अन् तयांनीच सोडले नाही उसवायचे मला
तेंव्हा तुझे घर, तुझे शहर सोडून जाताना
का तुलाही जमलेच नाही अडवायचे मला
पुन्हा पुन्हा उठूनी जीवना समोर उभा होतो
सहज जमेल कसे त्यांना हरवायचे मला
तसा माणूस माझ्यातला गेला मरून कधीचा
अता राहिले फक्त या जगाने जाळायचे मला
होऊ दे उपयोग माझ्या येण्याचा एवढा तरी
झाड होऊनी तुझ्या मनात उगवायचे मला
- सुनिल नायकल-
शर्यत
आपुले म्हणावयाला उरलेच कोण येथे
आयुष्याला कुणाच्या पुरलेच कोण येथे
कुठे निघाली हि पालखी माझ्याशिवाय माझी
सागरातूनी मायेच्या तरलेच कोण येथे
तयांच्यासाठी केली राख माझ्या घराची तेंव्हा
अनाथ शवास माझ्या रडलेच कोण येथे
कसे खोटेच ठरले आभास वेड्या मनाचे
मी झुरलो असा तेंव्हा झुरलेच कोण येथे
झाले कसे जिणे शर्यत हरण्या - जिंकण्याची
तरीही जिंकले कोण हरलेच कोण येथे
- ️सुनिल नायकल-
गझल - असेच घडते का हो
प्रत्येकाच्या कथेत इथल्या असेच घडते का हो
कधी अचानक जुने नव्याने येऊन भिडते का हो
मावळतीच्या उंबरठ्यावर पंख नवे फुटती
विसरूनी भानं जगाचे मन उनाड फिरते का हो
कधीच वाटा मागे गेल्या जाणाऱ्या त्या दिशेने आता
पुन्हा पुन्हा फिरून तरीही नजर वळते का हो
कुठे राहिले दिवस आता ते कुठे राहिल्या रात्री
रात्ररात्र या देहाची वात होऊनी जळते का हो
दोघांचेही हसून बोलणे वरवरचे होते का
हा हुंदका कुणाचा आत इथे कोण रडते का हो
काळजाच्या आत होते लपवूनी ठेविले त्यांना
बंद होते आजवर दार पुन्हा उघडते का हो
✍️सुनिल नायकल-
गझल - असेच घडते का हो
प्रत्येकाच्या कथेत इथल्या असेच घडते का हो
कधी अचानक जुने नव्याने येऊन भिडते का हो
मावळतीच्या उंबरठ्यावर पंख नवे फुटती
विसरूनी भानं जगाचे मन उनाड फिरते का हो
कधीच वाटा मागे गेल्या जाणाऱ्या त्या दिशेने आता
पुन्हा पुन्हा फिरून तरीही नजर वळते का हो
कुठे राहिले दिवस आता ते कुठे राहिल्या रात्री
रात्ररात्र या देहाची वात होऊनी जळते का हो
दोघांचेही हसून बोलणे वरवरचे होते का
हा हुंदका कुणाचा आत इथे कोण रडते का हो
काळजाच्या आत होते लपवूनी ठेविले त्यांना
बंद होते आजवर दार पुन्हा उघडते का हो
✍️सुनिल नायकल-