सतिश कुलकर्णी   (सतिश)
318 Followers · 95 Following

read more
Joined 8 March 2019


read more
Joined 8 March 2019

पूर्वमुखी छान दिसे चिरेबंदी मोठा वाडा
रम्य छोटा वाहतसे समोर पठारी ओढा

मोठे पिंपळाचे झाड मुंजोबाही अग्नेयास
गोड पाणी खोल आड समोरच अगत्यास

अंगणात दोन गोठे गुरे दावणी पुष्कळ
लाल्या नाग्या बैलांसवे गाई म्हशीही बक्कळ

ओसरीची काय शोभा तसबीरींची हो ऐट
भारतीय बैठकीचा सुंदर दिसतो थाट

चौक मोठा मध्यभागी चार बाजू खोल्या चार
कोठीघर माजघर पाकघर देवघर

भांडी पितळ तांब्याचे रेखीव सुंदर खूप
धान्य सारेच घरचे दूध दही शुद्ध तूप

आजोबांची चालतसे देव पूजा मंत्रोच्चारी
सोवळ्यात आज्जीकरे स्वयंपाक चुलीवरी

प्रसन्नचित्त होतसे वाड्याचे वातावरण
घमघमाटी वासाने शिजे आमटी पूरण

मामा राबे शेतामध्ये शिदोरीला मामी जाई
सांजवेळी परतून बैलगाडी सवे येई

-



आत्मप्रौढी हे विष भेसूर
मैत्री नष्टवी हा भस्मासुर

कुणी पाहिले जग उद्याचे
भोग इथेच फळ कर्माचे

विसरा भांडण विसरा तंटा
मोडुन काढा नकार घंटा

कोणा अहंता विजयी साज
ऐक मना आतला आवाज

-



चिऊ

चिमुकले ते रूप हर्षवी
स्मित हास्य ते मधुर लाघवी

कोमल कांती नाजूक काया
तुम्हा बोलवी इकडे या या

नजर चिमणी इवली बोटे
फुटता टाहो बोचले काटे

दिसता माऊली भूक लागते
गप्पा रंगती आज्जी संगते

दादाची नाही ओळख पटली
दीदी मारते नेहमीच टपली

काका मावशी खेळतात छान
मीही दमते उचलून मान

मलाही नेतील भुर आजोबा
मस्ती करतील माझे बाबा

-




नको नकोसा तो झालेला
हवाहवासा कधिकाळाचा
गतवैभव ते कुरवाळूनी
विचार करतो प्रतिपाळाचा

अशाश्वताची शाश्वत चिंता
अष्टोप्रहरी छळे अनावर
अनुध्वनी तो सतत यद्यापि
जुनाट होणे सले मनावर

पुन्हा नव्याने लक्ष साधण्या
नित्य नवे मग करे उपक्रम
आणि जगावे भूमिकेतून
हिरा समजून कशास संभ्रम

-



शुष्क काष्ठ तन मन केवळ
गुरुकृपा प्रसादे बनते चंदन
शुभाशिष राहुद्या मजवरी
तुम्हा गुरुवर्या माझे वंदन.

-



बाबा कधी कळलाच नाहीस तू
कोंदण करून घेतले स्वतःस तू

सुख आम्हा आंदण्या या जगती
कळले आज परी तुझ्या मागुती

सर्व सुखे आम्हास सोडूनी मेला
दुःखास मात्र तू सवे घेऊन गेला

मुक्त तुझी बाळे पण तुज खेवा
तुझी रीत सुध्दा आवडली देवा

तुझ्यासारखे जगणे कठीण वाटे
लेकरे सुखी तुझ्या नशिबा काटे

प्रयत्न माझा राहील तुझ्या युक्ती
मागणे हेच देवा मिळो तुला मुक्ती

-



भरारी

भरतो घाव मुळाचाही, काळास वेळ देता
फळतो डाव जीवनाचा, निरपेक्ष मेळ होता

खोट्याच असता वाहवाही, मना करारे निग्रही
खऱ्या प्रतिभेस मिळतो, धरता वाव आग्रही

भरण्या भावनांचा बाजार, फुका मज्जाव कशाला
मरण्यास भाव नकोच, जगणे शिकवा जगाला

प्रेमे जुळतील मनेही, भले दुभंगो वाटा
नाव प्रेमास नकोच, कप्पा ह्रदयात छोटा

आता खुळ्या मनाला, नको मारणे कैकदा
स्वच्छंद घेऊदे भरारी, ऐक त्याचेही एकदा

-



सेवा
हिचा धर्म
अंगी हीच्या देवा
आहे रगारगात निस्पृह कर्म

सेवा
आजाऱ्याची शांतीने
निरपेक्ष विना कावा
चुपचाप चाले एकसमान गतीने

सेवा
दररोज हासुनी
करे उपदेशही नवा
भले कोणी जावो विसरुनी

सेवा
तत्पर तळमळीने
पाजे औषधी बरवा
वेळ पाळत नित्य काळजीने

सेवा
परीचारीकेस असे
हा अनमोल ठेवा
लढे देशासाठी दुर्गाच भासे

-




अजून येतो गंध फुलांना, अजून येतो गंध |धृ|

बागेत सखे फिरतांना
आठव मनी झुरतानां
इच्छापूर्तीचा रे छंद
अजून येतो गंध फुलांना अजून येतो गंध

मोकळ्या तुझ्या केसात
भावनांच्या आवेशात
कैद बटांची बेधुंद
अजून येतो गंध फुलांना अजून येतो गंध

विरहात तुझ्या आभासी
वेडेच वेड आम्हासी
वेड्यास कशाचे बंध
अजून येतो गंध फुलांना अजून येतो गंध

भेटता तू पुन्हा राणी
प्रेमाची गाऊ गाणी
जन्मभरीचा संबंध
अजून येतो गंध फुलांना अजून येतो गंध

-



कारण तू माझ्या पोस्ट वाचेचना

-


Fetching सतिश कुलकर्णी Quotes