शंकर कांबळे  
4 Followers · 7 Following

Joined 18 September 2021


Joined 18 September 2021

पहिला पाऊस..

वैशाखाचा दाह सरला
अवचित आला वळीव फेरा..
तनां -मनाची काहील पुसली
ओघळला आसमंत सारा..

-


10 FEB 2024 AT 15:05

मीच माझ्या वांझ मनाशी एक करार केला आहे
श्वासापुरते जगणे केवळ लयास माणूस गेला आहे...

नकोच उसन्या सुखदुःखाची रंगीत झालर चमचमणारी
श्रावण सरता वैशाखाची दाह,होरपळ धूसमुसणारी...

रोज पाहतो त्याच राऊळी तीच प्रभावळ तो वनमाळी
लोभ, वासना दंभपणाची भणंग घेऊन फिरतो झोळी...

कांगोऱ्यांनी सजले –नटले खुले अंगण निळ्या नभाचे
बिंब उमटता रक्त वर्णी ते कोश लोपले गर्द ढगाचे...

उगाच वाटे डोळ्यामधला पाझर आता आटून गेला
किती पेरले कोंब तरीही तळ मनाचा सुकून गेला...

एकच जीवन एकच जगणे एक धून पण कैक तराने
रंगमंच हा युगा युगांचा पडदा पडता येणे– जाणे...

-


23 JAN 2024 AT 20:43

आवेशाच्या ललकारीने काताळाला कंप सुटावा
युगा–युगांच्या हुंदक्यातला विटाळ आता तरी फिटावा...

साथ–सोबत नको कुणाची नकोच उसने बळ आता
पिचलेल्या मनगटांत फिरुनी बंड पेरूया जाता जाता...

क्षणा–क्षणाला उसळत राही तप्त लाव्हां छातीमधला
पुन्हा चेतवू जुने निखारे रात्र काजळी तुम्हीच बदला...

शिंग तुतारी नौबत झडली नाद टापे गगनी भरली
लख्ख तळपत्या समशेरींना चेव, विरश्री अंगी स्फुरली...

तृणापरी पायात चिरडू यश किर्तीची शिखरे घडवू
मळभ सारुनी लाचारीचे स्वाभिमाने कोंदण जडवू...

-


30 DEC 2023 AT 15:57



विखुरलेल्या अस्तित्वाचे जुनेच मोती माळले मी
उत्तर होते माहीत तरीही प्रश्नांना त्या टाळले मी

चेहऱ्यावरती पोतलेल्या रंगछटांची धुंदी हटली
फुंकर घालून खोल तळाला पुन्हा एकदा चाळले मी

वाळवीने पुरते आता झाड जुने पोखरले आहे
आटोपताना आज पसारा पानं कोवळे गाळले मी

गुलाम झाला अंधाराचा उजेड सोबत असताही
परीघ आखला जाणीवांचा सूत्र शेवटी पाळले मी

प्रतिमांचे जणू बिंब उमटले कल्पनेच्या आरशावर
देखण्या चित्रांत भरण्या रंग सारे जाळले मी

शब्द तोकडे कसे साठवू?शिंपल्यात तळहाती इवल्या
आवर्तन हे युगायुगांचे पुन्हा नव्याने घोळले मी

-


28 OCT 2023 AT 18:47

शरदाचे टिपूर चांदणे
शिंपीत आला नभी चंद्रमा
उसळून येई प्रीत सागरी
शुभ्र कळ्यांची शुभ्र लालीमा

-


28 OCT 2023 AT 18:46

शरदाचे टिपूर चांदणे
शिंपीत आला नभी चंद्रमा
उसळून येई प्रीत सागरी
शुभ्र कळ्यांची शुभ्र लालीमा

-



उरांत जपते अंकुर कोवळा
वात्सल्याचा श्रावण सोहळा
जगत जननी त्यागमुर्ती तू
तुजवीण जीवन ग्रीष्म झळा..

-


29 SEP 2023 AT 14:23

भाव हळव्या तरल मनाचे कोश किती उलगडले
अर्थ लावण्या मौनाचा का?शब्द व्यर्थ धडपडले..!१!

दाटलेला घन कोसळता रिता सोबती उरतो केवळ
तळहाताच्या पुसूनी रेषाआयुष्याला यावी भोवळ..!२!

परिवलने ही सुखदुःखाची रोज नव्याने डाव रंगतो
राख फासूनी मिरवी कोणी,कुणी तहाचे राज्य जिंकतो..!३!

फसवे सारे भास देखणे रंग, मुखवटे शिणले खोटे
अस्तर सारून डोळ्यावरचे खोल बोचती चुकार काटे..!४!

नासूर झाली जखम कधीची फुंकर घालून जपतो तरीही
दुबळा ,व्याकुळ त्रागा माझा मेख हेरली खरी खरी ही..!५!

-



शुभ्र पुंजके तारकांचे
अवचित आले धरेवरी
धवल दुलई जशी पसरली
मऊ मखमाली कळ्यापरी

-



शुभ्र पुंजके तारकांचे
अवचित आले धरेवरी
धवल दुलई जशी पसरली
मऊ मखमाली कळ्यापरी

-


Fetching शंकर कांबळे Quotes