जगाशी नाही रे मला स्वतःशी भांडायचं आहे..
अपेक्षा आणि अटींना दूर मनापासून कोंडायचं आहे...

कर्तव्याच भान सोडून मनमुराद जगावं म्हणते,
सगळ्या भावनांना विसरून क्षणांना वेचायचं आहे...

पिऊन वारा, साठवून सावली, धुंद उनाड लहरींमध्ये,
माझं जीवनगीत मला, माझ्या सुरात गायचं आहे...

सुख दुःखाच्या ऊन पावसात आशेच्या चढ उतारांना,
स्वार्थ आणि इच्छेसाठी, स्वतःवर बंधन लादायचं आहे...

या जगात खरचं..! कोण कोणासाठी जगतं का?
या एका प्रश्नाचं, स्वतःकडे उत्तर मागायचं आहे...

-



किनाऱ्यावरचा वाळूचा किल्ला नेला कैक लाटांनी
जिथून आल्या भेटाया लाटा गेल्या त्या वाटांनी

डोळे माझे किंचित ओले लपवले मुक्या थेंबांनी
न जाणो किती रहस्य उराशी दाबून धरले ओठांनी

आजवरली सारी दुःखे पचवली दुखऱ्या वेदनांनी
जणू काही नभातल्या विजा कोसळतात त्या वाटांनी

फक्त तडजोड करण्या मी वेळेसोबत जिंकलेली
काळाचा सामना करतंच जगले धुक्याच्या वाटांनी

माझ्यासोबत आयुष्याची वाट चाल म्हणणारी वेळ होती
कित्तेक क्षणं आले अन् गेले मला एकटं सोडून वाटांनी

-



तुझ्या प्रितीच्या वाटेवर मनातील पाऊलखुणा..
दोन फुलांच्या भेटीतल्या जगावेगळ्या आणा..

तोच ध्यास, तीच आस, चहू दिशांना तुझा सहवास..
मन अलगद अंतरी उमलती तुझ्या प्रीतीचा सुवास..

त्याच भावना, त्याच संवेदना, तीच ती हुरहूर..
आजही मनांत तसेच उठते तेचं ते काहूर..

तोच स्पर्श, तीच ओढ, तोच गंध, प्रीतीचा..
तोच चंद्र, त्याच चांदण्या, तोच प्रकाश रातीचा..

थोडं सुख, थोडं दुःख, अमर्याद ती पाहिलेली वाट..
थोडी सरळ, थोडी वाकडी त्या वळणावरली पायवाट..

-



भाग्य बोलतं माझं, तुझ्यासाठी आयुष्य शापित आहे
लाव नशिबाचा कौल तू अजून आयुष्य गुपित आहे

अगणित प्रश्न आहेत, अमाप प्रश्नांची उत्तरे नाहीत
प्राक्तनाला दोष देऊन नियती आयुष्य छापित आहे

हातावरल्या रेषां न पाहता वास्तव स्वीकारले मनाने
भविष्याच्या ओझ्यासंगे मी उगा आयुष्य झापित आहे

अखेर चांगले कर्मच, सोबतीला असतील माझ्या
तरी काळास् गोंजारून मी उरले आयुष्य कापित आहे

शतजन्माच्या सुखासाठी वैर कोणाशी धरू मी
विधिलिखित सर्वच तर.. मी का आयुष्य मापित आहे

-



एक वादळ आयुष्यात मुक्कामाला आले,
श्वासांभोवती थैमान घालून मुकामाला राहिले...

अंगण पडले कोरडे, ढगांनी आभाळ दाटले,
एका अशांत वादळाने क्षणांत आभाळ फाटले...

रक्तरंजीत नाही झाले, हृदय जखमी केले,
एका वादळात नियतीने काळीज जखमी झाले...

घाव बसले वेळेचे कैक, क्षणांचे प्रहार झाले,
एक वादळाने अकस्मात, क्षणांचे वार केले...

वेदनांचे गाठोडे, भरभसाठ दुःख घेऊन आले,
एक वादळ सुख बांधून, दुःख ठेवून गेले...

-



दोन शब्द मनातले,
विश्वासातल्या विश्वातले...
दोन शब्द कुणातले,
घायाळ जीवातले...

दोन शब्द जनातले,
जीवनातल्या वाट्यातले...
नको मिथ्या सहवास,
निभावलेल्या नात्यातले...

दोन शब्द हृदयातले,
प्रेमाच्या संकेतातले...
नको बेगडी संवाद,
दोन शब्द अंकितातले...

-



जेंव्हा सहवास लाभला पुस्तकांचा
तेंव्हा प्रवास गोंदला साहित्याचा

जेंव्हा उलगडले अगम्य कथेचे
तेंव्हा विश्वास कोरला पात्रांचा

जेंव्हा वेचले शब्द सुमनांना
तेंव्हा सुवास अनुभवला पृष्ठांचा

जेंव्हा साधला संवाद ओळींशी
तेंव्हा उपन्यास मांडला अर्थांचा

जेंव्हा स्पर्शिले आर्त मनाला
तेंव्हा हव्यास संपला दुर्गुणांचा

जेंव्हा गद्य, पद्य अध्ययनले
तेंव्हा अभ्यास केला गूढ विचारांचा
-©Pournima_pd✍️

-



पुस्तकांना वाचतोय,
साक्षरतेला वेचतोय,
शब्दांना ओळखून,
अर्थांना समजतोय...

पुस्तकांना वाचतोय,
ज्ञानाला वेचतोय,
अनुकरण करून,
विचारांना समजतोय...

पुस्तकांना वाचतोय,
अनुभवांना वेचतोय,
शिक्षणाला स्पर्शून,
आयुष्याला समजतोय...

-



संपून तिची विनीतता वसुंधरा ही रुसली आता
तिची करुण कहाणी कुणा ना दिसली आता

मानवाच्या आपमतलबी, अर्थहीन हट्टापायी
देहावर कुऱ्हाड धरणीच्या वारंवार बसली आता

हरवला कोवळा कोंब, संपली हिरवी वनराई
फुलांची सुगंधी बरसात धरेवर ना वसली आता

भेगाळली जमीन ती, तापली मृदा सभोवती
रत्नगर्भात कणसाची शेती ना कसली आता

ना अंगणी हांबरणे उरले, ना किलबिलाट फांदीवर
तिच्या मुक्या जीवांची उनाड वाट फसली आता

संपवून तिला आघाताने दुःखाच्या खाईत लोटली
संपून तिची अगणितता वसुंधरा ना हसली आता
-©Pournima D...✍️

-



मी आणि पाऊस

त्यानं शोधायचं मी नजरेसमोर असूनही
मी पाहायचं रोखून त्याला

त्यानं यायचं मी एकटी असताना जवळ
मी बिलगायचं घट्ट त्याला

त्यानं पडायचं ओघळून पापणीवरून
मी झेलायचं ओंजळीत त्याला

त्यानं सांडायचं थेंबांना अंगावर माझ्या
मी द्यायचं निथळून त्याला

त्यानं छेडायचं पाऊस होऊन मला
मी बोलवायचं दरवर्षी त्याला

-


Fetching शब्दसखी🖊️ Quotes