विठुनामाचा गजर होई सौख्याचा बहर
जेणे जन्मतो नव्याने संत होऊन तो नर
ना हिशोब कर्माचा पाप-पुण्य ना मोजियले
दैव फाटके लाभता मरणचि चिंतीयेले
होई क्रुपा माऊलीची दुर होताति काहुर
विठुनामाचा गजर होई सौख्याचा बहर....।
सेवा लेकरांची जिथे करीतसे माय
ते पांग कसे फेडावे ना साधते उपाय
ओवाळून जीव तयाशी करू भक्तीचा गजर
विठुनामाचा गजर होई सौख्याचा बहर....।
देही वसते पंढरी,संतसंग तो लाभतो
भक्तीरंगाने बाप पांडुरंग हा रंगतो
नाही उरली अपेक्षा,होते जीवन साकार
विठुनामाचा गजर होई सौख्याचा बहर....।-
MSc (microbiology)B.ed.working as a teacher.
लहान... read more
२४/५/२५
****सुखाचे दिवस****
स्वप्नापरी क्षणिक
असते सुखाचे दिवस
जगण्यास ते कारण
असते सुखाचे दिवस......
येते झुळूक वाऱ्याची
शांतवते तप्त देह
तैशापरी आयुष्यात
येते सुखाचे दिवस .......
सुख म्हणजे तरी काय
नेमके जाणायास हवे
प्रेम ,आपुलकी, माया
असे सुखाचे दिवस.....
ठेवा जपुन काळजात
आपल्या माणसांची जाण
ना मावळेल कधीही
असे सुखाचे दिवस......-
२३/५/२०२५
****ओलावा मायेचा****
आपुलकीचे क्षण,आणि आतुरलेले घन
तिथे सापडले मला माझे गोड बालपण
ओळखीचा थवा,माझ्या भेटीस थांबावा
मायेचा ओला रंग शिंपीत गातो पारवा
कमरेवर हात ठेऊन डबक्यात मारल्या उड्या
चिखलाच्या नक्षीमधे सुख साधले होते गड्या
टुमदार गाव,मैत्रीचे ठाव,आठवाची नाव
किती किती साठवले तरिही,मना
सरत नाही मायेची अलवार हाव......-
२२/५/२०२५
****मी पाहिले नदीला****
सुट्टयांचे दिवसं,आणि गावाची ओढ
खळाखळतं पाणी,आठवणी गोड
नाव तिचे खुनी नदी,साऱ्या गावाची पोशिंदी
बहु दिवसाने तिला भेटता,मनी निराशा नांदी
मी पाहिले नदीला,आकाश व्यापलेले
आमच्या सौख्याचे प्रतिबिंब तिच्यात उमटलेले
शिवारी उजळे सोनियाचे मोती,
कसदार मातीत जेव्हा ती अस्तित्व गोंदी...।।
विशाल पात्र,सखोल फार
डुबकी मारताच जाणवे मायेचा आधार
ती शुद्ध,शितल संपन्न ,कष्टकऱ्यास देई समृद्धी....।।
जिकडे तिकडे ओसाड वाटले
नदिच्याही डोईचे जल आटले
मानवी अशुद्धतेने विद्रूप झाली ती कालिंदी.।
मी पाहिले नदीला,भार प्लास्टिकचा पेलताना
साऱ्या गावाची अशुद्धता पोटी तिच्या घेताना
तिच्यासवे वाहु लागली केवळ घाण,गंदगी..।
उदास होती नदी,मन माझेही उदास
वदे होऊ लागला लेकरा माझा तुम्हामुळे ऱ्हास
येशील पुन्हां परतुन तेव्हा,मी उरेन ना रे तुझ्यामंदी?
बहु दिवसाने तिला भेटता,मनी निराशा नांदी।-
२१/५/२०२५
****अवेळी पाऊस****
काय बोलावे आता राव आले बघा हे कसे दिवस
मे महिन्याच्या कडक दुपारी,धडकुन पडतो अवेळी पाऊस...।
पापड,सांडगे,मिरच्या,शेवया
वाळवण भिजुन जाते वाया
गरमपणा उरुनच असतो
नुसतीच ओलावते काया
आमरस खाण्याची अजूनही उरले आहे जिभेचे सोस....।
गावी मामाच्या जावे कसे
आभाळ भरलेले असताना
पडावे तरी का आत्ता पावसाने
शाळेला सुट्ट्या असताना
शाळा सुरु झाली कि याने पुर्ण करावी पडण्याची हौस....।
लग्न समारंभी किती होतो त्रागा
जिकडे तिकडे बघावे तर पाण्यानेच भरली जागा
फिरायला न जाण्यासाठी कारण बनतो हा ठोस
मे महिन्याच्या कडक दुपारी,धडकुन पडतो अवेळी पाऊस...।-
२०/५/२०२५
****सावली****
तळपळते उन्ह,रान दिसे सुनसुन
भोवती एकटी माझ्या,कुणी येईना दिसुन
ती सांगाती होउन मज अदृश्याने न्हाली
अखेर सोबतीला उरते फक्त सावली...
किती आकार वेगळे,किती स्वरुप निराळे
काळ्या रंगाच्या आड किती संदर्भ आगळे
देते आधार सोबतीचा दडुन अपुल्याच पावली.....
अखेर सोबतीला उरते फक्त सावली...
सुखाची असो वा दुःखाची,साथ तिची मायेची
बदलते जरी वेळेनुसार,परी शितल कायेची
निरपेक्ष ती निर्मोही ती जन्मुन तिच्यात जगली
अखेर सोबतीला उरते फक्त सावली...-
१९/५/२५
****धरामोह*****
एकटक बघाव आकाशाने करिता वसु उजळते
दररोज नटते सुरेखशी, ऋतु बदलता खुलते.....
कशी नेसते हिरवा शालू,सोनपिवळी होऊन लाजते
बावरा वारा अलगद स्पर्शता,गुपीत सख्याचे हेरते....
सरी सरीतुन प्रित बरसता,अंतरंग तिचे ओलावते
सुगंध अनामिक दरवळुन बापुडी, भाव मनीचे सांगते....
अश्या सुंदर मिलनाने सुंदर प्रकृती जन्मते,
प्रेम करावे,प्रेम वाटावे अंती हेची सुचविते......-
१८/५/२४
****आभाळमाया*****
जीवापाड प्रेम करणं आभाळालाही येत
मातीच्या भेटीसाठी झुरणं आभाळालाही येत....
एकटक बघत असतो,लावण्य धरत्रीचे
बदलत्या ऋतुचा साज देतो तीला अगदी खात्रीचे
ते ऋतुसाज लेउन धरत्रीचे रुप सोन्यासम लकाकतं.....
चंद्र, सुर्य ताऱ्यांचे प्रताप तीच्या साठी
कधी न स्पर्षे,तरीही हर्षे वाऱ्याची झुळूक मिठी
डोंगराच्या कानामध्ये प्रेमगीत गुणगुणतं....
गुपीत आभाळाचे ऐकून पाणावतो डोंगर
काळीज आभाळाचे तिकडे होतसे कातर
मग बरसते प्रेम अमर ते,घेऊन रुप सरीत
भिजलेले काळीज त्याचे,एकरुप तिच्यात...-
१७/५/२५
**** बाजार****
आयुष्य झाले बाजार
मांडला मृत्यूचाही बाजार.....
विकतो येथे रोज माणुस
कवडीच्याही उण्या मोलात
अविर्भाव गोंदवतो चेहऱ्यावर
श्रीमंत असल्याच्या तोऱ्यात....
माणुस विकला जातो तसा
विकली जाते माणुसकी
मढ्यावरचेही तुप खातात
मारून मोठी फुशारकी....
विकले जातात माणसाचे
छाटुन छाटुन देह
भावना विकतात, ईच्छा विकतात
सोबत आपुलकी व स्नेह....
देव थोडी न पुजतात येथे
केला जातो त्याचाही व्यवहार
जगण्यासाठी श्वासांचाही
भर दरबारी मांडतात बाजार.....-
१६/५/२०२५
****आठवणींचे वाळवण****
मनाच्या संदुकित माझ्या भरले आहे बालपण
संदुक उघडताच दिसते ते आठवणींचे वाळवण.....
ओल्या सुंदर आठवणी
अल्लड वयात घेऊन जातात
वय कितीही झाले असले
रुपेरी स्वप्नात जगुन घेतात
संजीवन असतात खरे म्हणजे हे आठवणीचे क्षण....
आभाळ ठेंगण पडाव इतका आनंद दडलेला
जगण कळाव,उकलाव इतका हिशेब मांडलेला
संचीत खरे तर आयुष्याचे असते आठवांचे व्रण.....-