मित्र सांगत होता की,
काळजाचा दगड होऊ द्यायचा नाही.
आणि त्याचा मऊसूत रेड कार्पेटही
करायचा नाही.
बुद्ध म्हणतात, "मज्झिम निकाय"
मध्यमार्गी व्हा !-
Don't settle for crumbs when
you deserve the whole cake !-
मित्र सांगत होता की,
फिरून पुन्हा आठवणी
जाग्या होतात !
फिरून पुन्हा मी नखशिखांत
शाहारतो !
फिरून पुन्हा ह्रदयात
बुद्ध हुंकारतो !
... आणि मी पाठीवरचे
वार विसरतो !
💚-
मित्र सांगत होता की,
'व्हर्च्युअल' या शब्दाची ओळख
आपल्याला आता झाली असली
तरी अख्खं जग व्हर्च्युअल आहे,
हे जाणकारांनी आधीच सांगितलंय.
जसं आपल्यासाठी सगळंच व्हर्च्युअल
आहे. तसंच आपणही सगळ्यांसाठी
व्हर्च्युअल आहोत !-
मित्र सांगत होता की,
जीवनाचं सत्य शिकवलं जाऊ
शकत नाही. कारण प्रत्येकाचं आपलं
एक सत्य आहे. ज्यापर्यंत पोचण्याचा
ज्याचा त्याचा स्वतःचा वेगळा
मार्ग आहे !-
मित्र सांगत होता की,
मनात विचारांचा कल्लोळ सुरू
झाला की, वाट सापडेल तिकडे
चालत निघायचं... धावायचं-पळायचं...
शरीराला नखशिखांत थकवायचं !
आणि मग मनाला म्हणायचं,
आता बोल...-
मित्र सांगत होता की,
'तथागत' कोणती पदवी नाही.
मिरवण्याची अस्मिता तर मुळीच नाही.
तथागत एक मनोवस्था आहे !
जसा निरागस आला तसाच
निरागस-निश्चल निघून गेला.
अनेकांनी विषाची परिक्षा घेतली.
पण कुणाबद्दल राग नाही, द्वेष नाही.
तथागत !-
ब्लॅकहोल
एक खोल अनादी-अनंत ब्लॅकहोल
असतो आपल्या अंतर्गर्भात…
त्याचा व्हँक्युम सतत खेचतच राहतो काहीतरी…
काही नाती, काही स्वप्नं,
काही महत्वाकांक्षांच्या क्षणभंगूर वासना
ती पोकळी भरण्यासाठी सरसावतातही…
पण सरते शेवटी त्यांचाही अंत होतो.
तरीही ब्लॅकहोलचा व्हॅक्यूम
सतत काम करतच राहतो.
कारण तो अजर-अमर असतो.
त्याला ओढ असते शाश्वत अज्ञाताची !
-संतोष खामगांवकर ©
-
बुद्ध उध्वस्त करतात !
आपण रेडिमेड उत्तरांच्या शोधात
बुद्धांच्या पुढ्यात बसतो…
तर बुद्ध फिरून आपल्या
ओंजळीत काही प्रश्नच टाकतात !
ओंजळीतल्या प्रश्नांकडे आपण
सवयीनं प्रश्नांसारखेच बघत राहतो
आणि वेळ संपली की, बुद्ध त्यांचं
दुकान आपल्या तोंडावर बंद करतात !
बुद्ध उधार काहीच देत नाहीत,
बुद्ध आस लावत नाहीत,
बुद्ध आसच मुळासकट उखडून टाकतात!
कोण म्हणतं बुद्ध ध्यानस्थ करतात???
बुद्ध आधी उध्वस्त करतात !
संतोष खामगांवकर ©-
मित्र सांगत होता की,
लोकांना बुद्धांकडून आनंद
मिळावा अशी अपेक्षा होती.
बुद्ध पेचात पडले...
मग एक नवा शब्द त्यांनी
जगाला दिला. आनंद नाही 'अशोक' !-