उगाच का?सळसळतो श्रावण
तुझ्याविना तळमळतो श्रावण
मन माझे भिजवाया येतो
स्मृतीमध्ये घुटमळतो श्रावण
नकोस ढाळू कधी आसवे
तुझ्यामुळे हळहळतो श्रावण
तुझी आठवण हवी वाटते
कसे म्हणू की छळतो श्रावण
कळत मला नाहीस कधी तू
म्हणून बहुधा कळतो श्रावण
दूर जरा गेलीस कधी तर
मी आणिक मावळतो श्रावण
गजल चांगली होते आहे
जसजसा भळभळतो श्रावण-
वाटेतल्या वाटेतली वळणे किती?
हरवून जाणे आणि सापडणे किती?
ती भेटलेली याच वळणावर कधी
ते दोन डोळे रोज आठवणे किती?
वेडा ठराया लागलो आहे आता
चोहीकडे नुसते तुझे दिसणे किती?
थांबून होता एक रस्ता आतला
नुसतेच होते आपुले पळणे किती?
नव्हती जरी येणार ती भेटायला
पण त्याच त्या रस्त्यात घुटमळणे किती?
© संदिप मर्ढेकर
-
जगाची रीत पाळावी तुला लागेल आयुष्या
मनाची खाक चाळावी तुला लागेल आयुष्या
मनापासून एखादी तुला वाटेल अपुली पण
पुढे ती वाट टाळावी तुला लागेल आयुष्या
तुझ्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतीलच असे नाही
मनातच ओढ जाळावी तुला लागेल आयुष्या
तुला जर पाहिजे तो शब्द नाही भेटला केंव्हा
पुढे ती ओळ गाळावी तुला लागेल आयुष्या
तुला दुःखाविना पर्याय जर का राहिला नाही
व्यथा जगण्यात माळावी तुला लागेल आयुष्या..
© संदिप मर्ढेकर-
तुझ्याशी भांडतो मी नेहमी हे मान्य आहे पण
मनापासून मी केंव्हा तुझ्यावर रागवत नाही.-
मशहूर केले मी तुला ज्या गोडव्यासाठी
आहेस फाइव स्टार ते,तू आपल्यासाठी..-
सुगंधी होत जातो श्वास आठवतेस तू जेव्हा
गुलाबी होत जातो भास आठवतेस तू जेव्हा.
-
तुझा होकारही आता मनाला मानवत नाही
कशाची वेदना आता मनाला जाणवत नाही
खुजेपण राहिले नात्यात अपुल्या वाटते आहे
म्हणूनच कालचे काही जराही आठवत नाही..-
तुझ्याशी अबोला कुठे फार टिकतो
कितीही ठरवले तरी मीच हरतो
तुझ्या अत्तराची खुमारी अशी की
नशेतच तुझ्या मी दिवसरात्र असतो..-
माझ्याच भोवतीने फिरतो अनेकदा मी
येऊन त्याच जागी पडतो अनेकदा मी
पत्ता नका विचारू कोणी मलाच माझा
हरवुन मलाच शोधत बसतो अनेकदा मी..
© संदिप मर्ढेकर-
एक उम्रसा हूं गुजर रहा!
वक्त सा हूं ढल रहा!
कहा जाके सहरा पाऊंगा
खाली खालिसा हूं बरस रहा!
आंखोंमेंही न पिघल जाऊं ?
काजल की तरह तरस रहा!
तमन्नाओंकी कश्ती मैं संवार
साहिल बनकर उलझ रहा !
क्या मायने हैं जिंदगी तेरे ?
रेत सा हूं फिसल रहा !
© संदिप मर्ढेकर
-