Sachin Sutar   (-सचिन सुतार)
595 Followers · 216 Following

read more
Joined 7 February 2018


read more
Joined 7 February 2018
4 NOV 2023 AT 19:39

तुझे उनाड केस तू उगाच सावरू नको
अशात तू मला तुझ्या जवळ बिवळ करू नको.

खळाळतो समुद्र हा तिच्या मनात रोजचा
बुडून जा तिच्यामध्ये उगाच तू तरू नको..

-


13 SEP 2023 AT 12:21

बसस्टॉप वरचं रेंगाळलेपण
जिवंत असतंच की आत.
भावनांची रेलचेल जरी सुरु असली तरी
काही आठवणी स्थितप्रज्ञ असतात,
पुतळ्यासारख्या..
ती जागा, तो आवार आणि
त्या भोवतालचा वावर
फार फार तर आठवू शकतो आपण.
पावसानं छत्रीवर निरंतर बरसत राहावं
आणि छत्रीनं मात्र आतली उब राखून ठेवावी.
काही माणसाचंही तसंच...

-


18 AUG 2023 AT 9:14

कुण्या जिवावर जडतो आपण
खोल तळाशी पडतो आपण.

किती शहाणे वय असूनही
वेड्यापरी बिघडतो आपण..

-


5 AUG 2023 AT 10:38

तुला पाहताना असे वाटते की
जणू मोगऱ्याची खरी बाग तू,
तुझ्या काळजीला उभा देह माझा
तुला जे हवे ते सखे माग तू..

कधी सोनचाफा कधी रातराणी
किती गंध येतो तुझ्या कुंतली,
किती बारकावे तुझ्या चेहऱ्यावर
तुला ईश्वरानेच रेखाटली..

-


14 OCT 2022 AT 15:44

***साज ***
केसात मोगऱ्याचा गंधीत साज ल्याली,
बेशुद्ध पाडणारी डोळ्यात लाज आली.

भरधाव धावणारा रस्ता पळत होता,
घाईत भेटण्याला स्वारी तयार झाली.

आषाढ संपल्यावर हुरहूर वाढणारच,
शिडकाव पावसाचा माती उनाड झाली.

भाळून चाळणीला गालात चंद्र हसला,
कोजागिरी नव्याने केशर दुधात न्हाली.

देहास पोसणारे काळीज आज म्हणते,
प्रेमात पाडणारी जादू तुझ्यात आली...

-


10 OCT 2022 AT 17:00

प्रेमात मी पडावे चंद्रास पाहताना,
पाहून धुंद व्हावे गालात लाजताना.

केशर बदाम आणि साखर तुझ्या मिठीची,
प्याला मधूर होतो ओठास लावताना.

-


5 OCT 2022 AT 20:41

आपट्याचे पान साधे स्वर्ण हाती भास होतो,
रावणाला जाळल्यावर का दुःखाचा ऱ्हास होतो.

केवढा आनंद होतो मोगऱ्याला माळताना,
कुंतलाचा स्पर्श होता मोगराही खास होतो..

-


1 OCT 2022 AT 11:38

वृत्त - मंजूघोषा
यातनेला सोसतो बघ बाप माझा,
सोसतो अन हासतो ही बाप माझा.

रक्त फुटले टाच ओली राबताना,
वेदनेला झाकतो हा बाप माझा.

तोच सदरा रोज होतो गर्द ओला,
फाटल्यागत जीर्ण होतो बाप माझा.

देव भेटे का खरा रे पंढरीला,
काळजाने देव आहे बाप माझा.

बाप आहे तोवरी बघ मी सुखाशी,
या सुखाचा अर्थ आहे बाप माझा..

-


27 SEP 2022 AT 18:51

रक्तात पावकाला सुलगून टाकतो मी,
उलथून टाकण्याचे अवसान मागतो मी.

आता सराव झाला छातीत वार घेण्या,
डोळ्यात हासण्याचे आभाळ मागतो मी.

लौकीक काल होता दोघात प्रेम होते,
वासर निघून गेला द्वेषात वागतो मी.

निर्धार हा नव्याने निष्ठेत वागण्याचा,
कित्येक घास आता पचवून हासतो मी.

उक्ती विरून जाता शक्ती मलूल होते,
साऱ्या जगास आता तोषात भासतो मी.

आनंद शोधला मी शब्दात वाहण्याचा,
प्राक्तन कथा पुराणी गझलेत मांडतो मी.

विझले जरी निखारे देहात जाणिवांचे,
सर्पण म्हणून माझे काळीज जाळतो मी..

-


21 SEP 2022 AT 12:42

वेदनाही सोबतीला आज आहे,
बोलण्याची मज अताशा लाज आहे.

टाळणेही या क्षणाला ज्ञात व्हावे,
भाळण्याचा खूप मजला माज आहे..

-


Fetching Sachin Sutar Quotes