आकाशाला टांगलो आपण
चांदन्यांच्या सोबतीला
उभे जीव न्याहाळती
सुख टांगले आभाळाला-
वेदना निष्ठुर असतें
दुःखाशी संगममत करते
सुखाशी वैर तिचे
गत जन्माचे
जखमांचे कारण असते
पण तिचे सलणे नेहमीचे
प्रेम तिचे जड देहावर
दोन कटू शब्दांवर
विश्वासघात तर सखा तिचा
झालीच भेट तर गुदमरते
पण कुणी हळुवार फुंकर घातली कि
जगणे पुन्हा आवडू लागायचे-
पंढरीशी संत जमले
करावया माहेरपण
देखता वाळवंटी लेकरे
रखुमाईशी भरून आले
भरून आली चंद्रभागा
बाप विठू भारावला
रंगल्या भजनाच्या पंगती
झेंडे पताका नाचती
कीर्तनात वैष्णव गुंग
सोबती टाळ आणि मृदंग
माय पंचपकवान्नात वाढी
हरीनामाची गोडी
बाप सांगे भावसागाराचे सुख
एक विठू एक भक्त
उरल्या गळा भेटी झाल्या
अन भेदभाव लिन झाला
कटेवरी ठेवुनी हात
बाप पुन्हा तृप्त झाला-
आज चाफा खरा बहरला बघ
संथ तुझ्या चाहूलीने जरासा लाजला बघ
वारा निरोप घेऊन आलाच होता
तेवढ्यात तू रिमझिम बरसलास
अन तो आतून खुलून आला बघ
तू येण्याआधी आभाळ भरून आलंच होत
पण वारा गंध छेडू लागला
तसा तो आणखी बावरला बघ
गार तो तुझा स्पर्श जुनाच फांदीवरती
तरीही नव्याने चाफा फुलला बघ
तिच्या मिठीत पाऊस कोसळताच
श्वासात ओला गंध दाटला बघ
त्या दोघांची भेट झाली अन
त्या वळणावरच्या चाफ्याखाली
खच सुखाचा सांडला बघ-
न मानावे दुःख उन्हा सारखे कटू
न मानावे सुख सावली सारखे मधुर
असे उतरावे आयुष्य जगण्यातून की
फक्त आणि फक्त आनंदच उधळावा लेखणीतून-
थोडी जीर्ण झालेली थोडी उसवलेली
फडताळातून डोकावताना
मला माझ्या आजीची फाटकी वाकळ भेटलेली
थोडी मळकट थोडी मऊ कापसासारखी
शेतात राबलेल्या राकट शरीराला
तीने कित्येक रात्र सोबत दिलेली
थोडी सुरकुतलेली थोडी आखूडही वाटली
संसारात स्वच्छंदी नांदताना
होती त्यात आसवे विरलेली
थोडे जुने थोडे नवीन जमवून
कित्येक सुख दुःख विणून बनलेली
मला तर ही चांदण्यातील शीतलता जाणवली
थोडी स्वप्ने होती थोडी कर्तृत्वाची निशाणी तिच्या
शिशिरातील गार धुक्यात बघा
वात्सल्याची जणू ऊब निजलेली
थोडी हलकी थोडी जाडजूड होती
थरथरनार्या हातांना निज देणारी
फडताळात डोकावताना मज एका पिढीची आठवण भेटलेली
थोडी आठवण अन त्याची पुन्हा साठवण
म्हणुन हल्ली मी रोज मिठीत घेतो
आजी तुझी फाटकी वाकळ आजी तुझी फाटकी वाकळ..-
नाहीच जमलं तर थोड सागराच्या उशाशी ये
त्यात सापडतील तेवढी शंख-शिंपले वेचुन घे
येतील लाटा किनार्यावरती ओढीने
त्यांच्या भेटीचे कारण जाणुन घे
जमलंच तर सागराच्या मनांत हळूच शिरून पहा
त्या काळ्याकुट्ट अंधारात शुभ्र दवबिंदू असेल
निर्मळ झर्याचा नंदादीप लावून
त्याच्या प्रांजळतेचे कारण जाणून घे
थोडे अप्रूप वाटेल तुम्हाला नितळ पाण्याचे किंवा
येईल संशयही पाण्याच्या संमिश्र वृत्तीचे
फक्त आभाळात ढगांची गर्दी होण्याआधी
पापणीत साचलेल्या अश्रूंचे कारण जाणून घे
सांगेल तो नितळ पाण्याचे कारण किंवा
आभाळाच्या एकसंध असण्याचे कारण
फक्त दोष देण्याआधी गर्जनार्या मेघांना
त्या आभाळाच्या आडोश्याला जमणार्या वेदनेला आपले म्हणा...-
क्षमा म्हणजे काय? ह्याच सुंदर उत्तर
" फुलं चुरगळल्या नंतरही त्याच्या पाकळ्यांचा सुगंध देण्याचा स्थायी भाव ".-