सोड दुःख पूस आसू
चेहऱ्यावर फुलव हासू
जुन्या गोष्टी नको घोळू
आणि मना नको जाळू
हो जागा कर शपथ
आडवाट कर सुपथ
टाक अंधारा चिरून
हो सूर्य पुन्हा चिरतरुण
तूच हो तुझा मार्गदाता
तूच हो तुझा मुक्तीदाता — % &-
जरासा अस्थिर । जरी वर्तमान ।
असू द्यावे भान । भविष्याचे ।।१।।
हताश होऊन । नका सोडू धैर्य ।
आशेचा तो सूर्य । उगवेल ।।२।।
पुन्हा पालवीचे । येतील दिवस ।
सरल आवस । एकदाची ।।३।।
संकटा समोर । ठाकला अचल ।
प्रेरित सकल । तयायोगे ।।४।।
— % &-
"कुणी" ना "कृष्ण" इथे येई मार्गदर्शना ;
या रणात "रथ" आणि तूच "कृष्ण"अर्जुना !!-
किती सुंदर असते ,
एखाद्याचे होऊन जाणे !
स्वरसाज तन-मनाचा ,
अर्पावे त्याला जीवन गाणे !-
आफ़ताब बने बैठा है जो तख़्त पे "जुगनू" ;
उसमें नहीं है "मक़्दूर" अंधेरा चीरने का !!
{मक़्दूर : ताक़त/सामर्थ्य }-
जिंदगीत आली बहार ;
प्रिये तुझ्या आगमनाने !
फुलले बंज़र शिवार ;
प्रिये तुझ्या आगमनाने !-
अंधारल्या राती
चेतव जीवनाच्या वाती
राहा खंबीर माणसा
भितोयस कशासाठी
असे कित्येक आघात
मागे केलेस परास्त
सृष्टी जाते नाशाकडे
आता तुझ्यावर भिस्त
नको होऊ तू निराश
जरी अवकाश भकास
मनी जागव आशासूर्य
होईल प्रकाश प्रकाश-
जागोजागी तुझा भास
मिलनाची मनी आस
चुके ठोका काळजाचा
घोटाळतो श्वासोच्छ्वास
रानोरानी पानोपानी
तुझा स्पर्श तुझा सुगंध
मी आषाढी बरसलो
तू झालीस गं मृद्गंध
किती करू धावाधाव
देवा एकदा मला पाव
नाही झाली भेटाभेट
धरणी माय देई ठाव-
अंतरी आहेस सदैव , अंतरावर राहू नको
ये अशी बाहूत प्रिये , तू मना थांबवू नको
जगाची चिंता कशाला , कोणा कशाला भ्यायचे
दे हात हाती हिमतीने , मग होऊ दे जे व्हायचे
कळू दे आज जगाला , प्रीत सामर्थ्य पाहू दे
हासती जे जन आता , त्यांना अवाक् होऊ दे
प्रीत गीत गाऊ नाचू , दुःखाला नसे उसंत
प्रेम सागरी विहारू , आनंदे भरू आसमंत-