Pramila Tarange   (प्रमिला तरंगे.)
573 Followers · 289 Following

Teacher....the nation builder...
Birth Date - 29th Aug.
Joined 14 February 2020


Teacher....the nation builder...
Birth Date - 29th Aug.
Joined 14 February 2020
18 SEP 2022 AT 12:40

मॕच फिक्सींग
प्रश्न सारे तू निर्माण केलेले
उत्तरंही फिरवाफिरवी करून
तुला हवी तशी तूच मॕनेज केलेली.
आमची मात्र उगाच नुसतीच
स्कोअर मिळवण्याची केविलवाणी धडपड.
तुझी तर सारीच उत्तरं आधीच ठरलेली
आणि आम्ही फक्त चौकार, षटकार , नो बॉल
अन् रनआऊटच्या खेळीचे बाहुले...
जग जिंकल्याच्या अविर्भावात ..!
कधी-कधी तर काढून घेतोस
हातातला पेपर वेळेआधीच
टाईमआॕफचं कारण देऊन.
किती ही चीटींग ?
सगळं काही तुझ्याच मनासारखं घडणार असेल,
तर कशाला ठेवतोस हे प्रश्नोत्तरांचे तास
अन् आसू आणि हसूचे निरर्थक खेळ?
पाप आणि पुण्याचं गुणदान आमच्या माथी मारून
तू मात्र नामानिराळा
दरवेळी मॕच फिक्सींग करूनही ..,!

-


18 AUG 2022 AT 20:42

तुझी आर्त साद , जन्मजन्मांतरीची ओढ अन्
त्याच वेणूच्या ओढीने धावणारी
राधेची रुणझुणती सुकुमार पावले..
चालत राहतात ...चालत राहतात
अनादि काळापासून अनंतापर्यंत तुझ्या हृदयाची वाट.
कळत नाही तिला तुझ्या अलौकिकाचा अर्थ..
अन् दुर्बोध अद्वैताची व्याख्या...
ती वेडी डोळे मिटून , भान हरपून अनुभवतेय
तुझ्या वेणूचे प्रेममयी सूर ...
निरोपाच्या सावळ्या वाटेवर..!
हे श्यामला ,
ऐक तुझ्या वेणूचा जडावलेला एक-एक सूर,
निखळून पडणाऱ्या घुंगराचा ओसरता एक-एक हुंकार...
आता फक्त एकच नाद या श्यामल पोकळीत भरून उरलाय..
राधेश्याम...राधेश्याम ..राधेश्याम !!

-


18 APR 2022 AT 8:29

मातीत मिसळण्याआधी..

वाळव्यांचे विषारी डंख
पोखरत चाललेत अंतर्बाह्य खोलवर..
मायेला लागलेला बिरूड
नेस्तनाबूत करेल कधीही हे डवरलेलं हिरवंगार झाड.
उघडी पडतायत खोलवर रुजलेली मूळं,
हलक्याशा काहूरानंही उन्मळून पडतील कधीही.
बिचारी निमूटपणे डोळे गाळतायत
आपल्याच आंगाखांद्यावर वाढलेल्या फांद्या वै-याच्या
कु-हाडीनं छाटताना पाहून.
निखळतंय एक-एक पान..
नकळतपणे ....
डोळ्यांदेखत भिरकावलं जातंय अस्ताव्यस्त पाचोळ्यासारखं.
म्हणूनच वेचायचंय त्यांना अलवारपणे नि गुंफायचंय फुलांसोबत
विष रक्तात भिनण्याआधी...
बीज मातीत मिसळण्याआधी..!
- सौ.प्रमिला तरंगे.


-


11 APR 2022 AT 8:41

कागदांचा विलक्षण सोस
रंगीबेरंगी , ए 4 , लीगल, उभे, आडवे, जीर्ण-अजीर्ण, आखीव-रेखीव, छापील, कोरे, कामाचे नि बिनकामाचेसुद्धा.. !
हवे तेवढे हजार नमुने..!
पडत्या फळाची आज्ञा शिरसांवद्य मानून कागदी घोडे नाचवत
नाचत राहतो आम्हीही झिंग चढलेल्या वरातीमध्ये
ऊर फुटेपर्यंत.. बेभानपणे..!
कधी केराची टोपली, कधी टेबलाखालच्या कमाली
सारं काही पूर्वनियोजित.
कैकजणांना पुरून उरतील इतके कागदांचे ढिगारे
रचत जातात तोच इतिहास पुन्हा-पुन्हा.
दफ्तरी शून्य किंमत असलेल्या कागदांनीच
रंगवल्या जातात फायली एरवी म्यान असलेल्या तलवारींचे वार करत.
लटकवली जातात कित्येक आयुष्यं टोकांवर
रक्तबंबाळ होईपर्यंत .
मारणाऱ्या - रडणाऱ्यांच्या जोडगोळ्या हसत राहतात
ओंजळीत तोंड लपवून
जिरवाजिरवी, आडवाआडवीचं गूळपीठ शिजवत.
नि मग कागद-कलमच होतात हुकूमशहा
हात असो की आयुष्य
पांढऱ्याचं काळं करत
दिवसाढवळ्या .....!!!

-


23 FEB 2022 AT 3:55

हेही खरं..
तुझ्यावर आणि तुझ्यासाठी मरावं,
असे अनंत क्षण आले नि येतीलही.
पण तुझ्याशिवाय जगता आलं नाही हेही खरं ...
विसरून जावं मी देहभान
असे कित्येक व्यस्त क्षण आले नि गेलेही.
पण रात्री मुसमुसल्याशिवाय गेल्या नाहीत हेही खरं...
हळव्या क्षणांनी व्यथित हृदय
भळभळलं निमूटपणे कित्येकदा.
पण अश्रूंनी मर्यादा ओलांडली नाही हेही खरं...
क्षणांचं काय येतील नि जातीलही
अगदी मनावर अधिराज्य गाजवूनही.
पण तू मात्र अढळ आहेस हेही खरं...
जगता येईल बेमालूमपणे पूर्णत्वाची बिरूदं मिरवत
जगाच्या डोळ्यात धूळफेक करत आजन्मही.
पण शेवटी तुझ्याशिवाय अपूर्णच सारं ...
हे आणि हेच खरं......!

-


24 MAY 2021 AT 9:44

सा-या जगाचा अन्नदाता,
त्याचं पोट खपाटीला.
पाठ टेकतो भुईला,
विरह पापणी भेटीला.
***************
भेगाळली धरणीमाय,
पाणी खोल रं आटलं.
त्याच्या उघड्या डोळ्यात
सारं आभाळ फाटलं.
****************
डोईवर दाटली उन्हं,
लागे झळ नशीबाला.
चिरांमधी बुजल्या रेषा,
दावू हात रं कशाला ?

-


10 DEC 2020 AT 16:50

ओल्याच आहेत आठवणी अजून,
उगाच का त्या नेत्रातून पाझरतात ?
तुझ्या नुसत्या संदर्भानेही,
मनात काहूर माजवतात.

-


30 SEP 2020 AT 12:56

सुख-दुःखांच्या पल्याड तेथे मी वसवले गाव होते,
जगणे होते महाग जेथे, आयुष्य त्याचे नाव होते.

माणूसकीच्या गावी येथे, वेदनांना भाव होते;
सांगू कशास कोणा ? सोसले जे घाव होते.

अंधार होता भाळी माझ्या,प्राक्तनी अवस रात होती;
परि सूर्य होता कवेत माझ्या , सूर्योदयाची बात होती.

मिरवले जे घाव हसूनी,त्या कौतुकाची थाप होती ;
चिघळल्या जखमा तरीही, मी जखमांचाही बाप होती.

-


15 DEC 2021 AT 5:23

सांग ना कसं शक्य आहे ?
तुला किंवा तू दिलेल्या त्या अनमोल क्षणांना विसरणं.
बंद डोळ्यांमध्येही तुझं स्वप्न होऊन पसरणं.
भासवलं मी कितीही तुला विसरल्याचं जरी,
होतच राहतात रे विझू घातलेल्या आठवणींचे स्फोट मनाच्या तळाशी पुन्हा-पुन्हा .
अगदी कितीही नको असले तरीही !
या स्फोटांमध्ये छिन्नविछिन्न झालेल्या अनेक स्वप्नांचे, तुझ्या आठवणींचे तुकडे वेचून रंगवत राहते तेच आठवणींच कोलाज
नि धूसर होत गेलेली तुझी आकृती हळूहळू आणखीनच गडद होत जाते,
तुला कधीही न विसरण्यासाठी.... !

-


15 NOV 2021 AT 16:11

हल्ली कळतच नाहीत वास्तव आणि आभासातले फरक.
नि नेमका कुठे नि कसा गिरवावा आदर्शत्वाचा धडा ?
चेहऱ्यांवरच्या मुलाम्यांबरोबरच मनावर चढलेले मुलाम्यांचे थरच थर झाकाळून टाकतायत आमचा आंतरात्माही ,
स्वतःचीही ओळख विसरून जावी इतपत !
हस-या चेहऱ्यांआड टोचणा-या यातना आत्मविव्हल करून जातायत,
पण सापडत नाहीये एकही भरोशाचा खांदा ,
जो जिवंतपणी साथ देईल.
बेमालूमपणे अंगवळणी पडलेलं हे बेगडीपण व्यापून उरलंय आमच्या अस्तित्वाला ,
आता या अंधाराच्या साम्राज्यात आम्ही केलीय त्या सूर्यालाही कायमचीच ' नो एंट्री ' ....!

-


Fetching Pramila Tarange Quotes