"तू"
आरस्पानी लावण्याचा
बावनकशी दागिना तू
तप्ततेने चकचकणारे
नवखणी हेमरत्न तू
पैलू पाडून लखलखणारा
हिरण्मयी नवसाज तू
अमृत रसना मधाळ मधुरा
सौंदर्याचा ताज तू
कुसुम कोमल नवकलिकेचा
दरवळता मकरंद तू
शुभ्र सतेजा नयनोत्फुल्ला
डोहातील अरविंद तू
तेजोनिधीसम रुपागर्विता
तेजःपुंज दामिनी तू
ऋतुगंधिता वसंत वसना
नवोन्मेषा यक्षिणी तू
✍️प्रचिती विनायक जोशी.
-
तुझ्याचसाठी
स्नेहभाव डोळे न लपविती
प्रतिवंचनातून फुलते प्रीती
मृदुभावांचे माणिक मोती
सख्या श्रीहरी तुझ्याचसाठी
शब्दाविण कां हृदय न कळते
माझेही मन बघ तळमळते
तव नामाची साखर ओठी
सख्या श्रीहरी तुझ्याचसाठी
देवघेव शब्दांची झाली
कणाकणांना वाचा फुटली
शतजन्मीच्या बांधल्या गाठी
सख्या श्रीहरी तुझ्याचसाठी
आहे मी रे तुझीच दासी
नयनी माझ्या तूच राहसी
करकमलांची सोज्वळ मिठी
सख्या श्रीहरी तुझ्याचसाठी
प्रेम रसाची ओढ जिवाला
समजावू रे कशी मनाला
धावत येते सत्वर भेटी
सख्या श्रीहरी तुझ्याचसाठी
प्रचिती विनायक जोशी.-
उमेद (कविता)
उमेद म्हणजे काय? याचा
अर्थ काहीसा घ्यावा समजून
वाळवंटातही झाड दिसावे
मर्म असे हे घ्यावे उमजून
अनंत संकटे छातीवरती
झेलीत उभा तटस्थ हिमायल
उमेद त्याची नाही संपत
होवो भूकम्प वा येवो प्रलय
दावानलाने अथांग सागर
मंथनावत् ढवळून निघतो
अनंत यातना सोसूनही
रत्नाखाणीने अखंड सजतो
प्रलयंकारी त्या संकटांची
शृंखला सदैव साहत असतो
न डगमगता नव उमेदीने
हिरवाईने निसर्ग नाटतो
येवोत कितीही संकटे अथवा
देवोत कितीही धमक्या जीवन
उमेद ज्याची संपत नाही
पुढ्यात त्याच्या झुकते गगन
प्रचिती विनायक जोशी
-
पांघरुनि चांदणे दिव्यप्रभा फाकली
वेडावता खुळी ही पौर्णिमाच लाजली
वारा लबाड ऐसा गुणगुणतो गाणी
भिजूनी दवांत विरली सुरम्य रजनी
आसमंती धुंदशी रासलीला रंगली
चमकतो आकाशी मंद रुपेरी तारा
अंगावरती घ्याव्या धवल दुग्धधारा
सावळ्या मेघासवे ही नक्षत्रे नाहली
वेलीवर मुक्याकळीला हळू जाग यावी
झुळूक बावरी सुगंध उधळीत जावी
सुकोमल रातराणी हर्षाने मोहरली
मेघपटली चाले सोहळा चंद्र लिलेचा
नील नभातुनी झाला वर्षाव अमृताचा
कृष्णमयी होत निशा शिरे चोरपाऊली
प्रचिती विनायक जोशी
-
*चांदणचुरा*
शांत सावल्या घेऊनि संगे
आरक्त सांजवेळ अंकुरली
निळ्याजांभळ्या पर्वतराजी
कशी मुक्त मनाने मोहरली
अभ्राआडूनी डोकावता सोमेश
व्योमपटी नवरंगी पखरण
कौमुदी येता लाजत मुरडत
धुंद मरुत् करी कुसुमांची उधळण
दाटून येता तिमिर सावळ
यामिनी ही भासते गंधितशी
समरस होता वातावरणी
उमलणारी मुग्ध कालिका जशी
शशिकिरणांचे अमृत प्राशून
आत्मतृप्तता लाभते चकोरा
अमोघ प्रीतीचे करण्या कौतुक
क्षितीवर निथळे चांदणचुरा
प्रचिती विनायक जोशी
-
सावर रे मना
उगाच धावीशी मृगजळापाठी
इतुका आटापिटा कशासाठी?
क्षणभरीचा मोह जाळी आयुष्य सारे
सावर रे मना सावर आता तरी रे
जगरहाटीचा या का नसे तुला थांग?
सागरासम भासे खोल अन् अथांग
सरड्यापरी इथे सारेच बदलती रंग
सावर रे मना सावर तुझे अंतरंग
चिता जाळी देह, मनास जाळी चिंता
ऐहिक सुखामागे धावण्याचा सोडवावा गुंता
वास्तवाचे भान राखूनी वाग जरासा
सावर रे मना सावर एकदाच ऐसा
पाप-पुण्याचा हिशोब लागे द्यावा इथेच
दैवयोगाचा फेरा न चुकला कुणास
उगवत्या सुर्यासही फटका बसे ग्रहणाचा
सावर रे मना सावर तोल स्वतःचा
प्रचिती विनायक जोशी
-
नकोच नुसता गाजावाजा
नकोत कोरड्या शुभेच्छा
माणुसकीची जाण असावी
एवढीच साधी अपेक्षा
जन्म दिला ज्या कुशीने
ठेवुनी त्याची जाण
आपुलकी अन् आदराने
वाढवा तिचा मान
वक्र दृष्टी करण्याआधी
तोल सावरा स्वतःचा
अबला नाही सबला आहे ती
येईल प्रत्यय तिच्या शौर्याचा
मान दिल्याने मान वाढतो
याची असावी जाणीव
विचारात थोडा केलात बदल
तर भासणार नाही कसलीच उणीव
प्रचिती विनायक जोशी
-
कैलासीचा राणा
सांबसदाशिव भोळा
व्याघ्रचर्म कटी
कंठी रुद्राक्षांच्या माळा
भाळी चंद्र विराजे
जटेमधुनी वाहे गंगा
डमरू-त्रिशूळ हाती
भस्म विलेपन अंगा
हलाहल प्राशिता
विषे कंठ होई काळा
दाह शमनार्थ
शेषा धारियले गळा
त्रिदल बिल्वपत्र
एकादश पत्री वाहता
मोदे प्रसन्न होशी
ज्योतिर्लिंग पूजिता
भक्तांसी रक्षीण्या
रुद्रावतार धरिसी
तांडावनृत्य करुनी
दुष्ट-दुर्जना निर्दाळीसी-
मावळ प्रांती मंत्र गर्जला
दख्खनचा देव जन्मला
रक्षीण्या स्वराज्यास या
शिवभूप उभा ठाकला
होता तो सिंव्हाचा छावा
खेळुनीया गनिमी कावा
हलविले तख्त दिल्लीचे
घेऊनिया हाती भगवा
नजर त्याची गरुडापरी
मावळ्यांसह करी स्वारी
रणदुंदुभी वाजे रणांगणी
आणि खेचूनी विजयश्री दारी
चिंता नव्हती परिणामांची
नव्हती भीती या जगाची
आव्हाने पेलूनिया सारी
जपली अस्मिता महाराष्ट्राची
कर्दनकाळ तो शत्रूचा
जसा लाव्हा ज्वालामुखीचा
सुखास्तव रयतेच्या
धनी जाहला स्वराज्याचा
प्रचिती विनायक जोशी
-