देह झिजला तरी कर्म उरते
आयुष्याचे मर्म कळते
फूल सुकले तरी गंध उरतो
अत्तर होऊन दरवळ जगते
दु:ख सपंले तरी आठवण उरते
वेदनेतच माणूसकी कळते
बंध नसला तरी प्रेम उरते
वय सरते तसे जगणे कळते
खुरट्या रोपावर काटेच उरतात
ओल्या ऋतूचे तेव्हा महत्त्व कळते-
....तर आतून संवेदनांची प्रेरणा लागते||
आसवांचा बांध फुटावा
आणि तू मागावा पुरावा
दु :खाला नसतो किनारा
लाटेला असतो नेहमी दुरावा..-
मन होते जेव्हा पाकळी
तेव्हा शब्द होत जातात लेखणी
जगण्याची ओळ होते आणि
विरून जाते मनातली पोकळी
जग होतं जेव्हा वादळी
तेव्हा देव देतो सावली
सगुण काय निर्गुण काय
दोघांची एकच साखळी
नभ जेव्हा भरून येतात
तेव्हा आभाळाला चढते काजळी
ऊन काय ,पाऊस काय
सांज होत जाते सावळी
-
आरश्यात निहाळावा चेहरा कितीही जरी
तरी जगणे आहे वाळूतल्या किनाऱ्यापरी
अर्थाविना शब्द होत जातात कोड्यापरी
गतकाळाच्या उत्तरांचा शोध घेते मी वेड्यापरी
जपलेले सुख उडते अत्तरापरी
आपलेच दु:ख मोठे वाटते प्रत्येकालातरी
-©पल्लवी उदय सावंत.
-
ढग भरुन आले कि पाऊस येतो
तसंच आठवणींच पण आहे
मन भरून आले कि आठवणी ओलावतात..
एकडून ,तिकडून विचारांचे वादळ रेंगाळतात
आणि मनासोबत आपण वाहवत जातो
दूर, दूर गतकाळात...
मन असते ढगासारखे
एकाकी एकटे हळवे कोमल
अलगद संथ चालत असते मौनात
कधीच नसतं आकाश त्याच कधीच नसते जमीन त्याची...-
उसवलेल्या आठवणींचा आषाढ बरसता
शुष्क डोह ही खोलवर पाणावतो
हलक्या सरीतला पिवळा चाफा घमघमता
सुंगधाच्या मागावर श्वास ही रेंगाळतो
भिजलेल्या मनाच्या जखमा कुरवाळता
वेदनेचा दाह आसवांत लोपतो
एक, एक धागा जोडता आठवणींचा
श्रावणी उन्हात कधी तो मधुमास भासतो
-
हि पावसाळी संध्याकाळ
क्षितिजाला टेकले आभाळ
रंगांच्या छटा करतात घायाळ
राग मल्हारात भिजतो दरवळ-
गुणगुणले फूल असे कि गंध दरवळला चोहीकडे
मनात, मनात बहरला आषाढ माहेरच्या ओढीतला.
-
नको आशेचा किरण कोणता
नको मनावर ओझे कसले
भावनांच्या ओढाओढीत
नको वाटते जगणे असले
एकट्यात रडणे सोयीचे
नको कोण सोबतीला
माझ्या अश्रूंना माझी उत्तरे
असेल काळोख साथीला
जगण्याची नवीन उमेद नको
नको स्वप्नांचा प्रकाश खोटा
बरी वाटते ती काळोखी रात्र
उराशी लिपटून अंधार थोडा-
कालची फुले आज निर्माल्य झाली
कालची सोबत आज आठवण ठरली
भावनांचा गंध अदृश्य,अबोल दरवळतो
ठसठसलेल्या जखमांचा काटा काळीज चिरतो
रंग, रूपात हरवला मोहमायेचा पसारा
खऱ्या सुखाला पारखा असतो किनारा
उदास मन शोधते आपलेपणा खरा
तीथेच दगा होतो हळव्या मनाचा पुरा
ऋतू पावसाळी मनात सलतो जरा
आठवणींना भिजवतो होऊन खारा...
-©पल्लवी उदय सावंत.
-