स्वरगंगेच्या काठावरती तू अन् मी
एक आकाश,एक धरती तू अन् मी
घेऊ आनंद क्षणाक्षणांचा आपण
कधी ओहोटी,कधी भरती तू अन् मी
काट्यांफुलांचे असतील रस्ते आपुले
सन्मानाने त्यांची करू आरती तू अन् मी
का नाही आली शिकता ही दुनियादारी
इथे नेहमीच बुद्धू ठरती तू अन् मी
नको आता थांबायला असे वाटते मला
चालूच ठेऊ सहल फिरती तू अन् मी
श्रीपद्मा-
कसे वर्णावे शब्दात त्याला अनाकलनीय तो
कथा,कादंबरी अन् पुराणाचा ढाचा कृष्ण
पुस्तके वाचून नाहीच मिळणार काही कदाचित
आयुष्य समजण्यासाठी एकदा वाचा कृष्ण-
समईच्या शुभ्र कळ्यापरी उजळावे आयुष्य
हवे त्याहूनही सुंदर तुज मिळावे आयुष्य
नको कोणता थांबा अन् नको रूकावट कसली
वंदे भारत प्रमाणे आनंदात पळावे आयुष्य
नको व्हायला लागण कुविचारांची कधीच
नेहमीच सत्संग अन् सत्कर्माकडे वळावे आयुष्य
फुलत रहावी मनी सदोदित आत्मियतेची बाग
मनात ठेवून सल कदापी ना ढळावे आयुष्य
येतील वादळे पण सिद्ध करशील स्वतःस तू
भवरा फुलांवरी भाळतो तसे तूजवरी भाळावे आयुष्य
नको कसली वेदना अन् नकोच दाह कसला
फुल प्राजक्ताचे ओघळते तसे ओघळावे आयुष्य
श्रीपद्मा-
तूच उत्तर प्रत्येक प्रश्ना
हरे कृष्णा हरे कृष्णा
तू मृगजळ,मृगतृष्णा
हरे कृष्णा हरे कृष्णा
तुझ्या नावात दंग रसना
हरे कृष्णा हरे कृष्णा
तू गारवा तूच उष्मा
हरे कृष्णा हरे कृष्णा
तू आवाज तू उद्घोषणा
हरे कृष्णा हरे कृष्णा
श्रीपद्मा-
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झूरतो
दे होकार राणी आयुष्य तुझ्यानावे करतो
करतात म्हणे सुवासिनी वटपोर्णिमेचे व्रत
मी ही दरवर्षी तुझ्या साठी हा उपवास धरतो
हिरे माणिक मोती माझ्या आवाक्याबाहेर
पण आनंदाच्या सहवासाने ओटी तुझी भरतो
तसा खूप संयमी मी यात शंकाच नाही पण
तुझी एक नजर अन् मी क्षणात सारं हरतो
उशा पायथ्याला माझ्या तुझ्याच स्मृतींचा पसारा
रात्र तर जागूनच दिवसही आठवणीतच सरतो
श्रीपद्मा-
असाच फडकत राहो आकाशी तिरंगा
नमन माझे सदोदित तिरंग्याच्या प्रत्येक रंगा....-
आपलं नशीब उजळ आहे
समाधाने भरली ओंजळ आहे
वडाला बांधून आलेय मी दोरा
भाळी नावाचे तुझ्या पिंजळ आहे
राजबिंडा दिसतो राजकुमारापरी
ये जवळी...लावावयाचे तीट काजळ आहे
जरा दोन शब्द स्तूतीचे येणार नाहीत
शब्दांच्या बाबतीत अगदीच कांजळ आहे
नको उगाच कुणा मागे लागणे
असे मत माझे प्रांजळ आहे
श्रीपद्मा
-
ही पोर्णिमा..हे चांदणे अन् हात तुझा हाती
लख्ख चांदण्यात आज बहरून आली प्रिती
हे निशब्द मौन...हे जीव दोन होतील एकरूप
देतील मग क्षण काही जगण्या नवा हुरूप
हे स्पर्श बोलके...ही अधीरता नको आणिक काही
तू माझ्यात अन् मी तुझ्यात होऊन जाऊ प्रवाही
ही सारी वचने..ही प्रतीक्षेत लोचने देतील आज स्थैर्य
कसे मागावे सांग आता विरहात जगण्याचे धैर्य
हे मूकशब्द तुझे...ही नयनांची भाषा हवीहवीशी वाटे
का कुणास ठाऊक आजची रजनी नवीनवीशी वाटे
श्रीपद्मा-
हा पाऊस तुझ्या डोळ्यातला
वाटतो जणू गोतवळ्यातला
कशी लावावी बोली त्याची
एक एक थेंब तोळ्यातला
अलिप्त भासतो मज असा
जणू व्यक्ती कुणी सोवळ्यातला
पांघरतो ओठी स्मित असे गोड
जणू थेंब मधमाशीच्या पोळ्यातला
श्रीपद्मा
-