अवघी पंढरी दुमदुमली
हरी नामाच्या गजरात न्हाली...
भक्ती भावाचा वाहतो पूर
विठुनामाचा होतो गजर
चंद्रभागा ही दुथडी भरली...
ओढ पावलांना पंढरीची
मन धावे विठ्ठला पाशी
संगे रखुमाई उभी ठाकली...
टाळ मृदंग वीणा सुस्वर
जिकडे तिकडे तुळस हार
विठ्ठला नामाचा जयजयकार
तहान भुक सारे विसरली ...
संत मेळा हा पंढरपूरी
एकादशीची चुकेना वारी
अशी पावन झाली नगरी
ज्ञानोबा तुकोबा माऊली....
__निलिमा✍️
-
किती आनंद झाला मनाला
बाळ दुडूदुडू धावत आला
नंदाघरी नंदनवन फुलले
घर गोकुळ झाले सगळे...
किती गोंडस ते बाळ
मन निष्पाप निर्मळ
जणु कृष्णास पाहिले
मन प्रसन्न होऊन गेले...
हे वरदान विधात्याचे
फळ पदरी सत्कर्माचे
पावून मन तृप्त झाले
मोठे भाग्य उदयास आले...
__निलिमा✍️
-
नीज माझ्या नंदलाला ,नंदलाला रे
आई जाते बघ दूर कामाला
बाबा कधीचाच बाहेर गेला
तु तर बाळ शहाणा नीज रे...
खेळणी तुझ्या भोवती सारी
आणली रे किती भारी
गोल भिरभिरे पाळण्यावरी
आई येईल सांज वेळी ऐक रे...
नजर शोधते तुझी घरभर
आई दिसत नाही समोर
आईची आठवण येते का रे
वाट बघुन तू नीजशील का रे...
चिऊ काऊ ची गोष्ट जुनी
संपली अंगाईची गाणी
नको आणु तू डोळ्यांत पाणी
ऐकुन बडबड गीत नीज रे
निलिमा ✍️
-
निघाले आज तिकडच्या घरी ...
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
ओठांवर हसू डोळयात पाणी
लपवून ठेवते वेदना उरी...
मायेची आता सुटली पाखर
झाले पाहुणी जुळले सासर
दोन्ही घरी मी अधांतरी...
व्यथीत मन जन्मदात्याचे
जगावेगळे रूप नात्याचे
पाऊल अडते उंबऱ्यावरी...
लेक लाडकी जाते दूर
डोळ्यात दाटला पूर
स्नेह लाभो जन्मांतरी...-
नाही कशी म्हणू तुला, नाही मला कळत
तुझ्या हट्टा समोर माझे काही नाही चालत...
नाही कशी म्हणू तुला , तुझेच सारे खरे
माझ्या मनातले सारे माझ्या कडेच बरे...
नाही कशी म्हणू तुला,तुझे ऐकणार कशी नाही
तुझ्या शिवाय मला काही जमणार पण नाही...
नाही कशी म्हणू तुला, तुझेच सर्व काही
माझ्या कडे माझे असे काहीच तर नाही...
नाही कशी म्हणू तुला, तुच माझे सर्वस्व
आयुष्यभर मनावर तुझेच तर वर्चस्व...
-
नाविका रे वारा वाहे रे
सोपी नाही जीवनाची
तुझी वाट रे...
वादळवारे नियतीचे
जगणे हे संकटाचे
पाय रोवून उभे तरी
सांभाळून तोल रे...
सुख दुःख मोठा डोंगर
प्रश्नाचा अथांग सागर
तोच एक शिल्पकार
आम्ही कोण रे...
मनाचिये गुंती येथे
अश्रू कधीही ना तुटे
आनंदाच्या वाटेत काटे
नको विसरू रे...-
वेळेचे घर वेळेवर उघडावे
वेळेला जपावे वेळोवेळी ...
वेळेचा कधी करू नये अनादर
वेळेत व्हावे कुठेही सादर...
वेळ कुणाला सांगून येत नाही
वेळ कोणासाठी थांबत ही नाही...
वेळेसाठी आपण आपल्यासाठी वेळ
वेळेशिवाय नाही जीवनाचा खेळ...
वेळे वेळेचे वेगळे वेगळे महत्व
वेळच तर आहे आयुष्याचे तत्व...-
नयन तुझे जादूगार
बघताच हरवले भान
हे सौंदर्य सम्राज्ञी
किती गोड हसतेस...
हे काजळ काळे शोभे
धडधड ऊरात वाढे
शब्दही सुचत नाही
का उगाच छळतेस...
नजरेत तुझ्या कावा
मलाही वाटे हेवा
मी जाणतो ते भाव
का अशी लाजतेस...-
आयुष्य माझे हे बदलले
असंख्य घटनांनी ढवळले
सुख दुःखाच्या लाटांनी
किनाऱ्यावर नेऊन आदळले...
-
नकळत सारे घडले
मी घसरून लगेच पडले...
ती पहिली सर ओलेती
किती चिखल झाला भोवती
घसरण त्यातच भलती
पायच घसरून पडले...
चिखलाने अंग हे भरले
मी बघुन चहुकडे घेतले
मला कोणीच नव्हते पाहिले
मी खुशीत उभे राहिले...
हे दिवस कठीण पावसाचे
क्षण कित्येक असे येण्याचे
मी तेव्हा ओशाळून का गेले
कोडे आजवर नाही सुटले...-