एकतारी संगे एकरूप झालो
चैतन्यमय संगीतात समरूप झालो
भक्तीमय कीर्तनात अवघे मन डोलते
श्रीहरीच्या नामात देहभान हरपते
जगण्यातील पसाऱ्यात विरक्तीचे धागे
शब्द सांभाळतात अलौकिक नाते
विशुद्ध भावनेत अंतरंग उजळते
विनम्रतेच्या सावलीत अस्तित्व बहरते
मोहाच्या किनारी मृगजळाचे फासे
पावलांना खुणावतात भविष्याचे भरवसे
एकरूपतेच्या भावात जीवनाचे तराणे
माउलीच्या कृपेत आनंदाचे चांदणे.
-
लाडिक लेक
ऋणानुबंधातील नात्यांत
लाडिक लेक मिळते
तिच्या निरागस स्पर्शात
चैतन्याची अनुभूती येते
लेकीच्या मंजुळ पैंजणात
अवघे घर अंगण सुखावते
तिच्या मधुर आवाजात
जगण्याची किलबिल ऐकू येते.-
शु भ स का ळ !
तुझ्या अस्तित्वाचे गाव
गाभाऱ्यात शोधावे
तुझ्या रूपाचे भाव
नयनांत साठवावे.-
निसर्गातील सौंदर्य
मनाला मोहित करते
अन् अनुपम औदार्य
साऱ्या जीवाला जगवते
आकाश धरतीचे मिलन
डोळ्यांना आनंद देते
वारा जलाचे मंगल चेतन
सदैव जीवनदान असते.-
शु भ स का ळ !
विरक्तीच्या भेटी
क्षण रुणझुणे
डोळ्यांत चांदणे
कैवल्याचे!-
काळीज एकाकी होते
जेव्हा साथीदार सोडून जातो
श्वासांच्या अनावर स्पंदनांत
जेव्हा साक्षीदार विसरून जातो.-
आठवणींतील हसरा चेहरा
सुगंधित दर्पणात सजतो
जगण्यातील लाजरा किनारा
जिवलगाच्या प्रेमात मोहरतो.
-
माझी रोजनिशी
अलिकडे माझ्यावर रागावलेली आहे
एकाही पानावर मनासारखे घडत नाही
अन् जे आवडत नाही
ते प्रत्यक्षात डोळ्यांसमोर घडत आहे
स्वप्नांचा हिशोब दिवसेंदिवस
गुंतागुंतीचा होत आहे
पण उद्याच्या चांदण्यातील पानाचा मोठेपणा
महत्वपूर्ण वाटत आहे.-
श ब्द
अरे शब्दांनो !...नका रे असे दूर जाऊ...
अरे!...तुमच्या हळव्या स्पर्शामुळे
जीवनाविषयी थोडेफार सांगता येते...
तुमच्या मोहक सुगंधामुळे
प्रेमाची अवघड भाषा वाचता येते
तुमच्या अतूट ऋणानुबंधामुळे
जिवलगाच्या काळजात दिशा उजळते
अरे शब्दांनो !...नका रे असे अबोल होऊ...
अरे!...तुमच्या विश्वासू श्वासांमुळेच
विरहातील वेदना चांदण्यात बोलते.-
उ प रो ध
आज पहाट उशीराच उगवली
फुलांनी सुगंधता हलकेच हरवली
काट्यांनी प्रेम भावना जागवली
आर्त शब्दांची जवळीक कोमेजली.-