परतीची वाट
-
माझे शब्द आणि मी...
कितीही असाल तुम्ही
तुमच्या संसारात दंग
पण नाही आयुष्यात
गड्या मित्रांशिवाय रंग
असतील कितीही अडचणी
जिवलगाला बोलत जा
आपल्या अंतर्मनाचा कप्पा
त्याच्यासमोर खोलत जा
आयुष्यभर सुखदुःखात
नेहमीच तो साथ देतो
तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं
तोच उत्तर बनून राहतो
-
जुनी पेन्शन
नाही तुला कुणाला भांडायचं,फक्त तुझं हक्काचं मागायचं I
जुनी पेन्शन नसल्यावर वेड्या, तीन हजारात कसं रे जगायचं?
गोळया औषधाचीही ऐपत नसेल, जेव्हा पडशील तू आजारी l
नसेल तुला पेन्शन तर, जवळचेही नसतील तुझ्या शेजारी II
पेटून नाहीस उठला तर, म्हातारपणी भोगावं लागेल l
पेन्शनचा आधार गेला तर, निराधार होऊन जगावं लागेल II
नाही गेली वेळ अजून, सामील हॊ पेन्शन प्रवाहात l
असू दे तुझाही थोडा वाटा, या जुन्या पेन्शनच्या संघर्षात II
म्हातारपणाच्या आधारासाठी, सैनिका तरुणपणीच जागा हॊ l
यश नक्कीच येणार लढ्याला, फक्त तू संघर्षाचा धागा हॊ II
मधुसूदन पेटकर, पेन्शन फायटर-
एकांत
मी तुझ्यात गुंतताना, माझ्यात गुंतलीस तू l
हा गुंता सोडविण्याला, हा एकांत ना मिळाला ll
तुझी प्रेमपत्रे सारी, चाळतो रोज नव्याने l
त्या पत्रांच्या उत्तराला, हा एकांत ना मिळाला ll
नको काटे गुलाबांचे, मी गुंफले मोगऱ्याला l
गजरा तो माळण्याला, हा एकांत ना मिळाला ll
जागा शोधल्या भेटीच्या, तारखाही खूप झाल्या l
तुझ्या माझ्या भेटण्याला, हा एकांत ना मिळाला ll
तुझी वाट पाहताना, हाती पत्रिकाच आली l
राख स्वप्नांची होण्याला, आता एकांत मिळाला ll
रोज तुझ्या आठवांच्या, हुंदक्यांनी ओल्या राती l
ती आसवे पुसण्याला, आता एकांत मिळाला II
मधुसूदन पेटकर
-
तडजोड
दुधाची बाटली धरली उरी
रडत होता माझा तान्हाl
केली तेव्हा तडजोड मातृत्वाशी
जेव्हा फुटत नव्हता पान्हा ll
नव्हतं पैसं फी भरायला
जेव्हा अडलं मुलाचं शिक्षण l
केली तेव्हा तडजोड सौभाग्याशी
ठेवून मंगळसूत्र गहाण ll
नवरा यायचा दारू पिऊन
नेहमी राहायचा मारत झोडत l
केली तेव्हा तडजोड भावनांशी
कधीच नाही बसले रडत ll
होती आशा सुखी संसाराची
जेव्हा मुलाचं लग्न झालं l
केली तेव्हा तडजोड सुखाशी
बायकोनं त्याला परकं केलं ll
अखेर मीच पाणी पाजलं
जेव्हा नवरा आजारपणात मेला l
केली तेव्हा तडजोड कर्तव्याशी
मुलगा मातीलाही नाही आला ll
रोजच मेल्यासारखं जगत गेले
जगताना एकदाचं यावे मरण l
आता करीन तडजोड मरणाशी
माझं मीच रचून सरण ll
मधुसूदन पेटकर-
*अलक*
*उडून गेलेली पाखरे*
तो म्हातारा बाप अमेरिकेत असलेल्या आपल्या एकुलत्या एका मुलाची आतुरतेने वाट पाहत होता. म्हातारी आई आजारी असल्याचा निरोप त्याला दिला होता. तिला भेटायला येणार होता. पंधरा दिवस झाले, तो आलाच नाही. म्हातारी दोसरा काढून काल गेली. त्याला तसा निरोप गेला. 'शेवटचं पाणी पाजायला तरी येईल'.. असाहाय्य बाप त्याची वेड्या आशेने वाट पाहत बसला. पण दुसऱ्या दिवशी शेजाऱ्याजवळ त्याचा मेसेज आला... "घ्या उरकून "
मधुसूदन पेटकर, पिंपळनेर-
अलक... अति लघु कथा
गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर एकामागून येणाऱ्या लाटांवर स्वार होत आनंद लुटणाऱ्या पर्यटकांची विशेषतः जोडप्यांची चाललेली मस्ती, ओघळणारी आसवं पुसत 'तो' बघत होता. त्या लाटा जणू त्याच्या काळजावर आदळतच होत्या. मधूनच लाटांवरच्या स्पीडबोटी चर्रर्रर्रर्र करीत त्याचं काळीज चिरत होत्या. काही दिवसांपूर्वी याच समुद्रानं गिळलेल्या त्याच्या प्रियेच्या आठवणींत भिजलेलं त्याचं मन त्या लाटांत गटांगळ्या खात होतं...... अगदी तिच्यासारखचं.....-