मी रे रुग्णवाहिका.....
पळून पळून थकते रे थांबता येत नाही
तुमच्या डोळ्यातली आसव मला बघवत नाही
जगवण्यासाठी पळत सुटते अरे मी देव नाही
पण माणसा मला समजून घे मी तुझी शान नाही
सन्मान देतो बाजूला सरकतो मनात मात्र घाबरतो
सहानुभूतीने बघतो नि अपेक्षाही ठेवतो
नेणार्याला जिवंत बघण्याची कामना तू करतो
पण मी मात्र मशीन आहे हेच तु विसरतो
जगण्यासाठी मी नाही मनाची ताकद जागवा
माझी वाट बघत कारे तुम्ही दारामध्ये थांबता
माणसं मी जिवंत आणि मेलेले ही नेते
सर्वांच्या दुःखाचा बाजार मी उघड्या डोळ्यांनी बघते
मला कुणी बोलवू नका दारात कुणी थांबू नका
आनंदाने फक्त शरीर मन सांभाळा
मी मात्र देव नाही कर्म मी करत राहते
तुला जगविण्यासाठीच रे मी जीव घेऊन पळत सुटते
माझ्या डोळ्यांतली आसव तुला कधी दिसत नाही
नाही म्हटलं तरी तूला नेल्याशिवाय राहवत नाही
माधुरी सायखेडे
.-
आयुष्याचा रंगमंच
आयुष्याचे नाटक जन्मापासून सुरू होऊन मृत्यूपर्यंत संपते
जन्म-मृत्यूच्या मधल्या काळातच आयुष्य रंगत असते
रंगमंचावर उतरताना मुखवटे ही किती असतात
प्रत्येक मुखवट्या मागे आनंदाबरोबर वेदनाही लपतात
कलाकार आपणच अभिनयही आपलाच
नाटकाचा लेखक ईश्वरही आपलाच
जन्मापासून सुरू होऊन मृत्यूपर्यंत संपते
चार अंकी नाटकामध्ये मध्यांतरच नसते
बाल्यावस्था यौनावस्था साराच असतो पोरखेळ
प्रौढावस्था वृद्धावस्था नाही घालता येत मेळ
मंच्यावर भूमिकेत उतरावंच लागतं
आयुष्याच गणित बाकी न ठेवता सोडवावंच लागतं
मंचावर मात्र एकदाच उतरायचं असतं
मुखवट्याला आपणच सजवायचं असतं
बोलावणे आल्यावरती नाटक अर्धवट टाकून जायलाच लागतं
पडदा पडला की सर्वच आवरावं लागतं
अभिनय चांगला म्हणून बक्षीस नसतं
मुखवटा काढला की सार संपलेलं असतं
माधुरी सायखेडे
-
शामरंग
कान्हास आवडे ही रास लीला बाई
रंगांची उधळण त्यात कमी नाही
श्याम तो सावळा ग करतो उगाच खोडी
गोऱ्या ग राधिकेला मारी तसे पिचकारी
रंगात जाई भिजुनी राधा होई बावरी
सांगू कुणा सखे मी तो शाम रंग लावी
कान्हास आवडे ग खेळावयास रंग
लावुनी रंग राधा घेई खरा आनंद
राधा मनी सुखावे लावूनी घेई रंग
आनंदी रास खेळे धुंदीत सावळ्या ग
लाडिक लटक्या रागा राधाग करते क्रोध
तरी सावळ्या हरीला नसतो तिचा विरोध
रंगात रंगुनी ही राधा होय लाजरी
लावू कसा मी रंग हरी तर माझ्या उरी
मीच राधा मीच कान्हा रंगात मी नहावे
त्या सावळ्या हरिचे नाव कुणी न घ्यावे
माधुरी सायखेडे
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
-
कविता
सुंदर आणि वाईट म्हणण्यासाठी
अगोदर जन्मावं लागतं,
ओठांवर येण्यासाठी शब्दांना
मनात असावं लागतं,
कवितेला गर्भातूनच जन्मावा लागतं,
कागदावर उतरताना अलगद
आणि हलकं व्हावं लागतं,
जड जड आणि मोठ्या अक्षरांना
गाळावच लागतं,
कवितेला गर्भातूनच जन्मावं लागतं,
हलक्या शब्दांचा अर्थ ही
हलकाच असावा लागतो,
मनाच्या गाभार्यात त्याला
उतरावं लागतं,
कवितेला गर्भातूनच जन्मावं लागतं,
उतरताना पिसासारखं
हलकच व्हावं लागतं,
लहान बाळासारखं पण
अवखळ असावं लागतं,
कवितेला गर्भातूनच जन्मावं लागतं,
घुटी सारखं थोडसं
तुरट कडवट बोलावं लागतं,
बाळसेदार होण्यासाठी
शब्दांनाच फुलावं लागतं,
कवितेला गर्भातूनच जन्मावं लागतं,
हळुवार शब्दातून मनाला
झुलवावं लागतं,
पुन्हा गर्भातच उतरायला
काही तरी मनात असावं लागतं.
माधुरी-