काडी काडी जमवून
खोपा तिनं सांधला..
आपुलकीचे धागे जोडून
नात्याचा रुमाल विणला...
उन्हाताना चारा साठवून
दुष्काळ तिनं हरविला...
भुकेल्या चोचीमध्ये
घास तिनं भरविला..
जोडीदाराच्या विरहानं
जगणं तिनं सोडलं...
चिमुकलांना पाहून
स्वतःला तिनं सावरलं...
पंखात बळ येऊन
पिल्लं गगनभरारी घेत...
कौतुक पाहून सारं
तिचे डोळे भरून येत...
पिल्लं विसरली गतकाळ
अन् वेदनांच्या कळा...
डोंगराएवढे तिचे कष्ट
खरंच आले नाही फळा...
विषारी शब्दाचा इंगळीने
हृदयावरच डंख मारले...
पडून भेगा झरोक्याला
पंख तिचे गळून पडले....
कृतघ्नतेची सीमारेषा
वारसांनी पुरती ओलांडली
काळजावर घाव घालून
सुगरण जखमी केली...
-
तू गेलास अनामिक वाटेनं
अन् काळोख दाटला
मी शोधत राहिले तिलक, राखी, करदोडा अन् ओवाळणी
पण त्या काळ्याकुट्ट अंधारात गुडूप झालं सारं काही
माहेराची वाट सुद्धा...! 😢
कोमल नाईकडे ✍️
-
तू गेलास अनामिक वाटेनं
अन् अंधार दाटला
त्याच अंधारात गुडूप झाली
माहेराची वाट... 🥲-
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवू,
आसमंत सारा गंधित करू...
काटेरी वाटांना लिंपण घालू,
सुखाचे अत्तर शिंपण करू...
-
ती खणते खोल,
खड्डा नालाबंडींगचा
फोडते पाझर कातळाला
भविष्यलेणी खोदण्यासाठी...
तप्त मातीचा प्रखर दाह
पोळतो खोल तळ्व्याला
धूळमाखल्या आयुष्याची
वाट घडवण्यासाठी...
कितीदा पेरते काळीज
भेगाळल्या त्या हातांनी
उभ्या वांझोट्या भुईत
अंकुर फुटवण्यासाठी....
पीत राहते बारोमास
वेदनांचेच हलाहल
काळा निळा होतो कंठ
अमृताच्या थेंबासाठी...
ग्रीष्माच्या सोसून झळा
अंगाची होते लाही लाही
वसंताच्या सावलीतून
जग पाहते असे
जसे दुरून डोंगर साजरे...
प्रा. कोमल नाईकडे ✍️-
सोसून वेदकळांची मालिका,
प्रसवते काट्याच्या गर्भातून....
हिरवा पांघरुनी शेला
फुलते कविता फुलाच्या गर्भातून...
-
बीजं अंकुरली ज्ञानाची
मनाच्या मातीत...
अंगणी रास उजेडाची
काळ्याकुट्ट रातीत...
प्रा. कोमल नाईकडे ✍️
-
हा पाऊस आठवांचा,
कोसळतो हृदयांगणी...
ओलाचिंब करूनी जाता,
शिरशिरी येते मनी....
-