मनातल्या विचारांना संयमाचं कुलूप लागलं की,
मन आनंदात विहरू लागतं......-
सांगड चार शब्दांची,
आणि निवड चार वाक्यांची,
लोक याला संवाद म्हणतात,
मात्र हे फक्त खेळ शब्दांचे असतात,
एक विशिष्ट संरचना शब्दांची,
ज्यात मुभा असते स्वतःचा अर्थ काढायची,
त्याला संवाद म्हणत नाही,
कोरड्या शब्दाला येथे महत्त्व राही,
संवाद म्हणजे समोरच्याला समजून घेणे,
वाईट वाटले तरी निघून न जाणे,
कारण अर्थ जो लागला तुम्हाला,
नसेल कधी शिवला तो त्याच्या मनाला,
स्वतःला हवे तसे अर्थ संवादात न काढावे,
काढले तरी त्याचे स्पष्टीकरण मांडणार्यास विचारावे,
कारण समोरचा एखादी चांगली कल्पना मांडत असावा,
फक्त आपल्या चुकीच्या विचाराने तो थांबला असावा,
नसेल पटले म्हणणे एखाद्याचे,
तर वाद झडू द्या त्यावरचे,
कारण जो वाद निष्कर्षाप्रत जातो,
तो वाद नसून संवाद असतो,
-
या वर्षाचा शेवटचा दिवस आज,
मात्र जाता खूप आठवणी देत आहे,
पुन्हा येऊ नकोस असे लोक म्हणत आहे आज,
मात्र हे वर्ष खूप काही शिकवून गेलं आहे,
अग्नितांडवाने सुरू झालेले हे वर्ष,
जीवनाच्या परिभाषाच बदलून गेले,
महामारी सोबत घेऊनच संपणारे हे वर्ष,
खूप संधी देऊन मात्र गेले,
दंगलीने सुरू झालेले हे वर्ष,
लोकांना दुरावून नेणार असे वाटले,
मात्र लोकांना जवळ आणून गेले वर्ष,
आणि त्याची गोड फळेही वाटूनच गेले,
नोकर्या गेल्या या वर्षी लोकांच्या,
मात्र कमी गरजात जगणे शिकवले,
संधी दिल्या नवीन काहीतरी करायच्या,
जाता जाता खूप काही शिकवून गेले,
जुन्या आठवणींना उजाळा दिला,
खाद्यपदार्थांच्या मैफिली जमवल्या,
माणसानेच माणसाला मदतीचा हात दिला,
आणि वर्षात दोन दिवाळी अनुभवल्या,
वाईट एकाच गोष्टीचे वाटते,
खूप जणांना दुरावून गेले हे वर्ष,
काळाच्या उदरात गुप्त झालेत ते,
आणि आता असेच संपले गेले वर्ष,-
ओळखलत का तुम्ही मला,
मी चिऊताई कावळा-चिमणीच्या गोष्टीतली,
आज गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला,
जी कावळेदादा निघून गेल्यावर घडली,
भेटली मी एकदा कावळेदादाला,
त्याच्या घरट्यात स्वागत केलं त्यानी माझं,
विश्वात गुंग होती म्हणून माझ्यावर नाही रागावला,
म्हणाला, तुझ्या आनंदावर अतिक्रमण केलं नाही माझं,
सवय झाली रे मला तुझी मला का एकटं केलंस ,
असं जेव्हा मी बोलले त्याला,
म्हणाला, जगात कुणीच नसतं एकटं असं,
आता हा एकटेपणाच भावतो माझ्या मनाला,
जेव्हा मी निघाले त्याच्या घरट्यातून,
तेव्हा त्याचे शद्ब मनाला लागून गेले,
तुझं नेहमी मी स्वागतच करीन माझा वेळ काढून,
टकटक तुझी ऐकून दार सतत असेल उघडलेले,
आयुष्याचा धडा कावळेदादा देऊन गेला,
कोणी साद घालत असताना त्याला ओ द्यावी,
एकदा का समोरच्याचा सहनशक्तीचा बांध फुटला,
तर अहंपणा तुटायला वेळ लागत नाही......-
चांगले श्रोते बना. आजकालच्या काळात सल्लागारांची संख्या वाढते आहे पण, श्रोते कमी होत आहेत. श्रोता तो असतो, जो समोरच्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतो आणि मत विचारलं तर आणि तरच मत देतो. आयुष्यात कित्येकदा सल्ल्याची गरज नसते कारण, उपाय माहिती असतो फक्त ऐकून घेण्याची गरज असते, ऐकणार्याची कमी असते. इथेच सगळे कमी पडतात. आजकालच्या अविश्वासाच्या जगात आपण कोणाजवळ बोललेलं फुटणार तर नाही ना, कोणी आपल्या या गुपिताचा फायदा तर घेणार नाही ना याच भितीनी लोक आतल्या आत कुढत असतात आणि अव्यक्त राहात असतात. हेच अव्यक्त राहाणं नंतर नैराश्यात परावर्तित होतं. याच नैराश्यावर पुढे अपेक्षांचं ओझं पडतं आणि नैराश्य वाढतंच जातं. आज आपण लोकांना जेव्हा speak up म्हणत आहोत तेव्हा समोरच्याला समजून घेऊन समोरच्याच्या मनात विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. आपल्या मनातलं या व्यक्तीजवळ बोलल्यास ते कुठेही बाहेर जात नाही आणि फायदा घेतल्या जात नाही हा विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे आणि तेव्हाच speak up यशस्वी होईल. त्यामुळे श्रोता बनणं गरजेचं आहे. बघा पटतंय का......?
-
सुखाचा पाठलाग करता करता,
सुख मागे पडायला लागते,
दुःखापासून दूर पळता पळता,
दुःख वाट्याला यायला लागते,
सगळंच हवं म्हणता म्हणता,
ओंजळ कमी पडायला लागते,
वेळीच न आल्याने थांबता,
नियतीच मग न्याय करते,
ओसंडून वाहाणार्या ओंजळीतून जे पडेल,
तेच गमवायला भाग पाडलं जातं,
मग जे नशिबात उरलं असेल,
त्यासोबतच मन मारून जगावं लागतं,
ओंजळीत मावेल तेवढंच उचलावं,
सगळंच या जगात मिळत नसतं,
जे गमाववं लागलं त्याचं दुःख नाही करावं,
कारण, ते कधीच आपल्याला मिळणार नव्हतं.....-
दरवेळी लिहायचं राहूनच जाते,
नेहमीच शब्दात व्यक्त नाही करता येत मला,
तुमच्यासमोर प्रयत्न करते,
चुकलं तर माफ करा मला,
मुडदा बसवला त्या वटवाघळाचा,
आणि त्याला खाणार्याचा पण बसवला,
आजार आला हा कोरोनाचा,
आणि माहेरी जाण्यात खंड पडला,
ही टाळेबंदी आणि घरबंदी,
चार दिवस बरी वाटली,
आरामाची वाटली ही संधी,
मात्र, हीच बंदी नंतर अंगावर आली,
भांड्यावाली आणि धुणेवाली दोघीही घरी बसल्या,
आणि कामं सगळी अंगावर आली,
माझं एक जेवण संपल्या संपल्या,
मुलं आणि नवरा पुन्हा खायला मागू लागली,
भात आणि खिचडीवर तर कधीच नाही भागलं,
रोज काहीतरी नवीन पाहिजे असतं,
नंतरची कामं करायला म्हटलं,
तर सगळे वरच्या पट्टीत घोरायला लागतात,
माहिती नाही रे मला देवा,
कोणतं पाप आडवं आलं माझं,
आतातरी यातून सोडव रे मला देवा,
नाहीतर आता पागल होणं नाही चुकलं माझं.......-
भोग ना चुकले कुणा,
नाही सज्जना नाही दुर्जना,
जैसा जो वागतो तैसे फळ मिळते त्याला,
जरी कितीही करूणा भाकली देवाला,
भोग कर्माचे या,
नाही चुकले जगन्नियंत्याला या,
लपून मारला बाण रामाने वालीला,
लपून मारलेल्या बाणाला बळी कृष्ण पडला,
जिथे देवाचे कर्मासमोर चालत नाही,
तिथे तू कोणी मोठा नाही,
हा जन्म जरी संपला तुझा भोगता भोगता,
तरी कर्म संपत नाही भोगता भोगता,
जसा तू वागतोस तसेच तुला फळ मिळते,
अधर्म केलास तर अधर्माचीच शिदोरी सोबत येते,
जसा अभिमन्यू मारला सात योध्यांनी अधर्माने,
तसेच ते सातही योध्ये हरले अधर्माने,
कर्माचा चक्रव्यूह तेव्हाच थांबेल,
जेव्हा तू अपेक्षा करणं थांबवशिल,
बदल्याची भावना सोडून तू या जगात,
जेव्हा प्रेमाचे बिज रूजवशील मनात.......
-
गर्द काळोखात मनाच्या,
कोणीच माझ्यासोबत नव्हते,
जसे प्रवासात चंद्राच्या,
असून देखील कोणीच नसते,
प्रवासात येणार्या ढगांंचा,
सामना मी एकटीच करत होते,
असून देखील नव्हता आधार कुणाचा,
मीच माझा मार्ग शोधत होते,
त्याच माझ्या या मार्गामध्ये,
अचानक कुठून तू आलास,
आलास माझ्या जीवनामध्ये,
आणि कधी महत्त्वाचा बनलास,
विचारसुद्धा केला नव्हता मी,
कोणीतरी माझ्यासाठी जगेल,
महत्त्वाची होईल इतकी मी,
की कोणी माझ्यासाठी रडेल,
दूर जरी आहेस तू माझ्यापासून,
माझ्या हृदयी तू सतत वसतोस,
कोणी नाही रे दुसरं मला तुझ्यावाचून,
सगळीकडे मला तूच दिसतोस.......-
यातना लेखणीत माझ्या उतरत नाही,
व्यक्त मी त्या कश्या करू,
मिळालेल्या यातना तुम्ही सहन करू शकत नाही,
मी तरी त्या कागदावर नेमक्या कश्या उतरवू,
लोकशाही आहे की ठोकशाही इथे,
बिलकूल बोलायचं नाही,
कोरोना विरूद्ध सरकार लढतंय म्हणे इथे,
तुमचे दोन-तीन गेले तर फरक पडत नाही,
इथे पोलिसांसमोर व्यायाम करणे गुन्हा,
शिक्षा मात्र कडक त्यासाठी,
दोनशेजणानी दोन जणाना मारणं नाही गुन्हा,
सूट मिळते इथे तुम्हाला हे करण्यासाठी,
शाहू फुले आंबेडकर आणि इतर महापुरूष,
फक्त फोटोत टांगण्यापुरते ठेवलेत,
हवे तेवढेच वापरतो आम्ही ते महापुरूष,
बाकी वेळी हे महापुरूषास्त्र भात्यात ठेवलेत,
बदल हवा होताना तुम्हाला,
हा सुद्धा बदलच तर आहे,
चूपचाप गपगुमान राहाणं भाग आहे तुम्हाला,
कारण, हीच तर आमची लोकशाही आहे.......-