न जुळलेले गुण...(१)
-Kalyani pawar .
-
ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे
याचा विसरच पडतो जणु कधी तिला.
ती सांभाळत असते सारे
आधीपासून सुरू झालेले
आत्तापर्यंत चालु राहिलेले.
कोणाच्या तळाशी
काय काय साचलेले
ती बरोबर ओळखते.
प्रश्न कोणाचेच का असेनात
ती राखीव उत्तर म्हणून उभीच असते.
-Kalyani Pawar..
-
अधुन मधुन आठवतात काही माणसं
आनंदी जगण्यासाठी केलेली गुंतवणूक म्हणून.
आणि यात काही गैर नाहीये .
व्यस्त आयुष्याच्या तक्रारी कोपऱ्यात
कधी तरी ठेऊन दिल्या की झालं,
आपले आपण जगायला मोकळे.
आणि गुंतवणूक पैशांची असो वा माणसांची
ती उत्तम रिटर्न्स देते की नाही
हे पाहतोच की आपण सारे
फरक फक्त एवढाच
पैशांची गुंतवणूक ही आर्थिक सौख्य देते
तर माणसांची गुंतवणूक भावनिक आधाराबरोबर
आनंदी जगण्यासाठी ही कारणीभूत ठरते.
-Kalyani Pawar...
-
तीच्या अन् त्याच्या आठवणींना उजाळा देताना
भाग-१
नको असलेली वळणं नको तेव्हा घ्यावी लागली
की काय होतं हे मला विचार ,
तू मात्र ठाम रहा तुझ्या निर्णयावर
फांद्या तुटतानाही घरटी जपणारी तु
एवढ्यात हार मानणार नाही माहितेय मला
परवाच त़ो समोरून गेला
तुझ्या बद्दल विचारत होता
मी म्हणालो होतो ना तुला
त्याला आहे काळजी म्हणुन
तुम्ही शब्दात व्यक्त व्हायला हवं होतं ,
हृदयात ठसठसणारी काही दुःख असतात साऱ्यांनाच,
उन्हाळलेल्या देहावरून पाऊसाची सर अलगद निसटून जावी ,
तशी काही माणसं आयुष्यातुन निघुन गेली की संपलं सारं .
अजुनही वेळ आहे
शब्दात व्यक्त होण्याची ,
जुन्या नव्या प्रश्नांना वाट करून दयायची
-Kalyani Pawar..
-
खरेच देवा तु मान्य करायला भाग पाडतोस तुझं अस्तित्व..
वेदनेचा सुर जेव्हा बेसुर तु ठरवतोस
तेव्हा तु मान्य करायला भाग पाडतोस तुझं अस्तित्व.
अशांत अस्थिर जगण्याला ही
सुखाची झोप तु मिळवून देतोस
तेव्हा तु मान्य करायला भाग पाडतोस तुझं अस्तित्व .
आयुष्याची गणितं जेव्हा चुकतात
तेव्हा ती सुधारण्याची एक संधी तु देतोस
तेव्हा तु मान्य करायला भाग पाडतोस तुझं अस्तित्व.
नकारात्मकतेत गुरफटलेल्या नात्यांमधुन मोकळे करतोस.
तेव्हा तु मान्य करायला भाग पाडतोस तुझं अस्तित्व.
हरलेल्या मनाची , बुद्धीची समजुत जेव्हा तु
घालुन देतोस .
तेव्हा तु मान्य करायला भाग पाडतोस तुझं अस्तित्व.
संघर्षातून खचलेल्या मनाचे रितेपण
जेव्हा तु भरून काढतोस .
तेव्हा तु मान्य करायला भाग पाडतोस तुझं अस्तित्व.
परिस्थितीच्या परिवर्तनातुन सकारात्मकतेचं
जे रूप तु दाखवतोस
तेव्हा तु खरेच मान्य करायला भाग पाडतोस तुझं अस्तित्व.
-Kalyani Pawar.
-
गुंतलेला प्राण
उन्हे घेऊन येतो डोळी तिच्या.
सरलेल्या दिसांची याद
काळजातल्या कळ्यांना करून देत.
तो ही पाहत असतो सारे
पण डोळ्यांतुन पाणी काढायला मनाई असते,
बाप रडलेला बरा दिसत नाही
असे म्हणे.
-Kalyani Pawar.
-
खुप काही असुनही
काहीतरी नाही
याच भांडवल करणारी
आणि
खुप काही नसुनही
जे आहे ते ही खुप आहे
यात समाधान मानणारी ..
- Kalyani Pawar.
-
कुठुन कुठुन वाहुन काही आलं.
मनातलं सारं त्यातच वाहुन गेलं.
नुसताच चिखल तुडवत तुडवत
ती ही चालु लागली
पाय आपटत आपटत ..
आपटण्याचा सराव नव्हताच तीचा कधी तरीही
हे त्या पाऊसाला ही जणु माहीत असावं.
त्याने ही धो धो बरसुन घेतलं
आणि
तो थांबला.
तीच्या नजरेत रेंगाळणाऱ्या त्याच्या प्रतिक्षेत...
-Kalyani Pawar.
-
मन ..
जुन्या जुन्या आठवां भोवती
फिरत राहतं एक मन
निरागस हसण्याला बालपणीची
ओढ देऊन जात तेच मन
खुप काही रंगवण्याचा
पल्ला त्याने पार केलेला
हे ही सांगत जात तेच मन.
तारुण्याच्या उंबरठ्यावर
प्रेमाचं गीत गात राहत तेच मन
मैत्रीच्या ओलाव्याचे गोडवे
आता ही गात राहत तेच हे मन.
नात्यांच्या नाजुक बंधात
फुलत जातं ते हेच मन.
-Kalyani Pawar...
-
शुन्यात नजर लावून बसु नकोस बयो.
तुझ्या अस्तित्वाचा एवढाच विसर पडला तुला.
संघर्षाच्या पवित्र्यात किती भिजली होतीस तु ,
हे तुला नव्याने सांगायला नको..
उठ उभी रहा,
लढ पुन्हा
मनगटात ताकद आहे ना
जिंकुन घे मोडलेल्या परिस्थितीला
आणि सिद्ध करुन दे स्वतः ला.
-Kalyani Pawar.
-