पाहता मी तू दिलेला सोनचाफा
आज भरतो आठवांचा खास ताफा
-
आज झाली फार मोठी चूक माझी
चोरते त्या भाकरीला भूक माझी
पाहिलेले लोचनांनी सर्व काही
पण तरीही संमती ती मूक माझी
-
भले असू दे तुझी माझी मग रास वेगळी
पुन्हा लागली बघ जगण्याची आस वेगळी
विरहानंतर आज भेटलो दोघे आपण
भेट अचानक ठरेल अपुली खास वेगळी
वाट्यास नको विरह सततचा असा नव्याने
म्हणून आता धरली आहे कास वेगळी
-
तिळगुळ घे...
तिळगुळ घे अन् गोड बोल तू
राग सोडुनी भाव खोल तू
बाळगायचा अहम कशाला
अहम फुकाचा मान फोल तू
नात्यांमध्ये अवीट गोडी
नात्यांसोबत जरा डोल तू
चल आकाशी पतंग उडवू
करु नको ना उगा झोल तू
आयुष्याच्या प्रगतीसाठी
वेळेचे तर जाण मोल तू
बिनकामाचा दंगा नुसता
वाजवू नको फक्त ढोल तू
आपुलकीचा जप ओलावा
ओलाव्याची बघ ओल तू
-
कितीही करा कमीच आहे
दुःखाची तर हमीच आहे
विळखा घाले जीवनास या
जीवन बनले रमीच आहे
-
घराघराची साफसफाई जरी जाहली
मनात कचरा तसाच अजुनी बाकी आहे
-
गुलाबी हवा
मनात थवा
एका छत्रीत
प्रवास नवा...
का वेळोवेळी
असा अवेळी
पाऊस छळे
कातरवेळी...
हवाहवासा
नवा नवासा
एकांत लाभे
मनास खासा...
मोकळी वाट
घालते घाट
न्याराच आहे
डौलाचा थाट...
प्रकाश मंद
लागला छंद
प्रेमात तुझ्या
अशी स्वच्छंद...
-
*माझा तू अन् तुझीच मी...*
माझा तू अन् तुझीच मी बघ
बनून राणी जगते आहे...
हातामध्ये हात घेवुनी
स्वप्न उद्याचे बघते आहे...
संसाराला हातभार तर
लावण्यास मी झटते आहे...
माझे झटणे,वणवण करणे
तुला कुठे पण पटते आहे...
सुखदुःखांच्या सागरामधे
नाव आपली तरते आहे...
मोठ्या लाटा जर आल्या तर
संरक्षण मी करते आहे...
रागांमध्ये जरी भांडले
नाते कुठे मी तोडत आहे...
माझ्या राजा तुझियासाठी
रुसवा फुगवा सोडत आहे...
आता माझ्या जगण्याचे तू
कारण एकच उरले आहे...
नाते अपुले सहवासाचे
फक्त सुखाने भरले आहे...
-
तो मनातले बोलत नाही
भाव मनाचे खोलत नाही
माझ्यावरती चिडचिड करतो
राग तरी मी तोलत नाही
-