जय   (✍️जय)
73 Followers · 128 Following

read more
Joined 10 August 2020


read more
Joined 10 August 2020
26 MAR AT 20:08

विरली झिजली पुसटशी झाली आता
कधी तळहातावरची लकेर होतो..
हरवले ते दिवस बेफिकरीचे
जेव्हा स्वच्छंद होतो, स्वैर होतो...

पानगळीत झाडाची साथ सुटते
आणि पाचोळा वाऱ्यावर सैरभैर होतो..
कुठेतरी जीव थोडासा तुटतोच जेव्हा
कुणी आपलाच जीवलग गैर होतो...

-


23 MAR AT 10:09

तुला आनंदाचा स्त्रोत म्हणू की
निर्भेळ हास्याचा अविरत झरा
या प्रवाहात क्षणभरही आलेला
उगाच नाही होत जो तो हसरा

सदा सर्वदा तुझ्या मनी जे घडावे
दुःखाचे समूळ कारण मागे पडावे
छोट्या छोट्या गोष्टींतला आनंद ते
यशाचे उत्तुंग शिखर तू चढावे

हातून घडोत तुझ्या सत्कृत्य
शुभाशीर्वाद मिळावेत नित्य
याच शुभेच्छा तुला सांगण्यास
आज वाढदिवसाचे औचित्य

२३.०३.२०२५

-


21 MAR AT 10:18

अक्षर अक्षर जुळवून शब्द केले गोळा
एका ओळीत आपुलकीने बसवले सोळा
खरडली जरी जुन्या वही नि कागदावर
एक एक ओळ तिचा मला एक एक तोळा

कधी पाझरली कधी फक्त रेटली कविता
कधी शब्दांनाच ऊब देण्या पेटली कविता
चटके लागले फारच, धग सोसेना जेव्हा
वैशाखात पावसासारखी भेटली कविता

-


5 SEP 2024 AT 10:02

प्रिय शिक्षकहो,

तुम्ही केवळ शिक्षक नाहीत
मला फक्त इतकंच माहीत

कधी बनून कुंभार दिला मतीला आकार
कधी होऊन लोहार दिली जीवनाला धार
सोनारापरी तासले, घासले तासन्‌तास
आली झळाळी, वाढली आमची किंमत फार

फुलं सारी जणू वनराईत
तुम्ही केवळ शिक्षक नाहीत |

झालात मित्र, मार्गदर्शक, कधी आई
दिलेत विद्यादान काय द्यावी गुरूदक्षिणा
ऋण असे की याजन्मी न व्हावी उतराई
तुमचा हात डोईवर हीच आमची पुण्याई

लिहून देतो पक्क्या शाईत
तुम्ही केवळ शिक्षक नाहीत ||

-


3 AUG 2024 AT 8:52

मन झाले निर्मळ
सुटता मोह मनीचा
घरच जग सकळ

-


2 AUG 2024 AT 23:43

हल्ल्यागुल्ल्याचे दिवस सरले
बालपण ते कुठे हरवले
आजही आठवतात या क्षणी असल्यासारखे
माझी शाळा, वर्ग, ती छडी
त्या बाकावरचे सवंगडी
जणू एकाच माळेचे मणी असल्यासारखे

गणवेषाला कधी इस्त्री नव्हती
पण शाळेसारखी मैत्री नव्हती ।

आज ढिगाने जरी फॉलोवर्स असले
सोशल मीडियाच्या चौकटीत बसले 
तरी त्या एका हक्काच्या मित्राची कसर उरते
ओढ सुटत नाही जुन्याची
हुरहूर ही एक ज्याची त्याची
जसं प्रवासाला निघाल्यावर मागे घर उरते

पुढे काय होईल याची खात्री नव्हती
पण शाळेसारखी मैत्री नव्हती ।

-


21 JUL 2024 AT 10:51

यशाची पायरी | कर्माची डायरी
स्मरण गुरूंचे | मुखपृष्ठी ||

सूचक साकार | असो आरपार
अचूक पाहण्या | देई दृष्टी ||

मन घेता नाव | जागे भक्ती भाव
परम सुखाची | करी वृष्टी ||

गुरूंची महती | दैवतं नमती
वंदन करती | सारी सृष्टी ||

-


5 SEP 2023 AT 0:05

Paid Content

-


5 AUG 2023 AT 22:45

पेनाच्या खुणा, हातावर धाग्यांच्या गाठी कशाला
मनातल्या भावनांना दिखाव्याची काठी कशाला
कोणी कसे वाटले नात्यांना दिवसा-दिवसांत
मैत्रीच्या नात्याचा एकच दिवस कधीपासून झाला?

आता आलाच आहे तर साजरा करूया त्याला
जवळच्या-दूरच्या, आठवूया नव्या-जुन्या दोस्ताला
एका दिवसाच्या निमित्तानं करूया सेलिब्रेशन
का खास आहे आपली मैत्री चला सांगूया त्याला...

-


5 AUG 2023 AT 17:54

फ्रेंडलिस्टमध्ये मित्र-मैत्रिणींचा खच आहे
आताशा मैत्रीलादेखील माॅडर्न टच आहे

पण कुणी 'एक' असावा सखा, जीवलग
इमोजींच्या गर्दीत राहून, खराखुरा अलग
अशी अपेक्षा करणंदेखील टू मच आहे?

फ्रेंड्सपेक्षा भिस्त फॉलोअर्सवरच आहे
आताशा मैत्रीलादेखील माॅडर्न टच आहे|

कृष्ण सुदाम्याचे दिवस कधीचेच विरले
देण्याघेण्याच्या व्यवहारापुरते उरले
'तुझं तू माझं मी' आता हेच सच आहे

जिव्हाळा, आपुलकी, प्रेम वरवरच आहे
आताशा मैत्रीलादेखील माॅडर्न टच आहे|

वाटलंच कधी की मी एकाकी पडतोय
आणि जोवर आयुष्याची लढाई लढतोय
मैत्री हीच ढाल आहे, मैत्रीच कवच आहे||

-


Fetching जय Quotes