Y O U.
-
संध्याकाळी सहाच्या सुमारास वीज गेली असेल अन् उन्हाचा एक कवडसा जाळीतून किंचितसा आत डोकावू पाहेल. दोन कप वेलची घातलेला चहा आणि खुप सारे पोहे. रेडिओ वरती 'जरा विसावू या वळणावर' गीत मंदपणे चाल धरत असेल. आरामखुर्चीमध्ये बसून आपण बोलूयात खांडेकरांच्या अमृतवेल पासून पु. ल. च्या मजेदार किस्स्यापर्यंत, शंकर पाटलांच्या धिंड कथेपासून बागुलांच्या पेसूकपर्यंत, शिरवाडकरांच्या नाटकांपासून सुरेश भटांच्या गझलीपर्यंत. आठवू नंतर कॉलेजमधल्या बहिणाबाईच्या कविता 'मन वढाय वढाय उभ्या पीकातल ढोरं' आणि शाळेत असतानाचे आवडते पात्र बोक्या सातबंडे. हिंडू थोडा वेळ अापण हौसेने सजवलेल्या अंगणात. थकून निजून गेलेल्या जाई, जुई आणि तुझी आवडती बकुळा, नुकतीच जागण्यास आतुर असलेली माझी आवडती रातराणी. क्षण-दोन क्षण न्याहाळू त्यांस आणि परतू घरास, जसे पक्षी घरट्यांकडे.
समजत नाहीये नक्की हवयं काय मला,
एक सायंकाळ तुझियासंग अशी की
प्रत्येक सायंकाळ तुझियासंग, अशीच.-
अंगणात इतका मोठा सडा पडलेला असतो
पण फक्त दोन तीन चाफ्या वरतीच मन भाळते
पहिल्या प्रीतीचा सुगंध दरवळतो तो त्यामधेच.
टेबला वरती ठेवताना वाटतं केसात माळून बघावा एकदा
पण छे! नाही, पुन्हा नाही.
मग मंद सुंगधात रात्र जांभई घेते
आणि सकाळी ते जीव कोमेजून जातात
पण आता वाईट नाही वाटत
त्यांच्या बिना सांगता मरण्याचं
त्यांच आयुष्यच मुळात तेवढं
आपला नात्यासारखं-