आजोळी जावं म्हणतो.....
आठवणी गोळा करण्यासाठी का होईना,
पण पुन्हा एकदा आजोळी जावं म्हणतो.
ज्या ठिकाणी खूप खेळ खेळायचो,
त्या ठिकाणी अजून एक खेळ खेळू म्हणतो.
ज्या मंदिराच्या पारावर रात्री झोपायचो,
एक रात्र त्याच पारावर शांत झोपू म्हणतो.
ज्या नदीवर पोहायला जायचो,
तिथं जाऊन पुन्हा एकदा पोहू म्हणतो.
जिथं निस्वार्थ जिवाभावाचे मित्र भेटले
तिथं जाऊन पुन्हा एक मित्र करू म्हणतो.
ज्या चावडीवर खूप भजन ऐकलीत,
तिथं जाऊन अजून एक भजन ऐकावं म्हणतो.
ज्या रानात बैलांना चारायसाठी न्यायचो,
त्याच रानात बैलां मागं पुन्हा जाऊ म्हणतो.
ज्या घरी लहानपणी लाड पुरवले जायचे,
त्याच घरी जाऊन एक लाड अजून करून घेऊ म्हणतो.
जिथे लहानपणी आजी कडून खूप गोष्टी ऐकल्या,
तिथे जाऊन आजीची अजून एक गोष्ट ऐकावी म्हणतो.
एका उन्हाळ्यात सुट्टी काढून,
पुन्हा एकदा आजोळी जावं म्हणतो.
-