सप्तपदीचे ती वचन साधे,
मनात वेगळेच इरादे...
मृगजळाचे टाकुनी जाळे,
अडकविले बहु चालाखे...
प्रेमाचे खोटे बहाणे,
रचिती कुटिल कारस्थाने...
राधा ही कृष्णावरी भाळे,
कलियुगी घडे निराळे...
मिळूनी शिशुपाला ते,
पोहचवी कृष्णासी निजधामे...
-दउ
-
मरणोत्तर भेट...
सांगेल का कोणी काढिला हा रिवाज,
देह वजा वेड्या मनासी प्रश्न पडे आज...
आत्मा माझा विलीन अनंतात,
मज ना आकळे कोण भेटीस आले आज...
उगा गर्दी करुनी उभी प्रेताच्या आसपास,
कोणास आमंत्रण खास ना मी दिले आज...
जिवंतपणी जे हवे मिळविण्या केली यातायात,
सर्व मिळूनि मज द्यावयास आले मरणोत्तर भेट आज...
नका छेडू कलेवर पहुडलाय निवांत श्वेत रंगात...
बंद पाडा हा रिवाज ही शेवटची इच्छा समजा आज...
-
सुंदर वृक्ष डहरलेले, फळे फुलांनी लगडलेले...
एक डहाळी त्याची, खिडकीत माझ्या डोकावलेली...
तीन प्रहरी, किलबिल किलबिल पक्षी बोलती,
खिडकीत माझ्या चिवचिवे, एक चिमुकली सोनुलि,
रूप तिचे गोंडस नी लोभस, थोडीशी काळी नी सावळी,
टोकदार चोच चिव्वळ, पोटाला पिवळी छटा दिसे शोभूनी...
चिवचिवाट करुनी सारे घर दणाणून सोडी, एकटीच भारी,
चिवचिवाट बंद झाला कसा, अचानक एके सकाळी...
डोकावूनी बघता खिडकीत, ना दिसे कशी आज ती डहाळी,
कोणीतरी छाटली होती डहाळी माझ्या नी तिच्यातील दुवा साधणारी...
परत एकदा तीच भयाण शांतता, फिरुनी बघता पाठी,
या चिमण्यांनो परत फिरा रे, मन माझे टाहो फोडी...
-
असे नाही लपायचे, खोड्या करुनी आता,
समोर तू यायचे, हातातील काठी, बघ आता,
बस झाले तुझे, रोजचे गाऱ्हाणे आता,
सांग जरा, कधी संपायचे, सारे आता,
आल्या साऱ्या, गवळणी बघ ना...
कान्हा सवे, मन धागा धागा जोडती कश्या...
एकटी मी किती किती, सांभाळू साऱ्या गोष्टी,
किती त्रास दे सी कान्हा, तू यशोदा मय्या,
ये ना माझ्या जवळी, बैस ना जरा,
येतील आता साऱ्या गवळणी, करुनी गलका,
कान्हा सवे, मन धागा धागा जोडती कश्या...
करी गाऱ्हाणे जरी, तरी तोचि प्रेमाचा दुवा...
रोज शिक्षा नवी, करुनी मी थकले,
जीव कासावीस होई, तुझ्या मागे रे,
येत्या जवळी, कोणी तुझ्या, मनी उठे काहूर रे,
का जीवास माझ्या, लावी तू, अशी हूरहूर रे,
आल्या गवळणी, बघ ना, करुनी गलका,
कान्हा सवे, मन धागा धागा जोडती कश्या...
-
सुरकुती...
निशेच्या भितीने आधीच का, पापण मिटून घ्यायचं...
एक दिवस बटन बंद होईल, तो पर्यंत उजळत रहायचं...
वाळवी पोखरणार आधारस्तंभ, तुझे तू ठरवायचं,
गिळंकृत करुनी अळीस, सुतार बनुनी जगायचं...
सटवायीचे लेणे ओघवतच, अडगळीत तुझे पाचारण,
भुल न पडता कामा, राखेतील तू फिनिक्स असाधारण...
शोध घेता आधाराचा, पदरी येईल निराशा अकारण,
झुकलेले खांदे उचलुनी दिमाखात, तुझा तू हो तारण...
सुरकुतलेल्या देहास अखेर, झोकायचे सरणावर...
शोधूनी अडगळीचे आदिकारण, कर त्यावरी तू जारण...-
शिवार...
कोणते रे दुःख झाले, तुज अनावर,
रडतोय असा धाय मोकलून...
एकदाची कर बाबा ढगफुटी,
नी कर तुझ्या मनाची आस पुरी...
साठवले जितके कर रिते,
नी वाहून जाऊदे माझ्या सवे...
आमना सामना आज होऊ दे,
चिखलाच्या थारोळ्यात लोळून घे...
मी ही कंबर कसलीय माझी,
तू जितका जिद्दी मीही हट्टी...
एकदाच सहन करेल तुझी दांडगाई,
नंतर बोलू नकोस दिली नाही चेतावणी...
-
सामान्य...
मेख चा लागेना सुगावा, गनिम बहु चोख आहे,
धाव कुठवर वेड्या, कुंपणात तुझी मौत आहे...
परीट होई साव, भ्याडवृत्तीस पुरे एक डाग,
अधाशी आमिषांचा, दिसणार का तुज खोट आहे...
मरण सोपे सरल, नी जगणे तुझे महागले,
तुकड्यात विभागुणी, लाटणे पूर्वापार तोड आहे....
वलय चाकोरी वृत्ती, भेदण्याची वेळ हीच खरी,
गाफिल तू कसा, रक्षकाच्या खालीतच चोर आहे...
लाचार कित्ते गिरविणे, सामान्य सामान्य म्हणुनी,
युक्तीची करी रे क्लृप्ती, खरा असामान्य तोच आहे,-
मृगजळ...
पसरले जाळे रेशीम धाग्यांचे, आवर स्वतःला,
आकर्षित करताय रंग तवंगाचे, सावर स्वतःला...
मृगजळाचे फसवे बेत, नी साथ कांचन मृगाची,
डोळ्यांवरील झापड सार, उगा बावर कशाला...
चंदनदेही म्हणोनी, विसर त्यासी विखारीपणाची,
सर्पची तो, जात त्याची विषारी, घाबर तयाला...
पांघरूनी भगवे देही, श्वापद इरादे लपवू पाही,
आखडूनी हात भिक्षेचा, कर स्थावर मनाला...
सुगंधित ओरखडे, ताटवे गुलाबाचे छद्मपायी,
बन कणखर अशी, फुटे ना पाझर पाषाणाला...-