14 OCT 2019 AT 20:27

तुझे आहे तुजपाशी ...!

अवास्तव सुखामागे धावू नकोस
तुझे सुख वसते तुझ्या अंतरासी...
भुलव्या मोहप्रवाही वाहू नकोस
तुझी उन्नती वसते तुझ्या वर्तनासी...

संमोहनाचे मायाजाळ तुला फसविण्या येईल
मायावी जंजाळात त्या अडकू नकोस...
विषयवासनेच्या ज्वाळा उठतील तुझ्या मनी
तप्त फुफाट्यात त्या भडकू नकोस...

भोगविलासाच्या आहारी जाऊ नकोस
व्रतस्थ वर्तनाची कास हाती घे ...
आरंभासाठी शुभप्रहर पाहू नकोस
आत्मविकासाचा ध्यास माथी घे ...

व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुक्त मृगजळात पोहताना
नैतिक मर्यादांची बंधने तुझ्या कामी येतील...
योजलेल्या ध्येयाची खडतर वाट चालताना
संत विचारवंतांची विवेकस्पंदने तुझ्या कामी येतील ...

सत्यशोधक वृत्तीचा अट्टाहास तू सोडू नकोस
उन्मत्तपणे आस्थेच्या कळ्या तू तोडू नकोस ...
जीवन प्रमेयाची सिद्धता, शोधू नको पोथीपुराणांसी
तुझे आहे तुजपाशी, जरा धुंडाळ तुझ्या अंतरासी....







-