नुकत्याच झालेल्या वसंतागमनाच्या पार्श्वभूमीवर सृष्टी जणू मंजुळ स्वर आळवीत आहे. ऊन्ह आता कलली आहेत, हलक्या हलक्या प्रेमलहरी मंद वाऱ्याची झुळूक बनून एका हृदयातून दुसऱ्या हृदयाकडे वाहताहेत , आम्रतरूच्या सुप्त परागांनाही आता प्रणयलालसा असह्य होऊन जायंगाच्या भेटीची ओढ त्यांना सतावते आहे, फलित मोहोराच्या गंधाने आता आसमंत दरवळून जाणार ह्या विचाराने कोकिळेच्याही आनंदाला पारावार उरला नसून ती जिवाच्या आकांताने मल्हाराची धून आळवीत आहे. हा अद्वितीय सोहळा बघून माझ्याही मनाची तगमग झाली अन अगदीच राहवेनासं होऊन एक अनामिक हुरहूर मला क्षुब्ध करून गेली; मग तळ ढवळून निघालेल्या माझ्या स्वच्छंदी आणि बेताल मनाला समजावता माझे शब्दही अपूर्ण पडले आणि माझी प्रतिभाही !! खरंच ही हुरहूर, ही ओढ का बरे एवढी हवीहवीशी वाटत असावी ? कदाचित ही चाहूल असावी कशाची तरी ! पण नेमकी कशाची ? दिवसेंदिवस तारुण्याच्या रोखाने बहरत चाललेल्या कायिक बदलांची की अनामिक स्पर्शाची ?— % &
-
सरत्या क्षणांचा गोड शेवट....!
फुलत जाते हास्य वयाचे
व्यक्तिव्यक्तींच्या गालावर,
बेभान नाचतात काटे घड्याळाचे
शिष्ठ काळचक्राच्या तालावर ...
अथकपणे चालत राहणे
हा तर काळाचा स्वभाव आहे,
पण काटेकोर नियतीच्या हृदयी मात्र
सहृदयतेचा आभाव आहे ..
सरत्या काळाच्या अनमोल आठवणी
सोनेरी संदुकांत साठवून ठेव,
सुखदुःखांच्या जुगलबंदीत जगलेले क्षण
जिंदगीच्या चित्रफितीत गोठवून ठेव....
प्रयत्नांती कमवलेली अनुभवांची शिदोरी
काळाने दिलेला ठेवा असतो,
परिस्थितीशी झुंजणाऱ्या झुंजार जीवाचा
नशिबाच्या लेखालाही हेवा वाटतो...
मनोरथाच्या घोड्यांना, कर्तृत्व मैदानाची ओढ
उलटलेल्या क्षणांना, गुपित स्वप्नांची जोड,
सरत्या धुंद रात्रीला, उगवत्या किरणांची ओढ
ज्याचा शेवट गोड, ते सगळं पर्वच गोड...
-
कृष्णप्रीत .. .. ..
श्रवले न जे कधी माझ्या कर्णपटलांनी ,
दिसले न जे कधी माझ्या क्षुभद नयनांस ,
हुंगले न जे कधी माझ्या तिक्ष्ण नासिकेने ,
जाणवले न जे कधी माझ्या चर्मकांतीस ,
आहे असे एक रहस्य माझ्या अंतरीच्या गर्भि ...।
अजाणता मी आहे त्याच्या अस्तित्वाशी ,
वसते जरी ते सत्य माझ्या अंतराशी ,
सैरभैर होते मन, अन गुंग होते मती ,
क्षणात फिरून येते अनुभूती, हीच का ती कृष्णप्रीती ..?
कृष्ण केवळ सत्यच नसून, परमांत आहे ,
तोचि राधिकेच्या प्रेमकथेचा रसरचयिता आहे ,
अर्जुनसारथी, सुदाम्याच्या मित्रप्रेमाचा झरा आहे ,
तोच वैष्णवांच्या अनादी अनंत आस्थेचे सार आहे ...।
स्नेहार्त वाजवी पावा, सुरांचा त्या अंत न व्हावा ,
कामक्रोधादि सहा अरींचा, मजवरी न व्हावा कावा ,
तुझा माझ्या हृदयी ठावा, मला तुझा विसर न व्हावा ,
स्फटिकवत शुभ्र शब्दोपचार माझा तवचरणी घ्यावा ..।
आस्थेचा उज्वल दीप माझ्या हृदयी लाव रे ,
तूच माझी भक्ती कृष्णा, तूच माझा भाव रे ,
चित्ती तव चिंतन, अन मुखी तुझे नाव रे ,
सायास तुझी ओढ, जणू हृदयस्पर्शी घाव रे... ।
- कृष्णवेडा अनिकेत-
कोजागिरीची ती रात्र होती .. वसुधा मदनरुपी शीतल चांदण्यात नाहत होती ...सृष्टी निपचित निद्रिस्त पहुडली होती गोकुळही ह्या स्थितीला अपवाद कसे असावे .. गोकुळ आज घरंदाज सुहासिनिसारखे भासत होते .. शांत सात्विक सुशील आणि तृप्त आणि त्या तृप्तीची साय सर्वत्रच दिसत होती ..यमुनेच्या काठावर मात्र प्रेमरंग झरत होता.. पानाच्या सळसळीने आणि रातरणीच्या सुगंधाने सर्व आसमंत खुलला होता .. राधिका मात्र पाषाणावर बसून होती .. तिच्या डोळ्यांतील लज्जा आणि मोहनभेटीची आस शिगेला पोहोचली होती .. तो केवड्याचा सुवास तिला केव्हाचा चिडवत होता .. तेवढ्यात तिच्या भावना अश्रू रूपांनी खाली ओघळल्या व यमुनेत मिसळल्या .. त्यासरशी यमुना शहारली व तिचे सांत्वन करू लागली .. त्या शीतल शशीलाही राधिकेच्या हृदयातील आग विझवता आली नाही .. अशी ही राधिका कृष्णरमण करीत यामुनातीरी बसून राहिली, केवळ कृष्णसख्या साठी ....
-- कृष्णवेडा अनि-
वैकुंठाचा चोर .....
सोनियाचा दिनू आज उदयासी आला
वैष्णवांचा मेळा अवचित पंढरीसी गेला
दिंड्या-पताकांच्याही मनात आले काही
आषाढीच्या सरींनाही जुमानले नाही ...
ज्ञाना- तुका- मुक्ताईचं दर्शन आज घडणार
भगव्या झेंड्याचं निशाण, कळसावरी चढणार
अबीर- बुक्क्याचा साज भाळावरी मढणार
टाळ मृदंगाचा बेधुंद नाद, गगनासी भिडणार ...
भारुड- किर्तनाचे भक्तीरंग, चित्तभान हरती
चंद्रभागेच्या संथ लाटा, विठ्ठल विठ्ठल स्मरती
दुमदुमले वाळवंट, आस्थासगरी आली भरती
त्रैलोक्याची वाणी गाते विठ्ठल नामाची कीर्ती ...
पुरे झाले बा विठ्ठला, वीट पायीची सोडून देशी
राहुनी माझ्या हृदयमंदिरी, ताबा माझा घेशी
चोरीलेस माझे ध्यान, अंत तू माझा पाहिला
वैकुंठाचा चोर असा, राऊळी दडून राहिला ...
-
पंढरीचं याड...
आषाढीच्या मासाची, लागता चाहूल
वाटेवरी पंढरीच्या, पडती पाऊलं
समाधान जीवाचं, मजला घावलं
पंढरीचं याड मला, सावळ्यानं लावलं ।। 1 ।।
सोडिला मी नांगर, पेरणी मी सोडली
प्रपंचाची माया, पारभर मी तोडली
काळजीची उतरंड मी, नाराळासम फोडली
मनाचिया कास मी, पांडुरंगाशी जोडली ।।2।।
सावळा माझा विठ्ठल लेकुरवाळा
सोशितो रंजल्या-गंजल्यांच्या कळा
नाचतो वैष्णवांच्या रिंगणाच्या मेळा
मस्तकी ल्याला चंदनाचा टिळा ।।3।।
नाठाळाच्या माथी, हाणू भक्तीची काठी
भल्या ह्या कारणी, सावळा माझ्या पाठी
कश्यासाठी जगू मी, हा जीव कुणासाठी
आतुरलं माझं मन, त्या पांडुरंगाच्या भेटी ।।4।।
-
डाव सारीपाटाचा ...!
मन अवखळ हर्षाचा पाट
कधी प्रवाह आवेगांचा ,
जणू सोंगट्या नाचती सुखदुःखाच्या
जणू डाव सारीपाटाचा ...!
त्राण घेऊनि उसने
मेघ चिंतेचे उंच उडतील,
मुक्त होईल श्वास अन
निकोपाचे सोहळे घडतील ...!
सत्याग्रहाचा मी साधक जरी
भुलव्या मायेचा मनी ओढा,
क्षणभंगुर उल्हासाचा आभास मीही
चाखेन म्हणतो थोडा थोडा ...!
तटस्थ सुकले मन जसे ओथंबूनि यावे
पोळल्या तप्त अंतःकरणी कडूस जसे पडावे,
व्हावी ऐसी किमया,शोक सारा हरपून जावा
सचिंत बावऱ्या मनात माझ्या वसंत फुलून यावा ...!
-
अलौकिक प्रकाश .....
मन सचल वाऱ्याचा ध्यास
हिंडे सुमनांच्या सुवासापरि,
कधी संथपणे झोके घेई
अचल तरुच्या फांदीवरी... !
मन अबोल खगांची सुखद किलबिल
जणू नीरव शांतीची पहाट,
कधी गंभीर वावटळाचा गोंगाट
जणू चिवट मोटेचा रहाट ... !
मन उत्साही स्वप्नाळू तरुण
जणू प्रवासी अनंताच्या वाटेचा,
कधी विरक्त निश्चल वैरागी
जणू जोम ओसरत्या लाटेचा ... !
मन उन्मत्त कस्तुरीमृग
जणू असीम सदिश आकाश
कधी अनभिज्ञ चेतनेचा प्रवाह
जणू गूढ अलौकिक प्रकाश ... !
-
My secret keepers....…!
It is said that when we wake up in the morning, we are influenced by the quality of the place we first look at, and so on.
While thinking about this, a thought touched my mind if What I see every day that makes my day so peaceful and sober. After much thought, I remembered the four walls of my bedroom.
If anyone after me knows how crazy I am, these are the four walls.They know a lot of my secrets (Because when I'm babbling alone, There are only these walls to listen to).I understand that the ability to keep secrets is much more in these azoic walls than that of any human.I find these opaque walls more credible than the transparent dealings of any relationship.
I am learning from them to stay calm in one place and not to react to any incident. He convinced me of the importance of personal peace, and I'm trying to be a good secret keeper like them...!-
व्याकुळ कान्हा चांदण्याराती ....!
खग खोप्यात झोपी गेले , झोपलं सारं गोकुळ
राधिकेच्या धुंद आठवणीत कान्हा झाला व्याकुळ
शुभ्र चांदण्याच्या चांदणराती , हट्ट राधे तू धरू नको
राहवेना कान्हाला तुजवीण , खट्याळ खेळी तू करू नको...!
तुझ्याच प्रेमाची आस त्याला, तूच त्याची संगिनी
रोमारोमांत वाहते त्याच्या , तुझ्या प्रेमाची रागिणी
प्रतीक्षा तुझी करताना, प्रेमझऱ्यात तो नाहतो आहे
उत्कट वेड्या चातकासारखी ,वाट तुझी पाहतो आहे ...!
पाव्याच्या सुरेल सुरांचा नाद, साद तुला देतो आहे
निधीवनाचा कानाकोपरा चांदणसुख घेतो आहे
वेड्या कृष्णाची समजूत घालण्या ,मयूर नाचत आहेत
तुझ्या सौंदर्याची स्तुतिस्तवने कृष्णासमोर वाचत आहेत ...!
चांदोबाच्या चंदेरी रथाला ,नाजूक हरणे जुंपून ये
येऊन अचानक हळुवार, कृष्णाला अलगद मिठीत घे
रुसवा त्याचा काढण्यासाठी , तू कोवळे चंचल स्मित दे
मग हात त्याचा हाती घेऊन, त्याला प्रेमनगरीत ने ...!
प्रणयक्रीडा करताना तल्लीन हो तू कृष्णरंगी
उल्हासच्या कुंजकळ्या मग खुलतील तुझ्या अतरंगी
प्रेमपूर्तीची स्वप्ने पाहत , प्रेमवलयात तू हरवून जा
अर्धी भेट पूर्ण करण्या , पुढची भेट तू ठरवून जा ...!
-