जे वाटतं ते लिहावं
मनात दाटतं ते लिहावं,
जे रूचतं ते लिहावं
मनातून उतरतं ते लिहावं;
जे पटतं ते लिहावं
मनाला खटकतं ते लिहावं,
लिहावं सारं आकाश पाताळ
लिहावी दिवाळी, ईद, नाताळ;
लिहावी सलणारी मुकी खंत
पळताना मिळणारी श्र्वासाची उसंत,
लिहावा माणसातला माणूस
लिहावा शिकवणारा किस्सा अमानुष;
लिहावीत ती सारी कष्ट नी नैराश्य
कष्टाने कमावलेली यशाची आश्चर्य,
लिहावं जे आहे म्हणता म्हणता नाहीसं झालं
लिहावं नसताना ही जे संयमाने हाती आलं;
लिहावी बेरीज वजाबाकी
गुणाकार, भागाकार;
मांडावीत आयुष्याची बदलती गणितं
मोजावा उत्तरांच्या फरकांचा आकार;
लिहावे आईवडील नी आपली नाती
पावलोपावली खंबीरपणे साथ देणारे साथी,
लिहावी प्रत्येक टप्प्यावर रचलेली आरास
शेवटी लिहावा सारा जीवनप्रवास...
कु. अक्षरा संतोष ढगे.-
दरवर्षीप्रमाणे वळवाच्या सरी आल्या आणि बऱ्याच वर्षांपूर्वी लिहीलेल्या कवितेच्या आठवणी ताज्या करून गेल्या. मग सारं आठवलं, काँलेज मधील लायब्ररी, लायब्ररी मध्ये वाचतानाचं, "वि. स. खांडेकरांचं", "हिरवा चाफा" पुस्तक. वि. स. खांडेकर काय आहेत, हे हिरवा चाफा वाचताना त्यांचे शब्द, त्याचा हळूहळू उलगडत गेलेला अर्थ, एवढा गहन अर्थ लिहीण्यासाठी त्यांच्याकडे असणारं ज्ञान, विचार याची ताकद समजून घेताना मन थक्क झालं होतं, आपल्या हाती असे साहीत्य लागणं म्हणजे आपल्या हाती लागलेला शब्दांचा, कल्पनांचा व विचारांचा , समाजातील घटकांना हुबेहब सत्यवचनामध्ये बांधण्यासाठी मिळालेले अमूल्य ज्ञान हाती लागल्याची भावना मनात यायची. प्रत्येकवेळी वि. स. खांडेकरांना वाचताना काहीतली नवीन सुचायचे, असेच एकदा हिरवा चाफा वाचत असताना, "वळवाच्या सरी" असे शब्द वाचताक्षणी सुचलेली मनापासून आवडणारी कविता, आठवावी आणि या आठवणींनी मन आनंदून जावं....अजून काय पाहिजे या वळवाच्या सरींकडून?
कु. अक्षरा संतोष ढगे.-
तुला समजल्या नाहीत चार ओळी,
तरी चालतील;
पण तुझ्यासाठी लिहील्या एवढं समजलं,
तरी खूप आहे;
माझी कविता म्हणजे तुझ्यासाठी तुला रेखाटलेलं,
तुझंच रुप आहे...
कु. अक्षरा संतोष ढगे.
-
भेटीने तुझ्या श्रीरंगा
माळला मी आनंदरंग
नव्याने अनुभवते पुन्हा
समाधानाचा प्रारंभ...
कु. अक्षरा संतोष ढगे.-
उगाच का, चार ओळीत कविता लिहीली म्हणून ती चारोळी होते?
इथे प्रत्येक गोष्टीला महत्व आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट निराळी होते...
कु. अक्षरा संतोष ढगे.-
काही सुचत नाही; याच विषयावर काही लिहीलं, तर काय हरकत आहे?
कु. अक्षरा संतोष ढगे.-
पोटात काही नसलं आणि डोक्यात काही असलं, म्हणजे रात्र जागवतेच...
कु. अक्षरा संतोष ढगे.-
स्वता: ती...
ही रात्र जागवते नी, जागते स्वता: ती;
किती मनांची समजुत, काढते स्वता: ती;
आनंद झोपतो समाधानात, तिच्या साक्षीने;
नी कित्येक अश्रु मोकळे, करते स्वता: ती
मग पुन्हा जगण्याची उभारी, देते स्वता: ती;
खरंच...ही रात्र जागवते, नी जागते स्वता: ती...
कु. अक्षरा संतोष ढगे.-
चुका सार्या पोटात गेल्या,
माझी मात्र तशीच आहे;
सार्यांची मनं जपली गेली,
माझे मात्र उपाशीच आहे;
गेला श्वास तरी कदाचित,
कोणी बघणार नाही;
नाही...काळजी करू नका,
माझ्या मरणाला ही दोषी;
मी कोणालाच धरणार नाही...
कु. अक्षरा संतोष ढगे.-