खूप आत आत जावं लागतं नं
जंगलात...
तेव्हा सापडतं काहीतरी माझं माझ्यातलं....
एखादी वृक्षाला बिलगलेली वेल...
एखाद्या पक्ष्याचं जिवंत घरटं....
कुठूनतरी कानी पडणारा सादाला प्रतिसाद
दूरवर एखादं आपलं स्वस्थपण
सांभाळून पहुडलेलं तळं... त्या तळ्यात डोकावणारी झाडाची फांदी...
वृक्षराजीने सजलेला अंधार....आणि त्यात कुठूनतरी पडणारा
सूर्याचा एक तिरपा किरण.....
शोधावं तितकं सापडत जाईल...
एखादी अंधारी गुहाही दिसेल...जिथे कदाचित कुणी नसेल....
ती शांतता,स्तब्धता,किर्रता आणि हिरव्याकंच वृक्षराजीचा
गहिरा दाट परिमळ..
सारं माझ्यात एकजिनसी होत जातं...
माझ्यातलं जंगल आता हळूहळू माझ्याशी बोलायला लागतं...
आर्या-
Editor on Marathi wikipedia.
चाहूल वसंताची #नूतन वर्ष स्वागत #गुढीपाडवा
वसंताची चाहूल घेऊन, पानगळ सुरु झाली
तापू लागलेल्या ऊन्हाने, काहिलीची जाणीव दिली!
हिरवे डोंगर आता, करडे भासू लागले
पाणवठ्यावर पक्ष्यांचे, आवाज घुमू लागले!
अशातच फुलले आहेत, सावेरी,पळस,पांगारा
त्यांच्या अस्तित्वाने फुलला, निसर्गाचा गाभारा!
देवत्वाची येते प्रचिती, त्यांच्या रंगछटांमधून
रखरखीत दुपारी शांतावते नजर, गुलाबी केशरी भासातून!
कुणास ठाऊक कशी काय, निसर्गाची किमया अशी
सूर्याच्या धगीला झेलणारी, धरित्रीची माया जशी!
अनाम चाहुल येते दाटून, पाहत डोळा क्षण साजिरा
बहरत राहो असे वसंती, पळस,सावेरी,पांगारा!
आर्या.-
आकाशी चंद्रबिंब, पृथ्वीवर अग्नी
असा संयोग जाहला, आली हुताशनी
दाहक अन् शीत,प्रखर अन् शांत
दोन्ही रूंजी घालती, अंतःकरणात
उभय तत्वांची ,एकाच राती भेट
मन भरू जाई, आनंदे काठोकाठ
निसर्गही दंग, सात रंगात प्रेमाने
पर्णांचे हिंदोळ, धरा झुले आनंदाने
©आर्या
-
पायवाटांवर,येई तिचा मेणा शाही
गावागावात चालली,उत्सवाची घाई...
सजले अंगण ,पुढे गालिचा अंथरे
तिच्या स्वागताला,काळीज थरथरे
वर्षातून एक दिस, येतसे ती घरा
खळ्यातून फिरतसे , मिरवीत तोरा
पळस,पांगारा दोहो बाजू डुलताती
मोहोराच्या गंधाने दृष्ट की काढिती
अशी तिची माया अन् तिची ही थोरवी
शेणामातीने रंगली पुढची पडवी!
आर्या
-
चांदण्या डोकावून पाहू लागल्या
यमुनेच्या अंधार्या काळ्याशार प्रवाहात...
त्यांना दिसलं त्यांचं प्रतिबिंब
पाण्यात तरंगत निघालेलं...
...............
त्याचं आरस्पानी मोतिया उत्तरीय
वार्याने हलकेच ओढून घेऊन
वाहणार्या जळात सोडलेलं......-
आज आमच्या बोकोबांची गंमतच झाली
गाडीवर बसुन त्यांची स्वारी मस्त फिरून आली!
फिरत फिरत गेला बग्गी डाॅक्टरकाकांकडे
त्यांनी घातले बगिराला पालथे अन् उपडे!!
ओरडणारा बग्गी एकदम शांत शांत झाला
मोठ्या लांब सुईकडे पहातच राहिला!
कळले आत्ता बग्गीला बाबाने केली चिटींग
घरी जाऊन करेन आता बाबाशी मस्त फायटिंग!
पण कसले काय बुवा डाॅक्टरांनी केले
बग्गोबाच्या अंगावर दोन मुंग्यांना टोचवले!
मला ताप आला नाही ,नाही झाली सर्दी
उगीच का मी येऊन पहावी माऊ भूभूंची गर्दी?
घरी आल्यावर बग्गी आईकडे गेला
आईने मग बग्गीचा हळूच पापा घेतला!
आई बाबा म्हणाले नाही पळून जायला परमिशन!
दरवर्षीच करतोच आपण हेच वॅक्सिनेशन!
-
एक पाखरु येऊन बसतं दररोज निवांत
ऊनभरल्या टळटळीत दुपारी.... खिडकीत...
नाही माहिती त्याचा ठावठिकाणा
ना त्याची जगण्याची रीत....
त्याचं असं वागणं पाहून
लपेटून घेते मी स्वतःला विचारांच्या कुशीत.......
असेल का त्याची ही?
उन्मुक्त आयुष्यावर जडलेली प्रीत?
-
ना शीत, ना उष्ण वात
समीप आलेली चांदण्यांची रात!
झाडेही शांत, पक्षीगण निवांत
पंख मिटुनी, आपापल्या कोटरात!
एकेक उभा क्षण, नाही सरत... संपत...
अस्वस्थ काव्य उमटे, कासावीस मनात!
-
गुज माझिया मनात भिजता
पाऊस तुझ्या अंगणी
सखे साजणी!
रानी अग्निशिखा फुलावी
दाह माझिया तनुवर होई
लेप चंदनी तुझ्या ओंजळी
माझा विरही म्लान चेहरा
अश्रू दाटती तुझिया नयनी
सखे साजणी!
स्वप्न माझिया नयनी दिसता
तुझिया कष्टें होई पूर्तता
माझे चंचल नवथर मन अन्
विभ्रम तुझ्या कांकणी
सखे साजणी!
-