Dr. Rupali   (Dr. Rupali)
2.4k Followers · 79 Following

-श्रीरुप (My old pen name)
Joined 20 July 2017


-श्रीरुप (My old pen name)
Joined 20 July 2017
10 DEC 2023 AT 21:34

काही ना काहीतरी आसक्ती प्रत्येकाला
न शमणारी वासना लालसा का मनाला ?

लौकिकार्थाने जरी नको काही वाटे मला
अलौकिकाची तरी कामना नसे का तुला ?

नको म्हणता काही हवंच ना या मनाला
सुप्त तरी इच्छाच ना काय म्हणावे याला ?

कितीही कंटाळला जीव जरी या जंजाळाला
जिंकीले कुणी हो ख-या अर्थाने मोहमायेला ?
- © श्रीरुप

-


5 DEC 2023 AT 13:35

हल्ली बोलावंसं ही वाटत नाही
नेमकं काय बोलावं कळत नाही

ऐकवावं कुणाला ऐकावं कुणी
ना भाषेची जाण ना रसाळ वाणी

नकोसा वाटतो शब्दांचा गोंगाट ही
दबत चाललाय आताशा आवाज ही

द्वंद्व विवाद संवाद मनातल्या मनी
तरीही ऐकत रहावासा शांततेचा ध्वनी

मिथ्या सारं काही सत्य जाणिले कुणी ?
नगण्य अस्तित्व तरी स्विकारले कुणी ?
- © श्रीरुप
- Dr. Rupali

-


4 DEC 2023 AT 20:05

मागावासच वाटत नाही काही
काही मागावं इतकी पात्रता नाही

ना भक्त ना साधक ना सेवेकरी
घडली ना कधी परिक्रमा ना वारी

मी कोण ? ओळख अजून झाली नाही
दैनंदिनी प्रापंचिक इति कर्तव्यात राही

घड्याळाच्या काट्यावर अथ ते इति
श्वास आहे तोवर कालचक्राची गती

जाणार का असाच वाया हा जन्म ही ?
कुठवर चालणार अशीच येरझार ही ?
- © श्रीरुप
- Dr. Rupali






-


2 DEC 2023 AT 20:46

स्वार्थ साधण्यासाठी गोड गोड बोलणे
नाटकी वागणे आपलेपणा दाखवणे
कसं काय जमतं बुवा इतकं स्वार्थी होणे ?

स्वार्थ साधण्यासाठी नातं गोतं सांगणे
हेतू पूर्ण करण्यापुरते नाते जोडणे
कसं काय जमतं बुवा इतकं स्वार्थी होणे ?

स्वार्थ साधण्यासाठी आमिष दाखवणे
मतलब साधण्या लाळघोटेपणा करणे
कसं काय जमतं बुवा इतकं स्वार्थी होणे ?

स्वार्थ साधण्यासाठी केसाने गळे कापणे
भ्रमजालात ओढून हातोहात फसवणे
कसं काय जमतं बुवा इतकं स्वार्थी होणे ?

स्वार्थ साधण्यासाठी मुखवटा ओढणे
भोळे भाबडे पणाचा फायदा उचलणे
कसं काय जमतं बुवा इतकं स्वार्थी होणे ?
- Dr. Rupali








-


2 DEC 2023 AT 19:03

वावटळ उठवतो रजकणांना उडवतो
चौफेर उधळून सारा आसमंत माखतो

उधाणलेला वारा दृष्टीस धूसर करतो
ग्रीष्माचा उःशाप वळीवाचा पाऊस आणतो

आभाळ भरून चोहीकडे दाटतो
घनगंभीर गूढ उदासीन वाटतो

काळ्या सावळ्या पुंजक्यांना विखुरतो
गर्जतो टपो-या थेंबा थेंबांनी अवतरतो

माळरानी पानोपानी धुंद बेधुंद बरसतो
दरी खोरीत कुंद धुक्यात वाट हरवतो

वादळवारा वाकवतो कधी समूळ उपटतो
दशदिशांना झोडपतो तरी आशा टिकवतो


-


1 DEC 2023 AT 23:33

जे येईल सामोरं ते दाखवतो
जणू हुबेहूब प्रतिकृती चितारतो

दिसतं तसं प्रतिबिंबित तो करतो
असतं तसं खरं कुठे तो जाणतो ?

बेमालूमपणे ओढलेलं बाह्यरुप दर्शवितो
मुखवट्यामागचा चेहरा कुठे ओळखतो ?

घरी दारी सर्वत्र तो हवासा असतो
आबालवृद्धांना तो दर्शनीय असतो

सुखदुःखाच्या क्षणांचा सोबती ठरतो
माध्यमरुपी आरसा मूक साक्षी असतो

-


30 NOV 2023 AT 19:40

कुठवर आणशील उसनं हसू
मन तर तुझ्यावरच आहे रुसू

कळलं ना आता तरी तुला
हसणं खरं तर आहे कला

जन्म हा कशासाठी कुणासाठी
उठबस चार भिंतीतल्यांसाठी

नियतीने मांडलेला डाव खेळण्याचा
आला दिवस गेला दिवस सारखाच

प्रत्येक श्वासही इथे बांधिलकीचा
गतजन्मीचे ऋण चुकतं करण्याचा

नको करू धडपड केविलवाणी
ऐकेल कोण विरुन गेलेली वाणी

आहे तसं जगणं गुरफटून चक्रात
कधी नव्हतंच काही तुझ्या हातात
- © श्रीरुप
- Dr. Rupali

-


31 OCT 2023 AT 8:32

होवो पूर्वकर्मांच्या ऋणातून उतराई
थांबो जन्मोजन्मीची परवड गुरुआई
सरो याचि देही भोग सारे देई गे बळ
करो कृपा माऊली पतित पदनतावरी
- © श्रीरुप

-


31 OCT 2023 AT 6:37

शिक्षित अशिक्षित एकाच माळेचे मणी
शब्दशराने थिटी जिथे असंस्कृत वाणी
अविचारी अविवेकी आवेगी उणी दुणी
नियतीची परतफेड ही का डोळा पाणी?
- © श्रीरुप

-


30 OCT 2023 AT 21:52

शब्दांची कदर जिथे ज्यास
जगतात त्या अस्तित्व नाही
जिथे ज्यात मात्र उपहास
तिथे जगण्याला पर्याय नाही
किती नि काय हा दुर्विलास ?

अधांतरीच जगणं सगळं
इच्छेचा तर प्रश्नच नाही
फोल आशा आकांक्षांना
परावलंबी जीवनात थारा नाही
तरी जगण्याचा का अट्टाहास ?
- © श्रीरुप
- Dr. Rupali



-


Fetching Dr. Rupali Quotes